आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Every Breath We Take Is Precious, So Why Not Sweet Talk Everyone? | Article By Rashmi Bansal

नवा विचार:आपला प्रत्येक श्वास अमूल्य, मग सर्वांशी गोड का बोलू नये?

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच माझी एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाशी भेट झाली. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना अनेक वेळा यश मिळाले. त्यांनी संपत्ती तसेच प्रसिद्धीही मिळवली. देशातील बड्या उद्योगपतींमध्ये त्यांची गणना होते. आता ते निवृत्त झाले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचे आत्मचरित्र लिहायचे आहे. यासंदर्भात त्यांना मला भेटायचे होते. मी आलिशान बंगल्याच्या प्रशस्त दिवाणखान्यात शिरले आणि त्यांना नमस्कार केला. पुढचा अर्धा तास ते स्वतःबद्दल अतिशयोक्तीने बोलत गेले. सर्वप्रथम त्यांनी पंतप्रधानांसह किती मोठ्या मंत्र्यांसोबत त्यांची ऊठ-बस आहे आणि आता दररोज ऑफिसला जात नसल्यामुळे धर्मादाय कामात बराच वेळ घालवतात, हे सांगितले. माझ्या मनात एक विचार आला, धर्मादाय कार्य करणे चांगले आहे, पण ते सर्वांना सांगण्याची गरज आहे का? एखाद्याला मनापासून मदत करत असाल तर ते पुरेसे आहे. असो, या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यांना योग्य-अयोग्य ठरवणारी मी कोण? कुणाचे भले तरी होत आहे. मग कळले की, ते निवृत्त झाले, पण तरीही त्यांना त्यांच्या कंपनीची काळजी आहे. त्यामुळेच ते आजही त्यांच्यासारखे नवीन पिढीचे नेते घडवण्याच्या कामात गुंतलेले आहेत. पुढील दहा वर्षांचे नियोजन केले आहे, पण वीस वर्षांनी काय होणार? हा प्रश्न त्यांना त्रस्त करत आहे. आपल्या तब्येतीपेक्षा त्यांना याचीच जास्त काळजी असते. अहो, होणार काय? माणूस या जगात येतो आणि एक दिवस निघून जातो, मग तो कुणीही असो. जग चालत राहते, बदलत राहते. द्वारका नष्ट झाली, समुद्रात बुडाली, मग एका कंपनीचे काय? ज्याप्रमाणे शरीर अशक्त होऊन शेवटी नष्ट होते, त्याचप्रमाणे कोणत्याही संस्थेचा काळही एक दिवस संपतो.

भारतीय संस्कृतीत ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिमूर्ती आहेत. ब्रह्मा ब्रह्मांड निर्माण करतो, विष्णू चालवतो आणि शिव त्याचा नाश करतो. हे जीवनाचे आणि युगांचेही चक्र आहे. पण, माणूस हे सत्य स्वीकारायला तयारच नाही. श्वास थांबतो, त्या दिवशी भ्रमाचा भोपळा आपोआप फुटतो. मृत्यूनंतर कुणी आपली आठवण काढेल का? हो, आपण त्यांच्याशी चांगले वागलो असू, तर... माझा चुलत भाऊ अशोक याचे कोविडच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. त्याचा हसरा चेहरा मनाच्या पडद्यावर अनेक वेळा दिसतो. मी त्याच्याबरोबर आणखी काही वेळ घालवू शकले असते तर... तो मोठा माणूस नव्हता, पण त्याचे मन मोठे आणि साफही होते. तथापि, प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे तर मग आपण त्याचे नियोजन का करत नाही? उदा. बँकेच्या कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांचे नामांकन, विमा आणि बचतीचे तपशील, इंटरनेट बँकिंग पासवर्ड इ. ते कुठे तरी लिहून ठेवावे. नाही तर आपल्यामागे मुलगे आणि मुलींना अनेक वेळा इकडे तिकडे हेलपाटे मारावे लागतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छापत्र करणे, ते नसेल तर खूप गुंतागुंत आणि त्रासही होतो. आता हे कामही ऑनलाइन केले जाते, पण ‘तो दिवस दूर आहे’ म्हणून आपण ते करणे टाळतो. पुढचा क्षण येईल की नाही, हेही माहीत नसताना त्याचा विचार का करायचा? आपला प्रत्येक श्वास अमूल्य आहे, मग गोड का बोलू नये? आज भाजी चांगली झाली तर सुनेचे कौतुक करा. मुलाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवा. ऑफिसमध्ये सहकाऱ्याला रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा. अंघोळ करताना मनापासून मोठ्याने गाणे गा. हिवाळ्यातील उन्हाचा आनंद घ्या. जुन्या मित्राचा नंबर शोधून त्याला व्हाॅट्सअॅप करा. उद्योगपतीबद्दल बोलायचे तर कदाचित त्यांना इतिहासाच्या पानांमध्ये प्रवेश करायचा आहे. पण, आपल्याला दोनशे वर्षांनंतरचे जगाचे स्वरूप माहीत नाही. आपण अर्धे माणूस आणि अर्धे यंत्र होऊ का? किंवा मंगळावर वाद्य वाजवत असू का? जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात ते पृथ्वीवर परत येण्यास उत्सुक असतात. असे होते की नाही, माहीत नाही. म्हणूनच याच जन्मात जगणे योग्य आहे. अहंकार आपल्याला आतून पोकळ करतो. नम्रपणे वागतो तोच नेता असतो. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in

बातम्या आणखी आहेत...