आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं पालकत्व:प्रत्येक चूक ही नवीन शिकण्याची संधी

संध्या सोंडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ जचे युग स्पर्धेचे आहे. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक किंवा वकील कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल, तर प्रवेश परीक्षा अनिवार्य तर आहेच; पण त्यात उत्तम गुण मिळवणेही आवश्यक आहे. असाच जेईईच्या परीक्षेचा रिझल्ट आला. बरीच मेहनत घेऊनसुद्धा नेहाला कमी गुण मिळाले. नेहा : फार कमी मार्क्स मिळालेत. आई : मग काय ठरवलं आहेस? नेहा : एक वर्ष गॅप घेऊन पुन्हा परीक्षा देते. बाबा : ते ठीक आहे. पण दोन शक्यता लक्षात घे नेहा बेटा,एक तर कमी गुण येतील किंवा वाढतील. नेहा : मी खूप मेहनत करीन. आई : ते तू करशीलच. गुण वाढले तर आनंदच, पण कमी मिळाले तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत. नेहाने तिच्या आई-बाबांना घट्ट मिठी मारली. मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. मुले निर्णय घेतील तेव्हा फार फार तर काय होईल? ते चुकतील किंवा यशस्वी होतील. चुकले तरी त्यातून शिकून पुढे आणखी जबाबदारीने वागतील. उलटपक्षी अशी अनेक कुटुंबे आहेत, जेथे मुलांच्या प्रत्येक चुकीला शिक्षेची तरतूद आहे. का? तर मुलांना शिस्त लागली पाहिजे. मुलांना अशी कृत्रिमरीत्या शिस्त लावण्यापेक्षा त्यांनी स्वयंप्रेरणेने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. म्हणजेच त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे आहे. डॉ. जेन नेल्सन यांच्या Positive Discipline म्हणजेच सकारात्मक, विधायक शिस्त निर्माण करण्यामागील तत्त्वे आपण समजून घेतली तर प्रत्येक घरातील ताणतणाव नक्कीच कमी होतील. या जगात कोणीही परिपूर्ण नाही. ना आपण ना आपली मुले. हे लक्षात घेतलं की, घराघरातील गोंधळ, कटकट, आरडाओरडा यांची जागा आनंद घेईल. शिस्त लावताना आपण एक तर मुलांना कडक शिक्षा करतो. मुले कुठे चुकतात, यावर बारीक नजर असते. आपण मुलांच्या चुका शोधत असतो. चूक म्हणजे जणू काही फार मोठा गुन्हा आणि मुलांनी तर कधी चूक करताच कामा नये आणि येनकेनप्रकारे ते चुकलेच तर त्यासाठी त्वरित शिक्षा असते. कधी अबोला धरणे, भाषणबाजी करणे, तिरकस बोलणे, टोमणे तर असतातच. उपहास, पाठीत धपाटे, हातातील वस्तू फेकून मारणे. शाळा असेल, तर वर्गातून बाहेर काढणे. शाब्दिक अपमान. आपण हे विसरून जातो की, चूक म्हणजे शिकता शिकता सुधारण्याची संधी असते. मुले पडता पडता चालायला, धावायला शिकतात, अगदी तसेच. पण, केलेल्या चुकीला क्षमा नाही. ‘चूक केली ना मग परिणामाला तयार राहा’ हा विचार पालक, शिक्षकांनी सोडून दिला पाहिजे आणि शिक्षेला पर्याय शोधला पाहिजे. मानसशास्त्राने शिक्षेचे परिणाम आपल्याला उलगडून दाखवले आहेत. शिक्षेमुळे मुलांच्या मनात मोठ्यांबाबत प्रचंड राग आणि तिरस्कार निर्माण होतो. कारण मोठ्यांचे असणारे दुटप्पी वर्तन ते पाहत असतात. जसे घरातील एखादी काचेची मौल्यवान वस्तू मोठ्यांकडून तुटली तर, “अरे, लागलं का? चुकून पडली असेल.’ असं म्हटलं जातं. पण तेच जर छोट्यांच्या हातातून पडून फुटली, तर पाठीत दोन धपाटे बसतातच. सोबत मूर्ख, बेअक्कल अशा पदव्या मिळतात, ते वेगळंच. यामुळे मुलांच्या मनात मोठ्यांबद्दल अनादर निर्माण होतो. शिक्षेमुळे मुलांच्या मनात बदला घेण्याची भावना तीव्र होते. मुले मनोमन ठरवतात, आता तुमची बाजू वरचढ आहे; पण मी याचा नक्कीच बदला घेईन. मग आपली चूक पकडली जाऊ नये, याची पूर्ण काळजी घेतात. बंडखोरी वाढत जाते आणि पालकांच्या सूचनेविरुद्ध मुले वागू लागतात. उन्हात खेळू नको, पुस्तके वाच असं सांगितल्यावर; एकदा खेळायला बाहेर पडले की, संध्याकाळ झाल्यावर घरात पाय ठेवतात. वारंवार मिळणारी शाब्दिक बोलणी, अपमान, शारीरिक मार असह्य होऊन मुले निराश होतात. माघार घेतात. “आपण कुचकामी आहोत, जगायला नालायक आहोत’ अशी नकारात्मक भावना प्रबळ होऊन काही वेळा मृत्यूलाही कवटाळतात. तीव्र शिक्षेचे अत्यंत वाईट परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होतात. मुलांचे खच्चीकरण होते. रागाच्या भरात बोलले गेलेले शब्दच शस्त्र होऊन छेदतात. अशा संघर्षाच्या प्रसंगी पालकांनी कितीही राग आला, तरी थोडा वेळ शांत राहिले पाहिजे. त्यामुळे सकारात्मक अवकाश (Positive Time Out) निर्माण होईल. या अवकाशामुळे बालक-पालक दोघांचेही मन शांत होईल. पालकांच्या हे लक्षात येईल की, विचार करणारे, कृती करणारे मूलच चुकते. चुकीचे, शिकण्याच्या संधीत रूपांतर केले पाहिजे. किंबहुना मुले चुकली नाहीत, तर त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक कसा कळणार? चुकणार नाहीत तर शिकणार कधी? चुका करणे हा शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे, हे एकदा लक्षात आले की, प्रत्येक चूक ही नवीन शिकण्याची संधी होईल आणि त्यातूनच अंगी तसेच वागण्या-बोलण्यात अचूकता येईल. { संपर्क : ९६७३७३४५३१