आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:तिच्यासारख्या प्रत्येकाला मिळावं सन्मानाचं जगणं...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘गौरी या माझ्या गुरूंनी माझी शिकण्याची इच्छा लक्षात घेऊन मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि जिल्हाधिकारी इटनकर यांनी सेतू सुविधा केंद्रात काम करण्याची संधी देऊन माझ्या शिक्षणाचं चीज केलं...’ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातलं सेतू सुविधा केंद्र चालवणाऱ्या सेजल सांगत होत्या.शिक्षणामुळे सन्मानानं जगण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सेवा केंद्र नुकतेच हस्तांतरित करण्यात आले. त्यानिमित्त झालेल्या गप्पांमधून स्वत:चा प्रवास सेजल उलगडून सांगत होती.

उत्तराखंडमधील पितूरगड हे सेजलचं जन्मगाव. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत ती इतर कुठल्याही सामान्य मुलांप्रमाणे तिच्या आई-वडिलांच्या छायेत होती. मात्र सेजल तृतीयपंथीय असल्याचं समजल्यावर त्यांनी सेजलला महाराष्ट्रातल्या नांदेडमधल्या ‘गौरी बकस’ यांच्याकडे आणून सोडलं. आता याच गौरी सेजलच्या आई-वडील-गुरू अशा सबकुछ आहेत. विशेष म्हणजे आपल्याला आई-वडिलांनी नाकारल्याचं सेजल यांना दु:ख, राग नाही. उलट या सेतू सेवा केंद्राच्या बातमीनंतर त्यांच्या आई-वडिलांनी सेजलशी स्वत:हून संपर्क करून तिचं अभिनंदन केल्याचं सेजल आनंदाने सांगतात. अर्थात रस्त्याने जाता-येताना, सणावाराला आई-वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावतात हे सांगताना त्या भावुक होतात. महाराष्ट्रात आल्यानंतर काही दिवस सेजल यांनीही इतर किन्नरांप्रमाणे रस्त्यावर भिक्षा मागण्याचं काम केलं. लोकांच्या कुत्सित नजरांचा सामना केला. लोकांचं अव्हेरणं अनुभवलं. या सर्व काळात किन्नरही आपल्यासारखाच माणूस आहे या भावनेने खूप कमी लोकांनी वागणूक दिल्याचं त्या म्हणतात.

आई-वडिलांची कमतरता त्यांच्या गुरू गौरी बकस भरून काढली हे सांगायला सेजल विसरत नाहीत. सेजलला सुरुवातीपासूनच शिक्षणाची आवड होती. ही गोष्ट त्यांनी स्वत:च्या गुरूंना सांगितली. मी तृतीयपंथी आहे पण मी शिकू शकत नाही का? मला पुढे जायचं आहे. मला काम मिळालं नाही तरी मला चांगलं जीवन जगायचं आहे. मला तुम्ही शिकवाल का, असा प्रश्न त्यांनी त्यांच्या गुरूला गौरी यांना विचारला. दहा वर्षांची असताना गौरी यांनी सेजलला नांदेडमधल्या एका शाळेत दाखल केले. सेजलला दहावीला ७२ टक्के व बारावीला ८२ टक्के गुण होते. अर्थात शिकण्याचा हा प्रवासही सेजल यांच्यासाठी सोपा नव्हताच. शाळा, कॉलेजमध्ये कुणी सेजलशी संवाद साधत नसे. डबा खाण्यासाठीही कुणी तिच्यासोबत यायचं नाही. समाजाने अशा पद्धतीने नाकारलं तरी सेजल यांनी जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर योगायोगाने एकदा सेजल त्यांच्या गुरूसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सेजल यांच्या गुरूकडे तुमच्या समाजात कुणी शिक्षण घेतलेले आहेत का, अशी विचारणा केली. त्या वेळी गौरी यांनी सेजल यांचे नाव सांगितले. तुम्हाला रोजगाराचं साधन दिलं तर तुम्हाला आवडेल का, अशी विचारणा केली आणि सेजलने यासाठी आनंदाने होकार दिला. तिथून सेजलच्या आयुष्यात एका नव्या प‌र्वाला सुरुवात झाली. नुकत्याच झालेल्या १५ ऑगस्टला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सेवा केंद्र सेजलकडे हस्तांतरित करण्यात आले. हे नवीन काम सुरू करून सेजलला अवघे काही दिवसच झाले आहेत. कार्यालयातील वरिष्ठ लिपिक असणाऱ्या सहकारी सोलापुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सेजल सर्व काम शिकते आहे. या कार्यालयातील सर्वच सहकारी आपल्याशी आपुलकीने वागत असल्याचं सेजलने या गप्पांदरम्यानं आवर्जून सांगितलं. या सर्व कामी कमल फाउंडेशनची आणि अमरदीप गोधणे यांची खूप मदत झाल्याची कृतज्ञ भावना सेजल व्यक्त करते.

आज नव्याने आयुष्य सुरू केलेली सेजल आपल्या समाजाला विसरलेली नाही.‘सेतू सेवा केंद्र मिळाल्याने माझं आयुष्यच बदललंय. मी एक तृतीयपंथीय आहे. ते माझं आयुष्य मला जगावंच लागेल. ते मी जगतेय, मात्र दुसरं हे जे नव्याने मिळालेल्या जबाबदारीचं आयुष्य आहे, तेही जगणार आहे. माझ्या शिक्षणामुळे, माझ्या समाजामुळे, माझ्या लोकांमुळे मी आज उभी आहे. आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. इतर स्त्री-पुरुषांप्रमाणेच आम्हाला सन्मान द्या आणि घ्या,’ असं सांगतानाच समाजाकडून, तुमच्या-आमच्याकडून ही माफक अपेक्षा सेजल व्यक्त करते...

शरद काटकर संपर्क : ९९६००४९७९७

बातम्या आणखी आहेत...