आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परग्रहा’वरून पत्र:प्रेम आवडे सर्वांना, पण...

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, मागच्या लेखाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातील दोन प्रतिक्रिया अधिक लक्षात राहिल्या. कारण कोणत्या ना कोणत्या रूपात त्या आधीही अनेकदा व्यक्त झाल्या होत्या. पहिली प्रतिक्रिया होती एका किशोरवयीन मुलाची. (आपण त्याचे नाव किशोरच ठेवूया.) बारावीतल्या किशोरने मला जरा बिचकतच सांगितले, ‘सर, आजकाल मुली खूप व्यवहारी (त्याचा शब्द प्रॅक्टिकल) झाल्या आहेत.’ मी म्हटले, ‘त्यात अडचण काय आहे?’ तो म्हणाला, ‘फोन किंवा मेसेजला उत्तर देतानाही खूप वेळ लावतात... ’ मैत्रिणीकडून हवा तो प्रतिसाद लवकर न मिळाल्यामुळे तो घायकुतीला आला होता आणि तीही आपली सोय, गरज पाहून त्याला प्रतिसाद देत होती ही त्याची तक्रार होती. त्यानंतर मी एका वेब व्याख्यानात ‘आजच्या काळातील स्त्री-पुरुष नाते’ या विषयावर बोलत होतो. व्याख्यानानंतर एका पोक्त बाईंनी (त्यांना भावनाताई म्हणूयात का?) विचारले, ‘आजकालची मुले संवेदनशील कमी आणि व्यवहारी जास्त झाली आहेत. त्यांच्याशी कसे वागावे?’ वरील दोन्ही उदाहरणात असे दिसते की, त्या व्यक्तीला समोरच्याकडून अधिक समजून घेण्याची, संवेदनशीलतेची, अधिक उबदार प्रतिसादाची अपेक्षा आहे. आपण मागच्या लेखात पाहिले की ही सर्व प्रेमाचीच रूपे आहेत – आपण त्याला कन्सर्न, वात्सल्य, स्नेह, मैत्री असे काहीही म्हणू शकतो. ज्या व्यक्तीकडून हा अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही, ती तरुण असल्यामुळे मग ही दोघे (आणि असे बरेच जण) सगळी तरुण पिढी कोरडी, भावनाशून्य किंवा व्यवहारी आहे असे सांगू लागतात. खरेच तसे आहे का? माझा फोन ठेवताच किशोरला त्याच्या मैत्रिणीचा फोन किंवा मेसेज आला असेल तर तो तिचे प्रॅक्टिकल असणे विसरूनही गेला असेल. आता त्याला काही अडचण आली (मोबाइल बाबांनी मागितला, क्लासमध्ये सोबत मोबाइल नेण्याला मनाई असेल) आणि त्याचा निरोप मैत्रिणीला लगेच मिळाला नाही तर तीही मला (किंवा इतर कोणाला) फोन करून ‘आजकालची मुले किती प्रॅक्टिकल झाली आहेत, त्यांना मुलींच्या भावनांची कदरच नसते इ.’ बोलू लागेल. तसेच भावनाताईंचेही आहे. परगावी असणाऱ्या मुलाने वाढदिवसाला फोन केला नाही म्हणून त्या वैतागल्या असतील, तर सकाळपासून कामात बुडालेला तो गर्दीतले धक्के खात रात्री घरी परतला असेल तर आईचे रागाचे मेसेज पाहून कावून गेला असेल. कदाचित त्याला तेव्हा आपण शाळेत असताना आई-बाबांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सतत काहीतरी नाटक करीत असू, पण ते आपल्याला वेळ न देता खाऊ, खेळणी देत आणि ‘आम्ही किती बिझी आहोत’ हेच सांगत असत याची आठवण आली असेल. मी ही दोन उदाहरणे म्हणून घेतली. तिथे असेच काही घडले असेल असे नाही. प्रश्न हा आहे की येथे साऱ्यांनाच प्रेम, जिव्हाळा हवा आहे. पण त्यासाठी हवा संवाद, दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची, तिच्या अडचणी, मर्यादा, दुःखे जाणून घेण्याची संवेदनशीलता. त्यात आपण कमी पडतो का? म्हणजे कोणत्याही नात्यात आपण ज्या गोष्टींची अपेक्षा दुसऱ्याकडून करतो, त्या आपण पूर्ण करतो का? घेण्याची अपेक्षा ठेवताना आपण देण्यात कमी पडतो का, हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत. किशोरच्या मैत्रिणीच्या कितीतरी अडचणी असू शकतील. मुळात तिला किशोरबद्दल ‘हा आपल्या वर्गात किंवा क्लासमध्ये शिकणारा एक मुलगा’ या पलीकडे काही वाटत-जाणवत नसेलही. तिने त्याचा व्यक्ती, मित्र म्हणून विचारही केला नसेल. कारण परिचयाच्या प्रत्येक मुलाचा ती असा विचार करू लागली तर तिने अभ्यास वगैरे तरी केव्हा करायचा? त्याला काय हवे आहे, त्याला भेटणे, त्याच्याशी बोलणे ठीक राहील का, घरी काय म्हणतील, बाहेर काय चर्चा होईल, तसे असंख्य प्रश्न तिला पडणे स्वाभाविक आहेत. किशोरने त्याचा विचार न करता ‘मी म्हणतो तेव्हा तू का उत्तर देत नाहीस?’ असे प्रश्न करायला सुरुवात केली तर त्यांची मैत्री सुरू होण्याआधीच संपेल. त्या दोघांनाही या नात्यातून काय हवे आहे हे स्पष्ट नसेल तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. त्यातही किशोरने ती माझ्याशी न बोलता तमक्याशी का बोलते, असा विचार सुरू केला की मैत्री झाली तरी तुटेल. कोणत्याही नात्यात मालकी हक्काची भावना आली की त्यातील प्रेम नष्ट होते हे नक्की. बहुतेक लोक मालकी हक्क म्हणजेच प्रेम असे मानतात हे दुर्दैव प्रेमाचे आणि त्यांचेही. आपण सारेच जुन्या-नव्या पिढीची माणसे अतिशय संवेदनशील आहोत. पण ते घेण्याच्या बाबतीत. आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला कोणी समजून घेत नाही, असे आपल्याला वाटते. पण आपण दुसऱ्याला समजून घेण्यात कमी पडतो का? त्याला/तिला हवा तेव्हा आपला वेळ, संवेदना, कन्सर्न आपण देतो का, याचाही आपण विचार करायला हवा. तरुण पिढीच्या बाबतीत माझा अनुभव सांगतो की ती पुरेशी नव्हे, तर जरा अधिकच संवेदनशील आहे. तिच्या काळजाला हात घातला तर ती भडाभडा व्यक्त होते. ती गोंधळलेली आहे. तिला ही व्यवस्था समजून घेता येत नाही, तिच्यावर अपेक्षांची ओझी लहानपणापासून लादली जातात, जराही मोकळा श्वास घ्यायला फुरसत मिळत नाही. मागच्या पिढीच्या वाट्याला आलेल्या अनेक गोष्टी –फुरसतीचा वेळ, खेळणे, स्वतः हाताने वस्तू बनवणे, कलेचे ग्राहक न होता निर्माते होणे इ. तिला मिळाल्या नाहीत. या मुला-मुलींच्या वाट्याला एक गोष्ट मात्र प्रमाणाबाहेर आली आहे – ती म्हणजे आई-वडिलांच्या त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा. आई-बाबांना जन्मात ज्या गोष्टी फारशा जमल्या नाहीत, त्या मुलांनी लहानपणीच करून दाखवाव्यात अशा त्यांच्या अपेक्षा असतात. या पिढीलाही मग अपेक्षांच्या बदल्यात मागण्याची व मागणी लगेच पूर्ण होण्याची सवय झाली आहे. मग वर्गात शिक्षक रागावले, आईने मोबाइल हिसकावून घेतला, एखाद्या परीक्षेत अपयश आले, ब्रेकअप (?) झाला की ही प्रॅक्टिकल पिढी अति संवेदनशील होऊन टोकाची प्रतिक्रिया देते. प्रेम मागणाऱ्या प्रत्येकाला प्रेम द्यायला शिकावेच लागेल. विंदा करंदीकरांच्या शब्दांत सांगायचे तर.. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ॥ तुम्हीही एक दिवस देणारे हात व्हाल या अपेक्षेत,

तुमचा मित्र. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...