आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरीमा स्पेशल:मंत्रमुग्ध गंधाचा शोधप्रवास...

ललित मुस्कान शेख4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी दहावीत असतानाची गोष्ट. ऑक्टोबर महिना. शरद ऋतूची सुरुवात झालेली. प्रथम सत्राच्या परीक्षा तोंडावर आलेल्या. एका रात्री मी काही कामानिमित्त घराबाहेर निघाले होते. अभ्यास, परीक्षा याबद्दल डोक्यात गोंधळ सुरू होता. त्यात बाहेरचा थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता. त्या अंधारात पारिजातकाची, स्वस्तिकची फुलं खुलून दिसत होती. त्या जाईचा सडा, जास्वंदाची डौलदार फुलं, निसर्गाने जुळवून आणलेला तो प्रसंग मी अनुभवत होते. परीक्षेची हुरहूर, अभ्यासाचं टेन्शन होतंच. परंतु तेव्हा ते वातावरण प्रिय वाटत होतं. मनाला आल्हाद देत होतं. ऐन परिक्षेच्या तणावात ही अशी सुंदर वातावरणाची मेजवानी मला मिळाल्यासारखे वाटले. मला फक्त तेच अनुभवायचं होतं थोडावेळ म्हणून मी हळुवार डोळे मिटले आणि एका नवीन, वेगळ्या, मनमोहक सुगंधाने मला भानावर आणलं. यापूर्वी कधीच न अनुभवलेला तो सुगंध. तेव्हा निर्माण झालेल्या त्या वातावरणात अजूनच भर पडल्यासारखे मला वाटले. चोहीकडे नजर फिरवून मी पाहिलं, परंतु कोणतंच फुलझाड दिसलं नाही. क्षणात तो सुगंध नाहीसा. माझ्या अस्थिर मनाने बाबांना त्याबद्दल विचारलं. त्यांनाही माहीत नसल्याने अगरबत्तीचा असावा असे बाबा म्हणाले. ‘अगरबत्तीच्या सुगंधाने’ अखेर माझ्या भाबड्या मनाची समजूत काढली. त्यानंतर पुढे काही दिवस तो सुगंध येतच राहिला, परंतु तो सुगंध अगरबत्तीचा आहे असे मनाला सांगत मी स्वत:ची समजूत घालत राहिले.

पुढे काही दिवसांनी गावाकडे जाताना बसच्या खिडकीत बसून झाडांची रांग बघत होते. आणि पुन्हा तो सुगंध. आता रस्त्याच्या कडेला घनदाट जंगलात निर्मनुष्य ठिकाणी कोण बरं अगरबत्ती लावेल? सुगंध तर अगरबत्तीचा नाहीच याची खात्री झाली. मग कशाचा? कोणतं झाड असावं? कोणती फुलं असावी, जी दृष्टीसही पडत नाहीयेत या विचारांनी मला अस्वस्थ केलं. एका सकाळी शाळेत जाताना स्कूल व्हॅनच्या प्रतीक्षेत उभी होते. पुन्हा एकदा त्या सुवासिक गंधाने मला तृप्त केलं...

“ मम्मी, कितनी अच्छी खुशबू है... भिनी भिनी.. मिठी सी पता नहीं किसकी है.’ “वो सामने जो पेड है ना उसकी है.’

आईने सांगितल्यानंतर मी एकदम डोळे टवकारत समोरच्या झाडाकडे बघितलं. अरेच्चा! काखेत कळसा नि गावाला वळसा. हे झाड तर आपल्याला रोज दिसतं. तरी कसं लक्षात आलं नाही. अगदी ते छोटंसं झुडूप होतं तेव्हापासून मी त्याला बघत होते. तोपर्यंत त्याला फुलंही आली नव्हती. त्याच्या त्या सुंदर ‘इंफ्लोरेसेन्स’कडे माझं कधी लक्षच गेलं नव्हतं. गेल्या वर्षी आईबरोबर फिरताना ते झाड दिसलं. त्याबद्दल जाणून घ्यायचंच असं ठरवलं. पण त्यावेळी मला त्याचं नाव माहिती नव्हतं. मग लक्षात आलं, अरे आपल्याकडे गुगल आहे, परंतु सर्च काय करणार. काहीच माहीत नव्हतं. मग आपला स्वाभाविक गुण म्हणून सर्च बारमध्ये लांबलचक ओळ मी टाईप केली, A tree whose flowers blossom in the month of october and has very pleasant fragrance.. आणि search.Alstonia scholaris.....सप्तपर्णी....the blackboard tree...अरे..... हेच का सप्तपर्णीचं झाड? हे नाव कळल्यावर गड जिंकल्यासारखा आनंद झाला. मी या अगोदरही सप्तपर्णी हे नाव ऐकलं होतं, परंतु त्याला मोरपंखीचं झाड समजत होते. त्याचं मूळ रूप मला ठाऊक नव्हतं. मी गेल्या चार वर्षांपासून या ‘सप्तपर्णी’च्या शोधात होते. त्याचा सुगंध माझ्या मनात दरवळत होता. त्याला शोधण्याची आठवण करून देत होता. त्या सुगंधाचा मी पाठलाग करत होते. सप्तपर्णीच्या शोधाचा प्रवास मला खूप काही शिकवणारा होता. झाडांबद्दलच्या माझ्या आकर्षणात, माहितीत भर पाडणारा होता. कॉलेजमधील ग्राउंडच्या कडेला असलेल्या सप्तपर्णीच्या रांगेला आता दररोज बघताना त्याच्या शोधाचा संपूर्ण, सुंदर प्रवास एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरून जातो. आणि मी मंत्रमुग्ध होते... संपर्क : muskanshaikh16114@gmail.com

बातम्या आणखी आहेत...