आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:निरोप आणि स्वागत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. त्या नियमानुसार आपण नुकतेच नव्या वर्षाचे स्वागत केले. भारतीय लोकमानस उत्सवप्रिय असल्याने तो नेहमीच नवीन विचारांचे, नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असतो. नवे वर्ष म्हटले की, त्याच्या स्वागतासोबतच संकल्पदेखील ओघानेच आले. प्रत्येकाचा नव-वर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. पद्धती वेगळ्या असतात. हा ज्याच्या त्याच्या आनंदाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षाचे स्वागत आपापल्या घरी, मंदिरात दिवा लावून परिवारासोबत करायचे की, बार-रेस्टॉरंटमध्ये मद्यप्राशन करून रस्त्यावर ओरडा करत फिरायचे..? नववर्षाचे स्वागत सामाजिक भान जपून उत्साहपूर्ण वातावरणात केलं गेलं पाहिजे, ही सगळ्यांचीच मनापासून इच्छा असते. केवळ काही पश्चिमी देशांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? या गोष्टीचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी बिअर बार आणि पार्ट्या चालू राहाव्यात म्हणून आता सरकारनेच पहाटेपर्यंत परवानगी दिल्यामुळे नव्या वर्षाची पहिली सकाळ उजाडेपर्यंत मद्यपींनी नको त्या गोष्टींचा आनंद घेतल्याचं चित्र दिसतं. महाराष्ट्रात दारुबंदी करण्याची मागणी काही गटांकडून जोर धरत असताना रात्रभर दारू पिण्याची परवानगी देणे समाजाच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, हा नक्कीच चिंतनाचा विषय होवू शकेल. अर्थात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करणे हा काही अपराध नाही, पण त्या तथाकथित सेलिब्रेशनचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतलीच पाहिजे. स्वागत किंवा सेलिब्रेशन म्हणजे दारू पिऊन ओरडाओरड करणे, वाटेल तसा धिंगाणा घालणे, कानठळ्या बसतील एवढ्या मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक किंवा डीजे लावणे, महिलांची छेड काढणे नव्हे. या गोष्टी लक्षात घेऊन सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा आनंद घेतला गेला पाहिजे. प्रारंभ म्हणजे सुरुवात. सरत्या वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींना विसरून नवीन सूर्योदयाला नमन करून नव-संकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, देशाचा आणि संस्कृतीचा अभिमान ठेवून सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने काही चांगले करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. राज्यातीलच नव्हे, तर देशातील मूठभर शेतकरी वगळता अन्य शेतकरी हलाखीच्या अवस्थेत आहेत. बळीराजा निराशेच्या गर्तेत सापडल्याने आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहे. जगाचा पोशिंदाच या अवस्थेत जगत असताना, नशेत झिंगण्यापेक्षा त्याला मदत करण्यासाठी संकल्प केलेला केव्हाही चांगला. यावर शासनासोबतच आपणही विचार केला पाहिजे. सध्याच्या आधुनिक विज्ञान युगात माणूस फार प्रगत झालाय. पण, या प्रगतीच्या नादात तो एखाद्या निर्जीव यंत्राप्रमाणे आजूबाजूच्या परिस्थितीचा कुठलाही विचार न करता स्वकियांना आणि नैतिक मूल्यांनाच चिरडतच चाललाय. संवेदना, माणुसकी हे शब्द त्याच्या कोशातून हद्दपार झालेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षात माणूस म्हणून जगण्याचा आणि माणुसकीच्या नात्याने कुवतीनुसार गरजवंतांना मदतीचा हात देण्याचा संकल्पही करता येईल. छोटे छोटे संकल्प भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे स्वत:साठी आणि प्रियजनांचे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण होण्यासाठी काही संकल्प नक्कीच केले पाहिजेत. सरत्या वर्षात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांच्या, गोष्टींच्या आठवणीने मन हळहळत असेल तर नवीन वर्षाबद्दल कमालीचे कुतूहल आणि तितकीच अनामिक भीती देखील वाटते. पण, ‘जुने जावू द्या मरणालागुनी.. जाळूनी किंवा पुरूनी टाका’ या कवितेच्या ओळीप्रमाणे सर्व नकारात्मक भावना दूर करून नव्या उत्साहाने नववर्षाचे स्वागत करायला हवे. काळ बदलला तरी काही होत नाही, पण विचार बदलले तर समाज बदलत असतो. त्यामुळे या येणाऱ्या नवीन वर्षात आपण आपल्या विचारात आणि आचारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करीत नवीन वर्षाचे स्वागत करूया... आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा! श्रीपाद टेंबे संपर्क : ९१५८०८८०४२

बातम्या आणखी आहेत...