आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:भय इथले संपत नाही..

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक अनामिक भीती स्त्रीच्या आयुष्याला पुरून उरलीय. अगदी नकळत्या वयात भीती दाखवली जाते की बाई, आपल्या पायरीनं राहा. पायरी विसरलीस की संपलीसच म्हणून समज. बाळपणी या पायरीची पदोपदी करून दिलेली जाणीव उभी हयात तिची पाठ सोडत नाही.

ए का निवांत क्षणी परवीन शाकीर वाचत होते. एक शेर डोळ्यापुढे आला आणि जीव थरथरला... खिली फजां है, खुला आसमां भी सामने है मगर ये डर नहीं जाता, अभी सुरंग में हूँ

वाचताक्षणी भयाची एक लकेर देहाच्या कणाकणात पसरत गेली. अगदी स्वच्छ, नितळ आकाश, मोकळं वातावरण. पण एखाद्या अंधाऱ्या भुयारात असल्यागत दडपलेली छाती...वाटलं, खरंच आहे की...तसं आजूबाजूला असलेलं वातावरण बरं आहे, किमान तसं भासतं तरी..ती आधुनिकता की काय म्हणतात, तीसुद्धा आहे. शिक्षण, स्वातंत्र्य वगैरे आहेच. एकूण काय तर सबकुछ बऱ्यापैकी “गुडी-गुडी’ सुरू आहे. पण स्त्रीची स्थिती एखाद्या भेदरलेल्या सशासारखी आहे, यात दुमत नाही. एक अनामिक भीती जणू तिच्या आयुष्याला पुरून उरली आहे. नेमकी कशाची भीती आहे हो ही ?

अगदी नकळत्या वयात भीती दाखवली जाते की बाई, आपल्या पायरीनं राहा. आपली जागा, आपली पायरी विसरलीस की संपलीसच म्हणून समज. बाळपणीच या पायरीची पदोपदी करून दिलेली जाणीव मग उभी हयात तिची पाठ सोडत नाही. वरवर सगळं काही आलबेल आणि स्त्रिया आत खोलवर भयभीत. माझी एक विद्यार्थिनी साधी हाक जरी मारली तरी दचकायची. खूपदा त्या मुलीच्या दचकण्याची जाणीव झाली. प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतच असतो. त्या मुलीला विश्वासात घेऊन तिच्या दचकण्याचं कारण विचारलं. जे कळलं ते भयंकरच होतं. ती जन्मली तेव्हा इस्पितळात तिचे आजोबा तलवार घेऊन तिला मारायला आले होते. मोठ्ठा गोंधळ झाला आणि कसंबसं तिला वाचवलं गेलं. पुढे हा प्रसंग अजाणतेपणीच तिला कळला आणि तेव्हापासून तिच्यावर उगारली गेलेली ती तलवार तिच्या मनावर कायमच लटकत राहिली. भीती अशी कोरली जाते आणि कायम राहते.

कानपूर (आणि त्यानंतर कित्येक ठिकाणी) वडिलांची हुंडा द्यायची ऐपत नाहीये म्हणून बहिणींनी केलेल्या सामूहिक आत्महत्या कुणाला आठवणार नाहीत? आमचे एक परिचित त्या वेळी म्हणाले होते, लग्न होत नाही, यात मरण्यासारखं काय आहे? लग्नच नाही ना होणार? नाही तर नाही...लग्नावाचून एवढं काय अडलंय ? फार सुखी आणि सुरक्षित असलेल्या त्या पुरुष जीवाला कसं सांगणार की हे सगळं वरून दिसतंय तेवढं सोपं नाही बाबा. लग्न स्त्रीसाठी केवळ देह, जीभ आणि (जिवंत असेल तर ) मनाचे चोचले पुरवणारी गोष्ट नाही. लग्नाला असलेले आतले पापुद्रे खरवडून काढा, मग कळेल. त्या बहिणी भीतीने गेल्या. बापाकडे पैसा नाही तर हुंडा नाही, हुंडा नाही तर लग्न नाही (आणि खरंच लग्न न झाल्यामुळे का ssही आभाळ कोसळत नाही ) पण अशी एकटी स्त्री पाहिली की आलम दुनियेला ती आपलीच आहे असं वाटतं, त्याचं काय? तिचं साधं बोलणं, साधं हसणं, किंचित नीटनेटकं राहणं आणि त्यातून हजार अर्थ काढले जातात. सर्वेश्वर दयाल फार सुरेख लिहितात-

उसने झरने से मुंह धोया पेड़ का फल खाया और घास पर सो रही है झरना, पेड़, घास तीनों सोच रहे हैं वह किसकी है

काय ते साधं सामाजिक व्यवहारांतर्गत एकमेकांची मदत घेणं-करणं. पण जेव्हा हाच व्यवहार स्त्रीसोबत असतो तेव्हा नकळत आधी तिची उपलब्धता चाचपली जाते. धबधब्याच्या पाण्याने हजारो लोक चेहरा धुवत असतील, हजारो लोक झाडाची फळं खात असतील आणि गवतावर पहुडत असतील. पण सर्वांना खुलेपणाने सोयी उपलब्ध करून देणारा धबधबा, झाड आणि गवत ‘तिच्या’ कडे मात्र उपलब्ध-उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात. ‘आपण उपलब्ध वस्तू आहोत’ ही जाणीवच जिवंतपणी मरणयातना देण्यासाठी पुरेशी आहे. ही अशी मदत करणारा घरचा असू शकतो, बाहेरचा असू शकतो. हे अवघड जागेचं दुखणं सांगता कुणाला ? कोण समजून घेणार ? इथं बोलण्याची सोय तर नाहीच नाही. अमृता प्रीतम म्हणतात नं,

उगी हूँ पिसी हूँ बेलन से बिली हूँ आज गर्म तवे पर जैसे चाहो उलट लो ...अन्नदाता मेरी जुबाँ और इन्कार यह कैसे हो सकता है

होय, स्त्री आणि इन्कार हे समीकरण आम्हाला मान्य नाही. यामुळेच तर पाळण्यातली पोर ते ऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत बाईला अत्याचार सोसावे लागतात, चेहऱ्यावर शरीरावर अॅसिडचा जाळ पेलावा लागतो, शे-दोनशे मीटर फरफटत नेल्या गेलेल्या देहावर सतरा वार सोसावे लागतात आणि एवढ्या जखमा झेलूनही जखमेवर मीठच चोळलं जातं की टाळी एका हाताने वाजत नाही. अहो, वाजत असेल वा नसेल. पण नात्याच्या कुठल्याही टप्प्यावर ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार स्त्रीच्या बाबतीत गृहीतच धरला जात नाही. मग जिवंतपणी बाई कुत्र्यासारखं जगण्याला व मरण्याला भिते आणि मेल्यानंतरच्या बदनामीची कल्पना करत घाबरत अर्धमेली होत राहते, अत्याचार सोसत राहते.

घरीदारी नवऱ्याचं, बापाचं, भावाचं ‘छत्र’ माझ्यावर आहे, असं भासवत जगणाऱ्या स्त्रिया किती भयभीत असतील, याची कल्पना करा. घरात-बाहेर चारित्र्यावर उडालेले शिंतोडे पुरुषासाठी पुरुषार्थाच्या खुणा असतीलही, पण स्त्रीसाठी जगणं असह्य करणाऱ्या वेदना असतात. नवरा टाकून देईल, बाप-भाऊ वाऱ्यावर सोडतील, पोरगा विचारणार नाही यापासून ते समाज फायदा घेईल इथपर्यंत लाखभर विचाराने ती घाबरलेली असते. एखादी मदतनीस ताई पाय पसरून बसलेल्या मालकाला घाबरलेली असते, एखादी कारकून बाई ऑफिसमध्ये बॉसच्या केबिनमध्ये एकटी जायला घाबरलेली असते, बाहेर जायला निघालेल्या आपल्या तरण्या लेकीसोबत तिच्या बारक्या-शेंबड्या भावाला पाठवणारी आईसुद्धा घाबरलेली असते, चॉकलेट देणाऱ्या अंकलच्या मांडीवरल्या किळसवाण्या स्पर्शाला इवलीशी पोरगी घाबरलेली असते...किती किती रूपं सांगावी या भीतीची ?

घरात-घराबाहेर, बाजारात, शाळा-कॉलेजात, कामकाजाच्या ठिकाणी...सगळीकडेच भीती आहे...नुसती भीती. भीतीच भीती. ही भीती संपत नाहीये, याची भीती आम्हाला किती भिववणार?

भारती गोरे - संपर्क : drbharatigore@gmail.com

बातम्या आणखी आहेत...