आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिंग टॉकीज:अज्ञाताची भीती अनामिक...

भक्ती चपळगावकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सा ध्यासुध्या गोष्टींतून लोकांना घाबरवण्याचा हिचकॉकला नाद. तो एकदा म्हणाला, ‘मला लोक विचारतात की, तुम्ही कॉश्च्युमपट का करत नाही? मी त्यांना सांगतो, कारण तसले कपडे घालून कुणी टॉयलेटला जात नाही!’ म्हणजे मुद्दा काय, तर भीती कधीही कुठेही वाटू शकते. भीती ही मानसिक स्थिती आहे. बहुतेक वेळा एखादी गोष्ट घडायच्या आधी ही स्थिती निर्माण होते. कधीही न पोहलेल्या व्यक्तीला पोहायची भीती वाटते. परीक्षेच्या आधी पेपरची भीती वाटते. भुताची भीती तर अजून गंमतशीर! त्याला कधीच बघितलं नसताना त्याची भीती वाटते. भूत असलं तर मला काहीतरी करेल, असं वाटणं म्हणजे भुताची भीती. अशाच एका अतर्क्य भीतीभोवती अल्फ्रेड हिचकॉकचा ‘द बर्ड््स’ हा सिनेमा वावरतो. बर्ड अर्थात पक्षी. माणूस निर्माण होण्याच्या आधीपासून पृथ्वीवर वावरणारे हे निरुपद्रवी जीव अचानक सैतान बनले तर काय होईल? या भीतीदायक कल्पनेवर या चित्रपटाची गोष्ट आधारित आहे.

मेलनी डॅनियल्स (टिपी हेड्रन) आणि मिच ब्रेनर (रॉड टेलर) सॅन फ्रॅन्सिस्को शहरात एका पक्ष्यांच्या दुकानात भेटतात. मेलनीला थट्टामस्करीची सवय आहे. पहिल्याच भेटीत तिला मिच आवडतो. मिचला त्याच्या बहिणीला, कॅथीला वाढदिवसानिमित्त लव्ह बर्ड भेट द्यायचे आहेत. मिच त्याच्या बोडेगा बे या गावी परतल्यानंतर मेलनी लव्ह बर्ड््स घेऊन त्याच्या मागोमाग त्या गावी जाते. मिचला न कळवता त्याच्या घरी लव्ह बर्ड््स ठेवायचे आणि परत जायचं, असा मेलनीचा प्लॅन आहे. समुद्राला लागून असलेल्या मिचच्या एकाकी फार्मवर लव्ह बर्ड््सची जोडी ठेवून परत जाताना मिच मेलनीला पाहतो आणि ‘तू कॅथीचा वाढदिवस साजरा करूनच जा,’ अशी गळ घालतो. मेलनीला तसेही मिच आवडलाय आणि ती बिनधास्त आहे. ती त्याच गावात राहणाऱ्या अॅनी नावाच्या मिचच्या पूर्वीच्या प्रेयसीकडे रात्री राहण्याचे ठरवते. तिची आणि अॅनीची लगेच मैत्री होते. मिचवर हक्क गाजवणाऱ्या आईला त्याने कुणाशी संबंध ठेवणे मान्य नाही आणि याच कारणाने अॅनी आणि मिच दूर झाले हे मेलनीला कळते. मिचने कॅथीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण मेलनीला दिल्याचे त्याच्या आईला आवडत नाही. तिला मेलनी तर अजिबात आवडत नाही. पण, मिच त्याकडे दुर्लक्ष करतो.

हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे बोडेगा बेच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर गोळा होऊ लागतात. कॅथीचे मित्र-मैत्रिणी घराबाहेर खेळत असताना अचानक पक्षी मुलांवर हल्ले करू लागतात. मेलनी, मिच आणि मिचची आई कसेबसे त्यांना घरात आणतात, पण अनेक मुलांना पक्षी जखमी करतात. काय सुरू आहे, हे सुरुवातीला कुणालाच कळत नाही. त्याच संध्याकाळी मिचच्या घरी चिमणीच्या पाइपमधून चिमण्यांचा थवा येतो आणि घरच्यांवर हल्ला करतो. पोलिसांना बोलावल्यावर, ‘यात आम्ही काय करू?’ असा प्रतिप्रश्न ते विचारतात. अशा परिस्थितीत तू परत जाऊ नकोस, असं मिचने सांगितल्यावर मेलनीअॅनीकडचा मुक्काम वाढवते. दोघींमध्ये चांगली मैत्री होते.

मिचच्या शेतावरच्या कोंबड्या अचानक खाणंपिणं सोडून देतात. ज्याने कोंबड्यांचा खुराक विकला आहे, त्या शेतकऱ्याकडे मिचची आई वैतागून तक्रार करायला जाते. त्याच्या घरी भयाण शांतता आहे, घरावर सगळीकडं ओरखडे आहेत, तावदानं फुटली आहेत, वस्तू विखुरलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी कोपऱ्यात पक्ष्यांच्या भीषण हल्ल्यात मेलेला शेतकरी पडलेला आहे... या दृश्याचा मिचच्या आईला जबरदस्त धक्का बसतो. ती कशीबशी ट्रक चालवत घरी येते आणि कोसळते. झाला तो प्रसंग ऐकल्यावर शक्य तितक्या लोकांना घरी बसायला सांगायचे मिच ठरवतो. शाळेत गेलेल्या कॅथीला परत आणायला मेलनी जाते. पण शाळा सुरू आहे, त्यामुळं तोवर तू बाहेर बस, मग आपण मुलांना घरी सोडू, असे अॅनी मेलनीला सांगते. शाळा संपेपर्यंत मेलनी बाहेरच्या एका बाकावर बसते. तिच्या मागे एका खांबावर एक कावळा बसलाय. ती तिच्याच नादात आहे, त्या कावळ्याकडं तिचं लक्ष नाही. हळूहळू एक एक करत शेकडो कावळे तिथे जमा होतात. जणू आज शाळेवर हल्ला करायचा आहे, असं त्यांनी ठरवलंय. मेलनीला अचानक लक्षात येते, तिच्यामागे शेकडो कावळे जमा झालेत. ती जिवाच्या आकांताने शाळेत शिरते. मेलनी आणि अॅनी मिळून मुलांना शाळेबाहेर काढतात. मुलं पळत असतात आणि वरून पक्षी त्यांच्यावर हल्ला चढवत असतात. काहीही दोष नसलेली, काही क्षणांपूर्वी आनंदी असलेली निरागस मुलं, हिंस्र पक्ष्यांच्या हल्ल्यातून जिवाच्या निकराने वाचायचा प्रयत्न करतात.

बोडेगा बेमध्ये पक्ष्यांचे तांडव यानंतर वाढत जाते. जागोजागी पक्षी हल्ला करतात. प्रत्येक प्रकारचे पक्षी हल्ला करतात. नीरव शांतता असलेल्या या गावातले लोक जीव वाचवण्यासाठी घरी लपून बसतात, पण पक्षी तिथेही त्यांना सोडत नाहीत. मिच, मेलनी, कॅथी, मिचची आई अशा भयाण दहशतीत घरात रात्र घालवतात. पक्षी मात्र बाहेर बसून आहेत. एक छोटी चूक झाली तर आणि पक्षी आत येतील अशी स्थिती. घरातल्या काही जागा बंद करायला मिच आणि मेलनीला जमले नाही. तिथून पक्षी येतील याचा अंदाज त्यांना आलेला नाही. या काळरात्रीत एका कोपऱ्यात मेलनीने कॅथीसाठी आणलेली लव्ह बर्डची जोडीही आहे. आश्चर्य म्हणजे पिंजऱ्यातले हे दोन पक्षीच फक्त हल्लेखोर बनलेले नाहीत. ब्रेनर कुटुंब आणि त्यांच्या आयुष्यात आलेली नवी व्यक्ती, मेलनी या दहशतीच्या सावटावर मात करायचा कसा प्रयत्न करतात, ही गोष्ट पडद्यावर बघणे खूप रंजक आहे. त्यातले नाट्य, छातीतली धडधड वाढवणारी दृश्ये पडद्यावर अनुभवणंच बेस्ट!

पक्षी हल्लेखोर का बनतात? माणसांवर हल्ला करण्याची प्रेरणा त्यांना का मिळते? त्यांचा हल्ला थांबतो का? याची कारणं हिचकॉक देत नाही. ही घटना, हा हल्ला याचा अर्थ ज्याने त्याने स्वतःच लावावा, असं कदाचित त्याला सांगायचं आहे. कॅलिफोर्नियात १९६१ मध्ये अचानक सीगल पक्षी झुंडीने चालून आल्याची बातमी त्यानं वाचली होती. त्यातून त्याला या चित्रपटाची कथा सुचली. अशाच कथानकाची एक कथा त्याच्या वाचनातही आली होती. या दोन्हीची सरमिसळ करून त्याने हा सिनेमा बनवला. या चित्रपटातून त्याला काय सांगायचे आहे याबद्दल सिनेरसिकांनी आपापल्या परीने निष्कर्ष काढले. काही म्हणतात, निसर्गाला गृहीत धरू नका, असं त्याला म्हणायचं होतं. तर काही म्हणतात,

मेलनीने मिचच्या शांत आयुष्यात प्रवेश करणे आणि हा हल्ला याची वेळ एकच आहे. यातून त्याला काही सुचवायचं आहे. मुलावर जिवापाड प्रेम आणि अधिकार असलेली आई त्याच्या प्रेयसीच्या आगमनाने भांबावून जाते. तिचा दुःस्वास करते. कारण आता मुलगा मला सोडणार, असं तिला वाटतं, तीच प्रेयसी मदतीसाठी तिच्याकडं आल्यावर ती कुठंतरी सुखावते. आता तिने मेलनीला स्वीकारलं आहे आणि दुसरीकडे पक्ष्यांच्या हल्ल्यातूनही ते सुटका करून घेत आहेत. यातून संभव आणि असंभव यांचा कुठंतरी मेळ घातला आहे. तर कुणाला वाटतं, की माणसाच्या आयुष्यातल्या प्रेम आणि हिंसा या दोन गोष्टींचा ठाव घेण्याचा हा प्रयत्न आहे.

साठ वर्षांपूर्वी बनवलेला हा चित्रपट आजही तितकाच समर्पक वाटतो. माझ्या मते, आजची समाजमाध्यमे ‘बोडेगा बे’सारखे गाव आहे. इथे सगळे जण एकत्र येतात. ट्रोल्सच्या रूपातले हिंसक पक्षी अचानक सगळ्यांवर हल्ला करू लागले आहेत. तुम्ही आपल्या घरी बसला नाहीत, मते मांडत आपलं अस्तित्व दाखवलंत तर ते हल्ला करणार! मग तुम्हाला घरात बंदिस्त व्हावं लागणार आहे. घरी शांत बसूनही तुम्हाला मोकळेपणानं व्यक्त होता येतं असं वाटत असंल तर तो तुमचा गैरसमज आहे. ते तिथंही येतील आणि तुम्हाला बाहेर ओढून काढतील. जोपर्यंत तुम्ही रक्तबंबाळ होत नाहीत तोपर्यंत...

बातम्या आणखी आहेत...