आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकु स्ती हा क्रीडा प्रकार जगातील अतिप्राचीन क्रीडा प्रकारांत गणला जातो. जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कुस्ती परंपरेचा प्राचीन इतिहास आढळतो. कुस्ती खेळाचे पारंपरिक रूप काळाप्रमाणे बदलले असले, तरी कुस्तीचा मुख्य गाभा, शक्ती आणि युक्ती याचा सुरेख संगम हाच राहिला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तिची अंगरक्षक झलकारीबाई लष्करी कवायतीत पारंगत होत्या. मल्लविद्या त्या काळच्या लष्करी कवायतीचा अविभाज्य भाग होता म्हणून असे म्हणता येईल की, त्या मल्लविद्येत पारंगत होत्या. प्राचीन ग्रंथांत महाराष्ट्रातील दोन महिलांनी कुस्ती खेळल्याचे उल्लेख आहेत. हर्सूल गावच्या सखुबाई सुरे यांनी १९०० सालच्या दरम्यान पीरबावडा या गावी पुरुष पैलवानाबरोबर कुस्ती खेळली तसेच सोलापूरच्या राहीबाई सोमवंशी यांनी हैदराबादच्या अमिनाबी हिला टांग या डावावर चितपट केल्याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी काही प्रसंगी एखाद्याच्या मृत्यूनंतरच संपणारी कुस्ती आज चितपटीवर आणि गुणांवर आधारित झाली आहे. पूर्वी तासन् तास चालणारी कुस्ती आज अवघ्या सहा मिनिटांवर आली आहे. पूर्वी बऱ्याच प्रदेशात स्त्रियांना बघण्यासही बंदी असलेली कुस्ती आज जागतिक पातळीवर स्त्रिया खेळत आहेत. शाहू महाराजांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतीय कुस्तीला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. कुस्तीगिरांबाबत त्यांच्याइतके कल्याणकारी धोरण दुसऱ्या कोणत्या राजाने राबवल्याचे आढळत नाही. कुस्ती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे धोरण होते. याच धोरणामुळे पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती संस्कृती रुजली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तालमींची संख्या जास्त असल्यामुळे महिला कुस्तीला पोषक वातावरण आहे. ग्रामीण भागात महिला कुस्तीबद्दल आस्था पाहावयास मिळते. मात्र, शहरी भागात कुस्तीच्या मूळ संकल्पनेलाच तडा गेला आहे. कुस्ती म्हटले की, दोन धिप्पाड शरीराचे पैलवान आणि त्यांच्या रेड्यागत चाललेल्या टकरा अशी काही लोकांची समजूत असल्याचे दिसते. मात्र, बदलत्या काळानुसार महाराष्ट्रीयन कुस्तीत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळेच कुस्ती खेळणाऱ्या महिला पैलवानांची संख्या वाढली आहे. आधुनिक काळात महिला ‘चूल आणि मूल’पर्यंत सीमित न राहता सर्वच क्षेत्रांत झपाट्याने पुढे येत असल्याचे दिसते. कुस्ती क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भारतात राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती १९९७ मध्ये हैदराबाद येथे प्रथम आयोजित करण्यात आली. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुलोचना खाटपे, पूनम मोकाशी, सुवर्णा शेडकर, संध्या पाणबुडे यांच्यासह इतर महिला पैलवानांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र महिला संघाचे पहिले प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक विलास कथुरे यांनी काम केले होते. तर, १९९८ मध्ये दुसरी राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान नाशिकला मिळाला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेद्वारे महिलांच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला १९९८-९९ पासून सुरुवात झाली. कुस्ती हा खेळ नेहमीच पुरुषप्रधान राहिला होता. मात्र, गेल्या दशकात भारतातील महिला पैलवानांनी ‘हम भी किसी से कम नहीं’ हे दाखवून दिले. रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये साक्षी मलिकने महिला कुस्तीमधील पहिले कांस्यपदक जिंकले. तसेच गीता-बबिता आणि विनेश फोगाट यांच्यासह इतर महिला पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली. विविध आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांत महाराष्ट्राच्या मनीषा दिवेकर, सोनाली तोडकर, कोमल गोळवे, स्वाती शिंदे, अंकिता गुंड, नंदिनी साळोखे, नेहा चौघुले, श्रुती येवले, भाग्यश्री-धनश्री फड, अहिल्या शिंदे, दीक्षा करडे, सोनाली मंडलिक, श्रवणी लवटे, आदींनी भरीव कामगिरी करत पदके मिळवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पैलवान श्रद्धा चोपडे हिने आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेतही पदक मिळवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची शृंखला रत्नपारखी हिने सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पहिले कांस्यपदक मिळवले. याच जिल्ह्यातील जेनिफर रॉड्रिग्ज, शीतल देवतवाल, स्मिता कसबे, स्नेह खरोटे, रूपाली वरदे, भाग्यश्री नैचे, छाया पवार, श्रुती बमनावत, तेजस्विनी बारवाल, शृंखला रत्नपारखी, सोनाली गिरगे, तृप्ती भवर, श्रद्धा चोपडे, कावेरी सुरासे, योगेश्वरी दापके, रेणुका गायके, मनीषा गिरे, वैष्णवी मालकर, आफरीन पठाण, अम्रीन सय्यद, प्रतीक्षा पवार, प्रतीक्षा गायकवाड, चंचल जंजाळ, गीता जारवाल, पल्लवी पांडव, वर्षा विधाते, श्रद्धा कचरे, पूजा सुरासे, मुक्ता जाधव, वर्षा राठोड, वीणा चौधरी, अक्षता भीरू, अश्विनी बोराडे, पल्लवी पानाव, आफरीम शेख, भक्ती कुंटे, खुशी डोंगरे, सीमा फत्तेलष्कर, कोमल काकरवाल, वर्षा इधाटे, सोनाली गिर्गे, शबनम शेख, नाहेदा जाफर इ. महिला पैलवानांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पदके मिळवली आहेत. महिला पैलवानांकरिता महाराष्ट्रात महाकाल कुस्ती संकुल (पुणे), सह्याद्री कुस्ती संकुल (वारजे), जोग महाराज व्यायामशाळा (आळंदी), आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल (श्रीगोंदा), त्रिमूर्ती कुस्ती संकुल (नेवासा), साई कुस्ती केंद्र (आमशी- कोल्हापूर), एनआयएस कुस्ती संकुल (कोल्हापूर), मुंबई साई सेंटर (कांदिवली), वसंतदादा कुस्ती केंद्र (सांगली), एकता व्यायाम शाळा (खुलताबाद), ताराराणी कुस्ती संकुल (अकलूज), धर्मवीर कुस्ती केंद्र (मुंगी), हनुमान व्यायामशाळा (बेगमपुरा) अशी अनेक छोटी-मोठी महिला कुस्ती केंद्रे विविध शहरांत आणि गाव-तांडे, वस्त्यांवर आहेत.
कुस्तीसारख्या खेळासाठी महिला पैलवान शारीरिक क्षमतांनी परिपूर्ण असणे आवश्यक असते. शारीरिक सुदृढता नसणाऱ्या महिला पैलवानांना दुखापती होण्याची संभावना अधिक असते. कुस्ती खेळण्यासाठी प्रशिक्षणाची सुरुवात वयाच्या सातव्या ते दहाव्या वर्षापासून सुरू करणे योग्य ठरते. महिला पैलवानांना कुस्ती खेळण्यासाठी सर्व प्रकारच्या शारीरिक क्षमतांची नितांत आवश्यकता असते. त्यात प्रामुख्याने शक्ती, वेग, दमदारपणा, लवचिकता, समन्वय, योग्यता आणि चपळता आहे. पैलवानांमध्ये शारीरिक क्षमतेचे सर्व घटक योग्य आणि सातत्यपूर्ण कुस्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित होत असतात. त्यावर पैलवानांचे स्पर्धेतील क्रीडा प्रदर्शन अवलंबून असते. निसर्गतः महिलांची शरीरयष्टी पुरुषांच्या तुलनेत नाजूक आणि क्लिष्ट असते. तरीसुद्धा कुस्ती प्रशिक्षणामध्ये महिला पैलवान पुरुष पैलवानांच्या बरोबरीने क्रॉस कंट्री, पाच ते दहा किलोमीटर अंतर धावणे, हजार-हजार सपाट्या म्हणजेच दंड-बैठक मारणे, दोरीवर चढणे, पोहणे, कुस्ती मॅटवरील विविध व्यायाम, सर्किट ट्रेनिंग, इंटरव्हल ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, फर्टलेट ट्रेनिंग आदी व्यायामांच्या माध्यमातून कुस्ती प्रशिक्षण घेतात. महाराष्ट्रातील ठराविकच महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रांत अशा प्रकारच्या सुविधा आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक तालमीत, तालुक्याच्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त हॉल, मॅट, जिम, मैदान, इतर प्रशिक्षण साधनसामग्री आणि प्रशिक्षित कुस्ती मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. उत्तम कामगिरी पार पाडण्यासाठी महिला पैलवानांना पोषक आहाराची मूलभूत गरज असते. पोषक आहारामुळे प्रामुख्याने शरीराची वाढ, झीज भरून काढणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आदी क्षमतांचा विकास होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला पैलवानांना प्रतिदिन सर्वसाधारण ४७०० ते ५५०० कॅलरीयुक्त आहाराची आवश्यकता असते. अशा संतुलित आहारासाठी महिन्याला किमान रु. २०,०००/- खर्च अपेक्षित असतो. महाराष्ट्रातील बहुतांश महिला पैलवान मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना कुस्तीसाठी लागणारा आर्थिक भार परवडत नाही. त्यामुळे बऱ्याच महिला पैलवान वेळेपूर्वी कुस्ती खेळणे सोडतात. शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आिण तिला पुढे लोकाश्रयही मिळत गेला. पुढे तशी स्थिती राहिली नाहीे. आजच्या राज्यकर्त्यांनी, व्यावसायिकांनी, उच्चभ्रू लोकांनी, क्रीडाप्रेमींनी पुढाकार घेतल्यास राज्यात महिला कुस्तीलाही सुगीचे दिवस येतील... { संपर्क : 9923585158
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.