आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:स्त्रीवाद : समज-गैरसमजांच्या पलीकडे...

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री-पुरुष विषमता, सर्व प्रकारच्या शोषण, विषमतेला नकार देणे हे स्त्रीवादाचे मध्यवर्ती सूत्र आहे. स्त्रीवाद हा केवळ स्त्रियांवरील अन्याय आणि मुक्तीविषयी बोलत नाही, तर जेथे शोषण, अन्याय होतो, त्याविरोधात तो आवाज उठवतो. स्त्रीवाद हा मानवमुक्तीची राजकीय जाणीव पेरणारा वैश्विक विचार आहे. त्याचे योग्य आकलन झाल्यास स्त्रीवादी म्हणवण्यातील संकोच गळून पडेल.

आज एकविसाव्या शतकात सामान्य नागरिक, शासन-प्रशासन, सार्वजनिक व्यवहारात ‘स्त्री-पुरुष’ समानतेचे तत्त्व मान्यता प्राप्त झालेले दिसते. म्हणजे आज कोणत्याही व्यक्तीला तुम्ही स्त्री-पुरुष समानता मानता का, असा प्रश्न विचारला तर बहुधा कुणीच नकारार्थी उत्तर देणार नाही. शासकीय प्रशासकीय स्तरावरदेखील मूल्य म्हणून स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार केलेला दिसतो. स्त्री-पुरुष समानतेची विचारधारा अशा पद्धतीने सर्वश्रुत होण्यामध्ये जगभरातील स्त्री संघटना, स्त्री चळवळीने उभारलेले लढे, संघर्ष व स्त्रीवादी विचारप्रवाह महत्त्वपूर्ण असलेले दिसतात. या सर्वांगीण प्रयत्नांचा परिणाम आज स्त्रियांच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली दिसते, स्त्रियांचं शिक्षण, रोजगार इ.तील प्रमाण वाढलेलं दिसून येईल, स्त्रियांसाठीचे अनेक कायदे, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न होताहेत. अशा रीतीने व्यापक दखल स्त्रीप्रश्नाची घेतली जातेय. स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्याच्या या अतिदृश्यतेमुळे काही जण २१वे शतक हे स्त्रियांचे शतक आहे, असं म्हणतात, तेव्हा खरंच स्त्री प्रश्नांची आज सोडवणूक झालीय का व स्त्रीवाद, लिंगभाव समानता ही मूल्ये आपण कितपत समजून-उमजून स्वीकारली आहेत ते पडताळून पाहिले पाहिजे.

स्त्री-पुरुष समानतेसंदर्भात, आम्ही स्त्री-पुरुष असा कुठलाच भेद करत नाही व आम्ही पूर्णतः स्त्री-पुरुष समानता मानतो. मात्र मी/ आम्ही स्त्रीवादी नाही, असाही एक सूर समाजामध्ये दिसतो. स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेण्याविषयी अशा प्रकारचा संकोच व भीती असण्याचे कारण स्त्रीवाद या संकल्पनेविषयी अनेक पूर्वग्रह व गैरसमज निर्माण केले गेले. स्त्रीवाद ही पाश्चात्त्य संकल्पना आहे, स्त्रीवाद किंवा स्त्रीवादी हे कुटुंब, लग्न, पती, मुलं नातेसंबंध यांना नकार देतात व स्त्रीवादी हे अतिशय नीरस व भावना, सौंदर्य, प्रेम न मानणाऱ्या कोरड्या, हेकेखोर व एकांगी असतात असा समज तयार करण्यात आलाय. तसेच स्त्रीवाद म्हणजे केवळ पुरुषांना दोष देणे, विरोध करणे, टोकाचा विचार करणे, तडजोडीला नकार देणे, खादीच्या साड्या घालणाऱ्या, कायम पुरुषांच्या विरोधात मोर्चे काढणाऱ्या स्त्रियांच्या चित्रणातून टीव्ही, चित्रपट इ. प्रसार माध्यमातून हेतुपुरस्सरपणे बिंबवण्यात आले. तसेच स्त्रिया या दुर्बल असतात त्यांचं सबलीकरण केले पाहिजे, किंवा केवळ स्त्रियांच्या प्रश्नाविषयी बोलणे, स्त्रियांच्या समस्या सोडवणे, किंवा ‘टाका आणि ढवळा’ या उक्तीप्रमाणे केवळ स्त्रियांचा सामावेश करून लिंगभाव समानता येते असे मानले जाते.

अशा प्रकारे स्त्री-पुरुष समानता व स्त्रीवादाविषयीच्या पूर्वग्रह व गैरसमजांमुळे खऱ्या अर्थाने स्त्रीप्रश्नाचे योग्य आकलन व सोडवणूक होताना दिसत नाही. स्त्रीप्रश्नाच्या ढोबळ आकलनामुळे स्त्रियांवरील हिंसाचार, शिक्षण, आरोग्य, रोजगार इ. विविध क्षेत्रांतील विषमता, भेदभाव व स्त्रियांचे समाजातील दुय्यमत्व आजही कायम आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की स्त्री-पुरुष विषमता हा केवळ स्त्री अथवा पुरुषाचा प्रश्न नसून हा व्यवस्थेचा प्रश्न आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रिया व पुरुषांमध्ये भेद करून पुरुषांना श्रेष्ठ तर स्त्रियांना दुय्यम ठरवते. स्त्री-पुरुषांचे समाजातील स्थान, भूमिका, काम तसेच गुणवैशिष्ट्येदेखील निर्धारित करते. त्यामुळे ही पुरुषांच्या विरोधातील लढाई नसून व्यवस्थेविरोधातील लढाई आहे. जगभरात बहुधा सर्वत्र ही व्यवस्था काम करताना दिसते. स्त्रीवाद ही स्त्रियांच्या ऐतिहासिक शोषण आणि दुय्यमत्वाची उकल करून त्यात परिवर्तन घडवून आणणारी जाणीव आहे. स्त्रीवादाची प्रबळ मांडणी आणि सुरुवात जरी पाश्चात्य देशात झालेली असली तरी पुरुषसत्तेविरोधातील स्त्रीवादी जाणीवा अनेक ठिकाणी विविध स्वरूपात दिसून येतात. त्यामुळे स्त्रीवाद हा एक नसून अनेक स्त्रीवाद आहेत शोषण आणि अन्याया विरोधाची जाणीव त्यांना एकत्र बांधते.

‘जे जे खासगी ते ते राजकीय’ या तत्त्वाची -मांडणी करत स्त्रियांच्या शोषणामध्ये कुटुंब, विवाह, मातृत्व या संस्था मध्यवर्ती भूमिका पार पाडतात आणि त्यामुळे खरी समानता निर्माण करायची असेल तर या सर्व संस्था व नातेसंबंधांची चिकित्सा करून बदल घडवण्याचा विचार स्त्रीवाद मांडतो. पण याचा अर्थ स्त्रीवाद हा कुटुंबविरोधी किंवा घरे तोडणारा असतो असे नाही. पण दोष दूर करून बदल घडवायचे असतील तर त्या दोषाविषयी बोलणे व ते दूर करणे क्रमप्राप्त ठरते.

शासन व प्रशासनालादेखील पुरुषसत्ताक पूर्वगृहातून मुक्त होण्याची गरज असते. कारण बऱ्याच वेळेस स्त्रियांसाठीच्या योजना, त्यांची भाषा व अंमलबजावणी पुरुषसत्ताक मानसिकतेतूनच केली जाते. उदा. शौचालयासाठी घराची ‘इज्जत’ म्हणजे स्त्रियांना घराबाहेर जाण्याची गरज पडू नये म्हणून घरोघर शौचालये बांधावी, केवळ गरोदरपण व बाळंतपण हेच स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न समजून स्त्रियांच्या आरोग्याच्या इतर प्रश्नांकडे केले जाणारे दुर्लक्ष इत्यादी. पुरुषांच्या अनुभवाला प्रमाण ठरवून ज्ञान, भाषा, शिक्षण, साहित्य, धर्म, संस्कृती इत्यादी संरचनांची निर्मिती पुरुषसत्ता करत असते. त्यामुळे स्त्रिया व त्यांचे अनुभव या सगळ्यांमध्ये अनुपस्थित राहतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सर्वांचे स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यात मूलभूत परिवर्तन करणे गरजेचे असते.

स्त्री-पुरुष विषमता, तसेच सर्व प्रकारच्या शोषण आणि विषमता यांना नकार देणे हे स्त्रीवादाचे मध्यवर्ती सूत्र राहिलेले आहे. स्त्रीवाद हा केवळ स्त्रियांवरील अन्याय आणि मुक्तीविषयी बोलत नाही तर जेथे जेथे शोषण आणि अन्याय होतो त्याविरोधात स्त्रीवाद आवाज उठवतो. त्यामुळे काळे, कामगार, शेतकरी, दलित, विस्थापित, गे-लेस्बियन, तृतीयपंथी इ. सर्व लढ्यांना स्त्रीवाद समर्थन देतो व त्यात सहभागी होतो. त्यामुळे स्त्रीवाद हा मानवमुक्तीची राजकीय जाणीव पेरणारा वैश्विक विचार आहे. याचे योग्य आकलन झाले तर स्त्रीवादी म्हणवण्यातील संकोच गळून पडेल. या समग्रतेत लिंगभाव समानतेचे उपक्रम आखले तर परिवर्तनाची गतिमानताही अधिक वाढेल हे निश्चित. डॉ. निर्मला जाधव संपर्क : nirmalajadhav@gmail.com

बातम्या आणखी आहेत...