आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:सणवार : मूळ उद्देशांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण व भाद्रपद म्हणजे सणांची रेलचेल. या सणांना बेल, तुळस, दूर्वा इ. पत्री देवाला अर्पण केली जाते. यानिमित्ताने लोकांनी निसर्गाशी जवळीक साधावी हाच यामागे प्रमुख उद्देश आहे. या पत्रीमध्ये आघाडा, जास्वंद, शमी, कन्हेर, मोगरा, जाई-जुई, बेल, तुळस यासारख्या बऱ्याच वनस्पतींची पाने गोळा केली जातात. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने विविध प्रकारच्या वनस्पतींची ओळख होत असते. या प्रत्येक वनस्पतीत काही औषधी गुणधर्म आहेत. या सणांच्या निमित्ताने त्यांची लोकांना माहिती होते. तसेच या पत्री जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होतील याचीही काळजी घेतली जाऊ शकते. सणांना देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या या वनस्पतींना पत्री म्हणतात हेही अनेकांना माहिती नसते. आता पत्री गोळा करणे हा प्रकार नामशेष होत चाललाय. फार फार तर बाजारातून दूर्वा, बेल व पत्रीचा पुडा विकत आणून पूजाअर्चा पार पाडली जाते. आपण मात्र ही जुनी परंपरा छोट्या प्रमाणात का होईना पण पुनरुज्जीवित करू शकतो. घराजवळ किंवा शाळेतील मोकळ्या जागी परसबागेत, गच्चीवर या औषधी वनस्पतींची पत्री वाटिका तयार करता येईल. आपले पूर्वज फार हुशार होते. निसर्गातील या विविध पानांची ओळख आपल्याला व्हावी यासाठी वेगवेगळी व्रतवैकल्ये, सण, उत्सव यांच्याशी झाडे व पाने, फुले, फळे पर्यायाने निसर्गाशी यांची सांगड घातली आहे. हरतालिकेच्या वेळी वाहण्यात येणारी पत्री हीसुद्धा झाडावरून तोडली जाणे म्हणजेच त्या झाडांमधील वाढीस कारणीभूत ठरणारी हार्मोन्सची पातळी वाढण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी काही झाडांवरील पाने तोडली गेली तर झाडाच्या उंचीत व पानांच्या संख्येत निश्चितच वाढ होते हे वनस्पतिशास्त्र सांगते.

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा गणेश उत्सव हा उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वेळी भल्या मोठ्या मूर्ती स्थापन करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागलेली असते. यात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मूर्ती किंवा कागदाच्या लगद्यापासून लहान गणपती तयार करू शकतो. तसेच मूर्तीसाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरू शकतो आणि मूर्तीचे विसर्जन घरीच हौदातील पाण्यात, टाक्यांमध्ये घरगुती स्वरूपात करू शकतो. यातून आपण मोठ्या प्रमाणावर प्रदूषणास आळा घालू शकतो. निसर्ग संवर्धन करून जनजागृती करू शकतो. गणेशोत्सवात गणपतीला दूर्वा वाहिली जाते तसेच जास्वंदाचे फूल म्हणजेच गणेश फूल वाहिले जाते. याद्वारे जास्वंदीच्या झाडांची लागवड करणे, संगोपन करणे व संवर्धन करणे म्हणजेच निसर्गाचे रक्षण करणे. तसेच पावसाळ्यात दूर्वा म्हणजेच भूमिगत खोड असून पावसाळ्यात दूर्वांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. गणपती बाप्पाचे पूजन करण्याच्या निमित्ताने दूर्वांची जुडी तयार करण्यात येते. म्हणून मोठ्या संख्येने दूर्वा तोडून घेतल्या तर पुन्हा नव्याने वाढ होते म्हणजेच निसर्गाचे संवर्धन करणे यातून अधोरेखित होते.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांची लयलूट आहे. मानव प्राणी हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची सांगड धर्माशी व संस्कृतीशी घातली आहे. प्रत्येक सणावाराची कुठल्या ना कुठल्या प्रकारे निसर्गाशी सांगड घातलेली आहे. वृक्षाचे माहात्म्य साधले आहे. यानिमित्ताने त्या वृक्षाचे औषधी गुणधर्म आपण लक्षात घेतले पाहिजेत. धर्माचे पालन करता करता आपल्या आरोग्यास हितकारक सवयीही अंगीकारल्या जाव्यात हाच यामागील उद्देश आहे. पण आजकाल या सणांच्या मूळ उद्देशांकडे दुर्लक्ष होऊन अनिष्ट गोष्टींना प्रोत्साहन दिलं जात आहे. विनाकारण सणावारांना दूषणं दिली जातात. त्यामुळेच या सणावारांच्या पाठीमागे असलेला मूळ वैज्ञानिक दृष्टिकोन, निसर्ग संवर्धन या उद्देशांना अनुसरून पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे कसे करता येतील? यासाठी आपण व्यक्तीश: काय करू शकतो या दृष्टीने विचार करून आपण कृती करणे गरजेचे आहे.

मेघा पाटील संपर्क: 9665189977

बातम्या आणखी आहेत...