आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:प्रथम मासिक पाळी महोत्सव

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधाभासी वर्तन करणाऱ्या समाजात आज आपण वावरत आहोत. एका बाजूला मूलबाळ होण्यासाठी बुवाबाबा, मांत्रिकांचे, मठाचे फेरे घालणारा, त्यासोबत वैद्यकीय उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करत उपचार घेणारा समाज दुसऱ्या बाजूला मुलगा होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मासिक पाळीला मात्र विटाळ मानणारा समाज... मूलबाळ होण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक धर्म असलेल्या मासिक पाळीची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. पाळी न येणे, अनियमित येणे, सामान्य पद्धतीने न येणे. या सगळ्यांवर वैद्यकशास्त्रात आधी उपचार करावे लागतात तेव्हा ते शरीर प्रजननक्षम होते. अशा या अत्यंत आवश्यक असलेल्या मासिक पाळीला मात्र समाज ‘विटाळ’ मानतो. समाजाच्या दुटप्पी वर्तनाला नाशिकच्या चांदगुडे कुटुंबीयांनी स्वत:च्या मुलीच्या पहिल्या मासिक पाळी उत्सवाने जोरदार उत्तर दिले आहे.

मासिक पाळी ना पवित्र आहे ना अपवित्र, ती एक नैसर्गिक शरीरधर्माची प्रक्रिया आहे. तिच्याकडे त्याच पद्धतीने बघण्याची समजदेखील २१ व्या शतकातील विज्ञानयुगात अजून निर्माण झालेली नाही. मानवाच्या विकासाच्या प्रक्रियेतल्या मातृप्रधान संस्कृतीत पाळी ही आनंदाची गोष्ट मानली जात होती. त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. पण नंतरच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांना गुलाम बनवण्यासाठी तिची मासिक पाळी ही अस्पर्श विटाळ ठरवीत तिला बाजूला केले. हे सगळे स्त्रियांवरील मालकी हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेतून घडले. स्त्री-पुरुष समानतेची भाषा करणाऱ्या या काळातही हा विटाळ अस्तित्वात असेल तर त्याला आव्हान द्यायलाच हवे. गतकाळातील मातृसंस्कृतीतील स्त्रियांचे सन्मानाचे स्थान परत या समाजव्यवस्थेत प्रस्थापित करणे हेच सुधारणावाद आणि मानवतावादाचे द्योतक आहे. तेव्हा मासिक पाळीचा महोत्सव हा स्त्रियांना तथाकथित विटाळ नाकारत सन्मानाची जागा प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम आहे. म्हणूनच चांदगुडे कुटुंबीयांचे आणि यशोदा या मुलीच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. कालबाह्य झालेल्या, अंधश्रद्धायुक्त अशा अनिष्ट, अघोरी प्रथांना, रूढींना फाटा द्यायचा असेल तर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अशा गोष्टींमधील फोलपणा स्पष्ट करायचा असतो. मग समाज हा बदल हळूहळू स्वीकारतो.

वयात आलेल्या मुलीच्या प्रथम मासिक पाळी या निसर्गसुलभ घटनेला, छोटेखानी का होईना दिमाखदार, देखणे, महोत्सवाचे रूप देऊन या नाजूक विषयाला सार्वजनिक जीवनात प्रथम हात घातला त्या चांदगुडे कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन करायला हवे. कोणत्याही वयात आलेल्या मुलीला मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण मुळातच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असणारा समाज नेहमीच मासिक पाळी आलेल्या मुलींना आणि महिलांना अंधश्रद्धेच्या दावणीला बांधत आला आहे.

सार्वजनिक जीवनात मासिक पाळी आलेल्या स्त्रीला सर्वच ठिकाणी विविध बंधने लादण्यात येतात. विशेषता धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश नाकारला जातो. त्याविरोधात कुणी बोलत नाही. मासिक पाळीची शास्त्रीय माहिती देऊन स्त्रीच्या मनातील भीती दूर करावी, तिला सन्मानाचे स्थान द्यावे, असेही कुणाला वाटत नाही. आणि वाटले तरीही प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही. मात्र हे धाडस चांदगुडे कुटुंबीयांनी केले. यशदा या इयत्ता नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला मासिक पाळी आल्याचा आनंद कुटुंबीयांसह समाजापर्यंत गेला पाहिजे. शक्य तेवढ्या महिला, मुलींना मासिक पाळीसंदर्भातली शास्त्रीय माहिती द्यावी, मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धांबद्दल चर्चा घडवून आणावी, समाजाला विचारप्रवण करावे या हेतूने महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी असा कार्यक्रम घडवून आणावयाची चर्चा कुटुंबात केली. आणि तो प्रत्यक्षात घडवूनही आणला.

मासिक पाळीचा आशय स्पष्ट करणारी गाण्याची धून सभागृहात सुरुवातीला सर्वांनाच सुखावून गेली. या सुमधुर गाण्याच्या स्वरांच्या साक्षीने महिला आणि मुलींनी यशदाचे औक्षण केले. या वेळी हातावर मेंदी काढलेली, फुलांचा गजरा माळलेली, नवीन कपडे घातलेली यशदा अतिशय प्रसन्न दिसत होती. मासिक पाळी या विषयावर मनमोकळेपणाने चर्चासत्र घेतले गेले. मासिक पाळीवरचा ‘कोष’ हा लघुपट दाखवला गेला. प्रथम मासिक पाळी हा महोत्सव का साजरा करण्यात आला, तिला काय वाटते, ती, तिच्या वयातील इतर मुलींना काय सांगू इच्छिते, याची अतिशय मार्मिक आणि प्रेरणादायी उत्तरे तिने दिली. ती म्हणाली, ‘तिच्या आई-बाबांनी तिला समजावून घेतले, मासिक पाळीबद्दलची माहिती दिली आणि याबद्दलचा समारंभ करण्याचे ठरवले. या कल्पनेचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झाले’.

विनायक सावळे

बातम्या आणखी आहेत...