आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:देशातील पाच सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री 822 कोटींच्या संपत्तीचे ‘धनी’

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून जगनमोहन, पेमा खांडू, नवीन पटनायक, नेफियू रिओ, एन. रंगास्वामी.  - Divya Marathi
डावीकडून जगनमोहन, पेमा खांडू, नवीन पटनायक, नेफियू रिओ, एन. रंगास्वामी. 

नेत्यांचा गुन्हेगारी इतिहास आणि मालमत्ता यांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) जारी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अहवालानुसार, देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी (दोन केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसह) २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. केवळ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोट्यधीश नाहीत. त्यांच्याकडे केवळ १५ लाख रुपयांची संपत्ती आहे. देशभरातील मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ३३.९६ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची एकूण संपत्ती ५१० कोटी रुपये आहे आणि हा आकडा उर्वरित २९ मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीपेक्षा थोडा जास्त आहे. निवडणूक लढवताना सर्व मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रांच्या आधारे ‘एडीआर’ने ही आकडेवारी दिली आहे.

भारतातील पाच सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आणखी काय करतात?

१. जगनमोहन : सिमेंट उद्योजक आणि मीडिया समूहाचे प्रवर्तक हे ५१० कोटींच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. २००१ मध्ये, वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी बंगळुरू येथील बंद पडलेली संदूर पॉवर कंपनीचा (एसपीसीएल) ताबा घेत आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. जगनमोहन यांनी नंतर ‘एसपीसीएल’च्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. २००८ मध्ये, जागती पब्लिकेशनच्या बॅनरखाली त्यांनी एकाच वेळी २३ आवृत्त्यांसह ‘साक्षी’ हे तेलुगू वृत्तपत्र सुरू केले. हा तो काळ होता, जेव्हा त्यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने २०० कोटी रुपयांच्या बजेटपैकी ५० टक्के रक्कम प्रिंट मीडियासाठी ठेवली होती. हे १०० कोटी रुपये जगनमोहन यांनी आपल्या वृत्तपत्रासाठी ठेवले होते, असा आरोप त्या वेळी झाला होता. जगनमोहन यांच्याविरुद्ध दाखल ‘सीबीआय’च्या आरोपपत्रात (तेव्हा जगनमोहनसुद्धा तुरुंगात होते) असा ठपका ठेवण्यात आला होता की, वायएसआर यांच्या कार्यकाळात ज्यांनी अवैध धंद्यातून भरपूर नफा मिळवला, त्यांनीच साक्षी वृत्तपत्र आणि या समूहाच्या वृत्तवाहिनीमध्ये पैसा गुंतवला होता. जगनमोहन हे “भारती सिमेंट’चे प्रवर्तकही आहेत. पूर्वी ही कंपनी रघुराम सिमेंट म्हणून ओळखली जात होती. २००८ मध्ये जगनमोहन यांच्या पत्नी भारती यांच्या नावावरून त्याचे नाव “भारती सिमेंट’ ठेवण्यात आले. सध्या कंपनीकडे फ्रान्सच्या वायचेट कंपनीचे ५१ टक्के शेअर आहेत.

२. पेमा खांडू : राजकारण आणि समाजसेवा हा मुख्य व्यवसाय, १३७ कोटींची एफडी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू १६३ कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, त्यांनी स्वतःचा व्यवसाय केवळ राजकारण आणि समाजसेवा असल्याचे सांगितले आहे. त्यांची बहुतांश मालमत्ता बँकेत एफडी आणि मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे १३७ कोटी रुपयांची नुसती एफडीच आहे. यापैकी त्यांच्या पत्नीच्या नावावर १६.५० कोटी रुपयांच्या एफडी आहेत. प्रतिज्ञापत्रात पत्नीचे वर्णन बिझनेस वुमन असे करण्यात आले आहे. दोघांकडे १९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर दोघांकडे एकूण १२ वाहने आहेत.

३. नवीन पटनायक : पगार आणि पुस्तकांची रॉयल्टी हेच कमाईचे मुख्य साधन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक एकूण ६३.९ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. शपथपत्रात मात्र त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेला पगार हा आपल्या उत्पन्नाचा स्रोत सांगितला आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु, त्यांची बहुतांश संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे आणि ती संपूर्ण स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात आहे. त्यांची स्वत:ची अशी कोणतीही मालमत्ता नाही. अत्यंत साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे नवीन पटनायक राजकारणात येण्यापूर्वी लेखक म्हणून ओळखले जात. त्यांनी भारतीय इतिहास, संस्कृती, कला आणि स्थापत्यशास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात त्यांच्या ‘द गार्डन ऑफ लाइफ’, ‘अ सेकंड पॅराडाइज’ आणि ‘अ डेझर्ट किंगडम’ या प्रमुख पुस्तकांचा समावेश आहे. यापैकी “अ डेझर्ट किंगडम’च्या एका प्रतीची किंमत ४९ हजार ९८९ रुपये आहे. लेखक असल्यामुळे त्यांची कमाई रॉयल्टीतून होते; पण ती किती, याचा त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक एकूण ६३.९ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. शपथपत्रात मात्र त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेला पगार हा आपल्या उत्पन्नाचा स्रोत सांगितला आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु, त्यांची बहुतांश संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे आणि ती संपूर्ण स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात आहे. त्यांची स्वत:ची अशी कोणतीही मालमत्ता नाही. अत्यंत साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे नवीन पटनायक राजकारणात येण्यापूर्वी लेखक म्हणून ओळखले जात. त्यांनी भारतीय इतिहास, संस्कृती, कला आणि स्थापत्यशास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात त्यांच्या ‘द गार्डन ऑफ लाइफ’, ‘अ सेकंड पॅराडाइज’ आणि ‘अ डेझर्ट किंगडम’ या प्रमुख पुस्तकांचा समावेश आहे. यापैकी “अ डेझर्ट किंगडम’च्या एका प्रतीची किंमत ४९ हजार ९८९ रुपये आहे. लेखक असल्यामुळे त्यांची कमाई रॉयल्टीतून होते; पण ती किती, याचा त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही.

४. नेफियू रिओ : ८०० एकर जमिनीचे मालक, शेती हाच उत्पन्नाचा स्रोत नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर ४७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. शेती हा आपल्या उत्पन्नाचा, तर फळबागा हा पत्नीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पती-पत्नींच्या नावे विविध बँकांमध्ये सुमारे साडेसहा कोटी रुपये आहेत, तर सुमारे चार कोटी रुपयांच्या विमा पॉलिसी आहेत. दोघांच्या नावावर सहा व्यावसायिक इमारती असून त्यांची किंमत १७ कोटी रुपये आहे. नेफियू यांच्याकडे ८०० एकर, तर पत्नीकडे स्वत:ची ५० एकर शेतजमीन आहे. त्याची एकूण किंमत सुमारे सात कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. त्यांच्याकडे ४.२२ कोटींची अकृषक जमीनही आहे.

५. एन. रंगास्वामी : एकेकाळी निवडणुकीसाठी शेत विकले, आज ३० कोटींच्या जमिनीचे मालक पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन.रंगास्वामी देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी, राजकारण हा आपला व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार, निवडणूक लढवण्यासाठी एकेकाळी आपल्या जमिनीचा तुकडा विकणारे रंगास्वामी आज सुमारे ३८ कोटी रुपयांचे ‘मालक’ आहेत. मात्र, त्यांच्या नावे बँकेत केवळ ५ हजार रुपये जमा आहेत, तर हातात ६६ हजारांची रोकड आहे. तथापि, २४ कोटी रुपयांची शेतजमीन, ५.२५ कोटी रुपयांची अकृषक जमीन तसेच ७.६० कोटी रुपये मूल्याच्या व्यावसायिक इमारती आणि १.२० कोटींची निवासी इमारत आपल्याकडे असल्याची माहिती दिली आहे.

‘एडीआर’च्या अहवालातील या ५ धनवान मुख्यमंत्र्यांकडे काय आहे?