आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेनिस कोर्टवर वर्षानुवर्षे वर्चस्व कायम ठेवणाऱ्या विल्यम्स भगिनींच्या आरोग्याचे रहस्य काय होते? फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टनकडून प्रत्येकाला त्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. माइक टायसनसारखी चपळता हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. या सर्वांनी त्यांच्या फिटनेसमागे मांसाहाराच्या शाकाहारी पर्यायांचे (व्हेगन फूड) महत्त्व सांगितले आहे. गुगल ट्रेंडनुसार, कोविड महामारीनंतर व्हेगन फूड हा सर्च इंजिनमध्ये सर्वाधिक सर्च केलेला विषय आहे.
अन्न पुरवठा साखळीत मांसाहारी व शाकाहारी दोन्ही अन्नधान्ये महत्त्वाची आहेत. ती हजारो वर्षांपासून पोषण व उपजीविकेचा आधार आहेत. इकडे १८ व्या शतकात औद्योगिक क्रांतीमुळे हवामानातील नकारात्मक बदल वाढले. याचा परिणाम अन्न उत्पादनाच्या पद्धती आणि वापरावर झाला आहे. मांसाहारावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे पर्यावरणावर पडणाऱ्या अनावश्यक दबावाबाबत यूएन सतत इशारा देत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार, मांसाहाराच्या वाढत्या वापरामुळे गवताळ प्रदेश, ओझोन थर, जंगल, माती व समुद्राच्या पाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. हरितगृह वायू उत्सर्जनाचा १४.५% वाटा हा प्राण्यांच्या अन्न व पेय उत्पादनाशी संबंधित आहे. जगाच्या एकूण कुरणांपैकी १५% जनावरे वापरतात. यामुळे जैवविविधतेला नवा धोका निर्माण होत आहे. यूएनच्या अहवालानुसार, मानवी संसर्गांपैकी ६०% संसर्ग प्राण्यांपासून होतात.
हवामान संकटाच्या आव्हानादरम्यान मांसाहाराच्या पर्यायांच्या मागणीत अनपेक्षित वाढ हे चांगले लक्षण मानले जाते. शाकाहारी अन्नाची ही शक्ती ग्राहक, बाजारपेठा आणि सरकारे समजून घेत आहेत. असोचेमच्या अहवालानुसार, वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांची मागणी दरवर्षी २०% दराने वाढत आहे. मांसाहाराला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाकाहारी खाद्यपदार्थांची बाजारपेठ एकट्या भारतात २०३० पर्यंत ६,८२४ कोटी रुपये असेल.
देशातील ७०% लोक मांसाहारी आहेत. अशा स्थितीत फूड सस्टेनेबिलिटीसाठी मांसाहाराचे पर्याय वाढवावे लागतील. अन्नसुरक्षेसह शून्य कार्बन उत्सर्जनाच्या आपल्या उद्दिष्टांसाठी हे आवश्यक आहे. वनस्पती-आधारित अन्न हे प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ओमेगा-३, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्रोत आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशातील ७५% लोकसंख्येत प्रथिनांची कमतरता आहे. अशा स्थितीत वनस्पतींपासून तयार केलेल्या अन्नातून स्मार्ट प्रथिने मिळवून कुपोषणाविरुद्धचा लढा सोपा करू शकतो. शाकाहारी अन्नाचा विचार केल्यास भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक अनुकूलता आपल्याला अनुकूल आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैलीतून अन्नसुरक्षेचे उद्दिष्टही गाठले जाईल. यासाठी अन्न उत्पादन आणि खाण्याच्या सवयी निसर्गाला अनुकूल असणे गरजेचे आहे. हे करण्यात आपण यशस्वी झालो तर आरोग्यासोबतच पृथ्वीही सुंदर बनवू. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
अरविंद कुमार मिश्रा पत्रकार आणि लेखक arvindmbj@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.