आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी २०२४ मध्ये गंगापूर विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे. तसे संकेत, संदेश प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले जात आहेत. या मोर्चेबांधणीचाच एक भाग म्हणून चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विचारलेले बहुतांश प्रश्न गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाशी संबंधित होते. मात्र, चव्हाण यांनी आपण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याची तयारी करत आहोत, असे सांगितले. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघावर १९६२ ते १९९९पर्यंत काँग्रेसचा प्रभाव राहिला. १९९९, २००४ शिवसेनेचे अण्णासाहेब माने यांची पकड राहिली.
ती २००९ मध्ये प्रशांत बंब यांनी मोडली. त्यांनी अपक्ष लढत २३ हजार मतांनी शिवसेनेच्या मानेंना पराभूत केले. २०१४ मध्ये भाजपकडून मैदानामध्ये उतरत विद्यमान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर १७ हजार मतांनी विजय मिळवला आणि गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात सामाजिक, राजकीय समीकरणे पुढील काही दशकांसाठी बदलली, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे आमदार चव्हाण सक्रिय झाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी महिला कृषी महाविद्यालय, वेरूळला ट्राॅमा केअर सेंटरची उभारणी, गल्लेबोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र आदी कामे मंजूर करून घेतली. बहुतांश प्रश्न गंपापूर खुलताबादचेच मांडले, असे स्पष्टपणे दिसून आले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते म्हणाले की, औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कोणत्याही उमेदवाराचे नाव निश्चित केलेले नाही. मविआच्या समीकरणात उमेदवार निश्चित होईल. त्यामुळे त्यांच्या तयारीविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीची पायाभरणी
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. त्यासाठीच मतदारसंघात विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. खरे तर ही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी आहे. अधिवेशनात मांडलेले प्रश्न लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहेत. सतीश चव्हाण, आमदार, पदवीधर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.