आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Four Ways To Stay Ahead Of Everyone Else In The World | Article By Chetan Bhagat

सर्वात पुढे हा विचार गरजेचा:जगात सर्वांच्या पुढे राहण्याचे चार मार्ग

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! याप्रसंगी नवीन दशकाच्याही शुभेच्छा द्याव्यात की नाही, हे मला माहीत नाही, कारण या दशकाची पहिली तीन वर्षे महामारीने कमी-अधिक प्रमाणात गिळली आहेत. नवीन वर्ष म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे, मग ती आपण स्वत:साठी असो किंवा देशासाठी. लोक वर्षाच्या सुरुवातीला संकल्पही करतात. तथापि, त्यापैकी बरेच लोक १८ जानेवारीपर्यंत हा संकल्प मोडतात, त्याला क्विटर्स डे म्हणतात.

पण, वेळोवेळी आपण आपल्या जीवनाच्या उद्देशाचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी नवीन वर्ष ही सर्वोत्तम संधी आहे. तर मला सांगा, गेल्या वर्षी तुमचे जीवन कसे होते? महत्त्वाचे म्हणजे येत्या वर्षभरात तुम्ही स्वत:ला कुठे बघता किंवा पाहू इच्छिता? यासाठी आपल्याला एक उद्देश हवा आहे, ज्याशिवाय जीवनात कोणतेही ध्येय नाही. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षात किंवा पुढच्या दशकात भारत कोणत्या टप्प्यावर असेल, असे विचारले तर आधी हे जाणून घेतले पाहिजे की, आज जगात भारताचे प्रयोजन काय आहे? आपण त्याबद्दल पाहिजे तितके बोलू शकतो, परंतु थोडक्यात, भारताचा उद्देश एकच आहे : जगातील आघाडीच्या देशांपैकी एक होणे. आज भारताची लोकसंख्या जगाच्या १५ टक्क्यांहून अधिक आहे, पण हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण एक शांततापूर्ण समाज निर्माण करू, ज्यामध्ये लोक सन्मानाने जगू शकतील, त्यांना विकासाच्या संधी मिळतील आणि त्यांना हवे तसे जीवन जगता येईल. जगात अग्रणी होण्यासाठी देशाला चार गोष्टींची गरज असते - उच्च उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था, मजबूत संरक्षण आणि तंत्रज्ञान, नैतिक उच्चता आणि विचारांच्या पातळीवर जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता. ते या प्रकारे होऊ शकते : उच्च उत्पन्नाची अर्थव्यवस्था पैशांनी निर्मित होते. भरपूर पैशांनी. श्रीमंत देशांनाच सन्मान मिळतो. भारत जितका समृद्ध होईल तितका जगात त्याचा प्रभाव वाढेल. तरच जगभरातील कंपन्या आपल्याला गांभीर्याने घेतील आणि आपल्याकडे आकर्षित होतील. आपला सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक ठिकाणे, संगीत, सिनेमा, खाद्यपदार्थ हे सॉफ्ट पॉवरअंतर्गत येते आणि त्याला मर्यादा आहेत. वर्चस्व केवळ हार्ड पाॅवरने बनवले जाते. आर्थिक वृद्धी हा आपला प्रथम क्रमांकाचा अजेंडा असायला हवा आणि आपल्याकडून प्रत्येक धोरण हे लक्षात घेऊन बनवले गेले पाहिजे.

दुसरे म्हणजे, श्रीमंत असणे पुरेसे नाही. बलाढ्य देशाकडे मजबूत संरक्षण यंत्रणा आणि तंत्रज्ञानही असायला हवे. भक्कम संरक्षण यंत्रणा ही केवळ सैनिकांच्या देशभक्ती आणि उत्साहाने बनत नाही, तर त्यासाठी संसाधने, अत्याधुनिक शस्त्रे आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आवश्यक आहे, जेणेकरून जगातील कोणीही तुमच्याशी लढण्यापूर्वी दोनदा विचार करेल. त्याच वेळी मजबूत देशाकडे तंत्रज्ञान-आधारित उद्योगांमध्ये सामर्थ्य असणे आवश्यक आहे - उदा. सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि फार्मा. त्यासाठी वैज्ञानिक आणि नवकल्पना-आधारित मानसिकता, तसेच भरपूर पैसा आवश्यक आहे. म्हणूनच आपण श्रीमंत देश असायला हवे, जेणेकरून आपण या सर्वांवर खर्च करू शकू. तिसरे म्हणजे, आजूबाजूला नजर टाकली तर लक्षात येईल की, जगात ज्या देशांचे वर्चस्व आहे ते लोकशाही, धर्मनिरपेक्ष, मुक्त विचारसरणीचे, स्वातंत्र्यप्रेमी आणि व्यक्तीचा आदर करणारे आहेत. अमेरिका असो वा युरोपातील इतर देश, यामुळे ते सर्वोच्च नैतिक आदर्श जगासमोर ठेवतात. भारतातही ही क्षमता आहे. आपण लोकशाहीवादी आहोत आणि जगातील सर्वात बहुलवादी देशांपैकी एक आहोत. पण, राजकारणामुळे आपल्यात फूट पडली तर आपण आपले महत्त्व गमावून बसू आणि मग आपल्याला जगात मान मिळवणे फार कठीण जाईल. संस्कृती, धर्म किंवा भाषा आपण इतरांवर लादली तर आपण मोठा पल्ला गाठू शकणार नाही. भारताला आपली लोकशाही, वैविध्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य जपतच समृद्ध देश व्हायचे आहे. पैसा असो, शक्तिशाली सैन्य असो, तंत्रज्ञान असो, लोकशाही असो, याव्यतिरिक्त एखाद्या देशाला पुढचा विचार अग्रणी बनवतो. आपल्या माणसांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, पण जगाला देण्यासाठी आपल्याकडे काय आहे? हवामान बदल, प्रदूषण, ऊर्जा संकट, हिंसक संघर्ष इ. जगासमोरील मोठ्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपण काही योगदान देत आहोत का? महासत्ता होण्यासाठी या दिशेनेही काम करावे लागेल.

या चार गोष्टी अवघड नक्कीच आहेत, पण अशक्य नाहीत. आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या दिशेने विचार केला तर येत्या काही दशकांत आपण हे साध्य करू शकतो. पण, आपण क्षुल्लक भांडणात गुंतत राहिलो, असंबद्ध बोलत राहिलो किंवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवत राहिलो तर ते उपयोगाचे नाही. भारत कमी उत्पन्न असलेला देश राहिला तर जगाला काही फरक पडणार नाही. जगामध्ये आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी आपल्याला आपली अर्थव्यवस्था, संरक्षण, तंत्रज्ञान, विचार आणि नैतिकता मजबूत करावी लागेल. चालू दशकात एक देश म्हणून भारताचे हेच उद्दिष्ट असावे! (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...