आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • From A Poor Tribal Family To The Presidency Now |Article By Vedpratap Vaidik

दृष्टिकोन:गरीब आदिवासी कुटुंबातून आता राष्ट्रपती पदाकडे

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरणार असल्या तरी त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. त्यांचे महिला आणि आदिवासी असणे त्यांची उमेदवारी अद्वितीय ठरवते.

राष्ट्रपती अडवणूक न करणारे व साधे-सरळ असावेत, असे प्रत्येक पंतप्रधानांना वाटते. भारताच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी प्रथम यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून जाहीर केले, तर भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याप्रमाणे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची संधी मिळाली नाही. तथापि, राष्ट्रपती व भाजपचे संबंध सौहार्दाचे होते, पण आम्ही उपेक्षित घटकांना अभूतपूर्व सन्मान देऊ इच्छितो, असा संदेश भाजपचे नेतृत्व या सर्वोच्च पदाच्या माध्यमातून असल्याचे दिसते. त्यांनी आपले पहिले राष्ट्रपती दलित समाजातील केले व आता दुसऱ्या राष्ट्रपती आदिवासी समाजातून निवडण्यासाठी उमेदवारी दिली. याआधी भाजपच्याच वाजपेयी सरकारने एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते.

मुर्मू भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरणार असल्या तरी त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. त्यांचे महिला आणि आदिवासी असणे त्यांची उमेदवारी अद्वितीय ठरवते. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर ६४ वर्षे वय असलेल्या त्या पहिल्या उमेदवार आहेत. भाजपने प्रस्तावित केलेला उमेदवार राष्ट्रपतिपदी विराजमान होणे जवळपास निश्चित असून विरोधी पक्षातील सर्वात मोठा उमेदवारही पराभूत होण्याची खात्री आहे. त्यामुळेच शरद पवार, फारुख अब्दुल्ला व गोपाळ गांधी यांनी ते टाळले, पण यशवंत सिन्हा यांनी विरोधी उमेदवार होण्याचे मान्य करून चांगलेच केले. ते भारताचे अर्थमंत्री व परराष्ट्र व्यवहार मंत्री होते आणि माजी आयएएसही आहेत. त्यांना पंतप्रधान चंद्रशेखर व अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव आहे. ते योगायोगाने राष्ट्रपती झाले तर त्यांचे व मोदी सरकारचे नाते काहीसे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग व राजीव गांधी सरकार यांच्या संबंधांसारखे होऊ शकते.

द्रौपदी मुर्मूंबद्दल सांगायचे तर, त्या ओडिशातील मयूरभंजच्या आहेत. त्यांचे जीवन संघर्षमय होते. अतिशय गरीब आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. झोपडीत जन्मलेले व्यक्तिमत्त्व राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलेले पाहून कोणाला आनंद होणार नाही? बीए केल्यानंतर त्या शिक्षिका झाल्या. राजकारणातही नगरसेवक, आमदारकीपासून सुरुवात करून मंत्रीपदापर्यंत पोहोचल्या आणि आता झारखंडच्या राज्यपाल आहेत. त्या ६४ वर्षांच्या आणि यशवंत सिन्हा ८४ वर्षांचे आहेत. मुर्मू मोदी सरकारला खूप अनुकूल ठरतील. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध सौहार्दपूर्ण किंवा सामान्य राहणे फार महत्त्वाचे आहे. मात्र, आणीबाणीच्या काळात ४४ व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींच्या अधिकारांमध्ये लक्षणीय घट करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करणे राष्ट्रपतींना बंधनकारक करण्यात आले होते, परंतु तरीही पंतप्रधान निवडण्याचे, कोणताही कायदा मंत्रिमंडळाकडे फेरविचारासाठी पाठवण्याचे, अध्यादेश जारी करणे किंवा न करणे किंवा अंतिम शिक्कामोर्तब करण्याचे अधिकार आजही राष्ट्रपतींकडे आहेत. याच कारणामुळे १९८७ मध्ये ग्यानी झैलसिंग यांना राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून मुक्त करायचे होते. दिल्लीतील अनेक कायदेतज्ज्ञांनी त्यांना असाच सल्ला दिला होता, पण त्यांच्या एका मित्राचे ‘ग्यानीजी, तुम्हाला भारताला पाकिस्तान करायचे आहे का?’ हे म्हणणे ऐकून त्यांनी तो विचार सोडून दिला. याचा अर्थ भारताच्या राष्ट्रपतींची भूमिका रबर पॅडसारखी असावी, असा नाही. काही राष्ट्रपतींनी सरकारांना पूर्ण सहकार्य केले, पण वेळोवेळी आपली असहमती, नाराजी व्यक्त करण्यात मागेपुढे पाहिले नाही. राष्ट्रपती हा साधा माणूस असावा, जो सरकारच्या कामात ढवळाढवळ करणार नाही, अशी प्रत्येक पंतप्रधानाची इच्छा असते. अशा व्यक्तीची सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकमताने निवड केली असती तर किती बरे झाले असते. भाजपच्या नेत्यांनीही तसे प्रयत्नही केले, मात्र सध्या प्रमुख विरोधी पक्षांना पुढच्या निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावा म्हणून भाजपविरोधात ताकदवान आघाडी उभी करण्याची घाई झाली आहे. ते आता हरले तरी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते जोरदारपणे स्पर्धा करू शकतील, अशी संधी राष्ट्रपतिपदाची निवडणूक त्यांना देत ​​आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रपतिपदासाठी आपल्या एकाही उमेदवाराचे नाव दिले नाही आणि २२ वर्षे भाजपचे महत्त्वाचे सदस्य राहिलेल्या व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब केले, हेदेखील येथे नमूद करणे आवश्यक आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. वेदप्रताप वैदिक भारतीय परराष्ट्र धोरण परिषदेचे अध्यक्ष dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...