आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • From Now, Bharatiya Janata Party Is Eyeing 2024 | Article By Abhaykumar Dubey

विश्लेषण:आतापासूनच भारतीय जनता पक्षाला लागले 2024 चे वेध

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

असे बोलले जात आहे की, विरोधी पक्षांनी बहुतांश मतदारसंघांत भाजपच्या विरोधात त्यांचे संयुक्त उमेदवार उभे केले तर ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातून ७०-८० जागा हिसकावून घेऊ शकतात. हे मूल्यमापन सूचित करते की, मोदींचे सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांची एकजूट ही पहिली आणि आवश्यक अट आहे. म्हणजेच भाजपविरोधी मते कोणत्याही परिस्थितीत विभागली जाऊ नयेत. असे करता आले तर भाजपने जेमतेम जिंकलेल्या जागांवर विरोधी ऐक्याचा एक चांगला निर्देशांक गैर-भाजप राजकारणाचा दावा मजबूत करू शकतो. पण, अशी विरोधी एकजूट आजच्या परिस्थितीत शक्य आहे का? हा लाखमोलाचा प्रश्न आहे आणि सध्या सर्वच राजकीय सूचक ते शक्य नसल्याचे सांगत आहेत. अशी एकजूट ना २०१४ मध्ये होती ना २०१९ मध्ये. तेव्हा आणि आजही मतांचे विभाजन करण्यासाठी बिगर-भाजप राजकारण शापित होते. संयुक्त विरोधी उमेदवाराच्या प्रबंधामागे नवीन दृष्टिकोन आहे का? मला वाटते की, विरोधकांना साठच्या दशकातील बिगर-काँग्रेसवाद हा निवडणूक वाक्प्रचार आजच्या पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत बिगर-भाजपवाद म्हणून चालवायचा आहे. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी एकजूट होऊ शकली नाही, हेच मुख्य कारण आहे. राजकारण बदलले आहे, सार्वजनिक भाषण बदलले आहे, मतदार बदलले आहेत, निवडणूक लढण्याची पद्धत बदलली आहे. आता ना धर्मनिरपेक्षतेची चिंता आहे ना सामाजिक न्यायाची चर्चा प्रभावी राहिलेली आहे. मुस्लिम मतांचा भाजपविरोधी प्रभाव संपला आहे. मागासवर्गीयांची एकजूट भाजपने कायमची मोडीत काढली आहे. बिहारचा अपवाद वगळता भाजप आता ब्राह्मण-बनिया पक्ष राहिलेला नाही, दलित-आदिवासीही त्याला मतदान करू लागले आहेत. या बदललेल्या परिस्थितीच्या केंद्रस्थानी ‘स्प्लिट व्होट’चे वास्तव आहे. मतदान करताना मतदार पंचायत, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेत वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो. ज्या पक्षाला तो विधानसभेत पराभूत करतो, त्याच उत्साहाने लोकसभेत विजय मिळवतो. असे अनेक राज्यांत घडले आहे. राज्याच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करणाऱ्या पक्षांचा लोकसभेला तुलनेत वाईट पराभव होतो. या ‘स्प्लिट व्होट’चा फायदा घेत भाजपने २०१९ च्या निवडणुका जिंकल्या आणि याच आधारावर २०२४ मध्ये भाजपला गाठ बांधायची आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपची रणनीती राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची होती, तर विरोधकांनी स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले होते, याकडे फार कमी टीकाकारांनी लक्ष वेधले. मुद्द्यांची ही विभागणी झाली, कारण भाजपची नजर विरोधकांपेक्षा २०२४ वर जास्त आहे. त्याला मतदारांना संदेश द्यायचा आहे की, त्यांनी स्थानिक समस्यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय समस्यांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली पाहिजे. २०२३ हे नऊ विधानसभा निवडणुकांचे वर्ष आहे. या निवडणुकीत भाजप काश्मीर, राम मंदिर, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा आणि समान नागरी कायदा यावर भर देणार आहे. हे सर्व मुद्दे राष्ट्रीय आहेत. ज्या वेळी राजकीय भाष्यकारांची मने हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुकांमध्ये गुंतलेली होती, त्याच वेळी नरेंद्र मोदी आणि त्यांची प्रचार यंत्रणा त्यांचे इतर हेतू जमिनीवर उतरवण्यात गुंतलेली होती. १ डिसेंबरला भारताला ज्या पद्धतीने जी-२० चे अध्यक्षपद मिळाले, त्याचा अर्थ असा घेतला जाऊ शकतो की, २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपने अघोषितपणे प्रचार सुरू केला आहे. २०२३ पर्यंत मोदी या गटाचे अध्यक्षपद भूषवतील. त्याचा पुरेपूर वापर निवडणुकीसाठी करण्याच्या मनःस्थितीत सत्ताधारी आहेत. भारत जागतिक महासत्ता म्हणून कसा उदयास येत आहे, हे तो दाखवेल. देशभरातील मोबाइलधारकांना या क्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संदेश पाठवण्यात आले. सर्व राष्ट्रीय स्मारकांवर होलोग्राम प्रक्षेपित करण्यात आले. वर्तमानपत्रांत पूर्ण पानाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. पंतप्रधानांनी स्वत:च्या नावाने मोठमोठ्या वृत्तपत्रांतून लेख प्रसिद्ध केले. जी-२० चा लोगोदेखील कमळाचे फूल आहे हे सत्य कोणापासून लपून राहू शकते का? हा योगायोग असला तरी आता निवडणूक लढवण्यात निपुण असलेल्या भाजपच्या हाती ती गेली आहे. जी-२० मधून मतांचा पाऊस पडावा याची तो काळजी घेईल.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

अभयकुमार दुबे प्राध्यापक, डाॅ. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली abhaydubey@aud.ac.in

बातम्या आणखी आहेत...