आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित:घरासमोरचं अंगण

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढे असावा बागबगीचा वेल मंडपी जाई, जुईचा आम्रतरूवर मधुमासाचा फुलावा मोहर पानोपान असावे घर ते आपुले छान..!

छो टंसं का होईना, घर. त्यापुढं छोटंसं अंगण. अंगणात काढलेली सुरेख रांगोळी. समोर तुळशी वृंदावन. विविध फुलांच्या सुवासाने सुगंधित झालेल्या वातावरणातील अनोखे भारलेपण. सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी तुळशीसमोर लावलेला दिवा अन् उदबत्ती. स्वयंपाक आवरल्यावर अंगणात केलेली अंगतपंगत. आप्त अन् शेजाऱ्यांसवे मारलेल्या मनसोक्त गप्पा आणि सुखदुःखाची केलेली देवाणघेवाण. लहान मुलांचे रंगलेले खेळ. थंडीच्या दिवसांत पेटलेली शेकोटी. आकाशाची चादर पांघरून धरतीच्या कुशीत चिंतामुक्त होत निद्रेच्या आधीन झालेलेे मन आणि शरीर. खरंच...यापेक्षा दुसरी समृद्धी, श्रीमंती असू शकत नाही.

परंतु आजच्या आधुनिक युगात गाव सोडून शहरात येत, मोठ्या स्वप्नांना उराशी बाळगताना संकुचित झालेल्या माणसाच्या मनाप्रमाणे त्याची घरेही संकुचित झालीयेत आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे, विसाव्याचे, घराचा आरसा आणि शोभा असणारे घराचे अंगण हरवलेय कुठेतरी..! इमारतींच्या जंगलात इंच-इंच जागेसाठी जिथे वारेमाप पैसे मोजावे लागतात, तिथे मोठे प्रशस्त अंगण असलेली घरे मिळणे दुरापास्त झालेय. मग घरासमोरील रांगोळी, छोटीशीच पण मनाला सुखावत जाणारी परसबाग या गोष्टी दूरच..!

चेहऱ्यावर खोटे मुखवटे लावून कृत्रिम वागणाऱ्या माणसाच्या घरासमोरील रांगोळीही आता कृत्रिम झालीये स्टिकरची. अत्यंत स्वकेंद्रित झालेल्या मनुष्यप्राण्यात स्वसुखासाठी, करिअरसाठी जिथे संसारवेलीवर फुले फुलवायची की नाही हा विचार केला जातो, तिथे अंगणात फुले कशी फुलणार? तुळशीचे स्थानही आता डळमळू लागले आहे. बिचारी पाण्याअभावी वाळून चाललीये. भावनिक ओलाव्याअभावी रुक्ष झालेल्या माणसाच्या नात्यासारखी..!

अंगणाअभावी केवळ टीव्ही, मोबाइल, व्हिडिओ गेम यात रमलेल्या मुलांचे बालपण हरवत चाललेय. खेळायला कुणी मित्र-मैत्रिणी नाहीत. बालपणातील एनर्जी खर्च करायला जागाच नाही. त्यामुळे एकाकी पडलेली मुले अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांना सामोरी जात आहेत. मैत्रिणींसवे अंगणात बालपणीच्या आठवणींत रमणाऱ्या गप्पागोष्टी करत चंद्रताऱ्यांशी हितगुज साधणाऱ्या माहेरवाशिणींनाही जागेअभावी आपला माहेरचा मुक्काम लवकरच आटपावा लागतोय..! निर्जीव वस्तूंनी सजवलेल्या घराचेे मांगल्य लोप पावत चाललेय.

कटू असले तरी हे सत्य नाकारून चालणार नाही. अंगणाप्रमाणेच लोप पावणारी नाती अन् भावनांचे बंध, एकाकी करून सोडताहेत माणसाला. मानसोपचारतज्ज्ञांचा आधार घ्यावा लागतोय त्याला त्यातून सावरण्यासाठी. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नसता याच गोष्टी मानवाच्या भविष्यात दुःखाची नांदी ठरतील हे नक्की...!

दीप्ती कुलकर्णी संपर्क : 8668383951

बातम्या आणखी आहेत...