आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:दुःखाचं मूळ उकलणारी कादंबरी...

एका महिन्यापूर्वीलेखक: गणेश पोकळे
  • कॉपी लिंक

"तसनस' ही गोष्ट वाघाचे डोळे असणाऱ्या तरीही धूळधाण- राखरांगोळी- तसनस वाट्याला आलेल्या कार्यकर्त्याची, घामाला दाम मागणाऱ्या चळवळीची, या चळवळीतल्या वारकरी आणि बडव्यांची. जमिनीचा तुकडा असणाऱ्यांची आणि नसणाऱ्यांचीही. मातीतून उगवलेल्या तुमच्या धान्याला जरूर मोल मिळावं पण तळपातळीवर चिरडल्या जाणाऱ्या माणसाच्या जगण्याचंही काही मोल असतं की नाही हे तळतळून विचारणाऱ्यांची... ही गोष्ट निखाऱ्यावरची राख फुंकून धुमसत्या काळाचा तुकडा उजागर करणारी...'

उथळ आणि तितक्याच चटपटीत कथांचा, कादंबऱ्यांचा सुळसुळाट फोफावलेला असताना कुठल्यातरी टोकाला घेऊन जाणारं, संघर्ष, कष्ट, मेहनत, जगणं या सगळ्यांच्या मुळाशी जाणारं आणि तितक्याच मुळातून टिपलेलं वाचायला मिळणं आज विरळ होत जाताना दिसतंय. त्यातही गावातलं, मातीतलं, त्या मातीत राबणाऱ्या हातांच्या वाट्याला येणार रोजचं दुःख, जगण्याशी चाललेली कसरत आणि या सगळ्या धडपडीत कष्टाचं मोल मिळत नाही म्हणून चाललेला संघर्ष वेगळाच. शहरं रोज तेलचीवाणी फुगत जातायत आणि हळूहळू हवा चाललेल्या टुपासरखी गाव ओसरत जातायत. या रुंदत जाणाऱ्या दरीत इथला कष्ट करणारा वर्ग आणि त्यांच्यासाठी लढा देणारा वर्ग कायम बेदखल राहिला आणि आजही राहतोय. मात्र, काही लिहिणारे हात असे असतात त्यांच्या नजरेला ही धडपड साठवता येते आणि त्यांचा हाताला हे पानावर तितक्याच जाणिवेनं मांडता येतं. जसं रसाने भरलेल्या ऊसाचं टिपरू चरकातून पलीकडे चोथा होऊन बाहेर पडतं. याच जाणिवेनं आणि तळमळीनं हे दुःख मांडणारे लेखक म्हणजे आसाराम लोमटे. त्यांची नुकतीच "तसनस" ही कादंबरी 'शब्द पब्लिकेशन'च्या वतीने प्रसिद्ध झालीये...

राबणाऱ्या हातांना साथ देणाऱ्यांची, त्यांच्यासाठी लढणाऱ्यांची अवस्थाही राबणाऱ्या हातांसारखीच बिकट व्हावी आणि सत्तेच्या परिघात आपल्याशिवाय कुणीच येऊ नये म्हणून प्रस्थापित पुढाऱ्यांनी हे दोन्हीही हात कायम दगडाखाली कसे राहतील याची काळजी घ्यावी, असा हा विस्तवावरचा वास्तव संघर्ष. रात्रीचा दिवस करून या मातीत राबलं तरी पैसे फिटत नाहीत म्हणून जमिनीचा तुकडा गहाण ठेवण्याचं संकट आणि एकीकडे मुलाचं लग्न होऊन एक दिवस झालं नाही तर सगळा पसारा जप्त करून घेऊन जाणारी बँकही इथं छातीवर बसलेली. हे दुःख कुणाला सांगावं आणि कोण वाटून घेईल अस वाटत असताना संघर्ष समितीच्या लोकांचा आधार वाटावा अशी परिस्थिती. कुणाचं नातं काय याचा कोणताच हिशोब न मांडता आपल्या नात्यातला असला तरी तो शेतकऱ्यांच्या आणि या कष्टकऱ्यांच्या विरोधात आहे म्हणजे आपलासुद्धा हाडवैरी समजून त्याच्या अंगावर जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गोष्ट. हे कार्यकर्ते रक्ताच्या नात्यापेक्षाही चळवळीतून तयार झालेल्या घट्ट अशा नात्याला महत्त्व देतात. नामा आणि राम या दोन प्रमुख संघर्षशील कार्यकर्त्यांच्या व्यक्तिरेखा या कादंबरीत आहेत. बँकेचे अधिकारी वसुलीला आल्यानंतर धान्य साठवण्याच्या कणगीत लपून बसलेल्या बापाला पाहिल्यानंतर या घटनेचा घाव शाळकरी वयात नामाच्या मनावर खोलवर बसतो. व्यवस्थेने बापाला जे अपमानित व्हायला लावले त्या व्यवस्थेच्या विरोधातला आयुष्यभराचा संघर्ष नामाला शेतकरी चळवळीशी जोडून ठेवतो. सुरुवातीला भजन- कीर्तनाचा नाद असणाऱ्या पण वेदनेचा दंश झाल्यानंतर थेट चळवळीत ओढलेल्या त्रिवेणीबाई नंद ही व्यक्तिरेखाही लक्ष वेधून घेणारी. रुस्तुम सत्वधर सारखा कार्यकर्ता कष्टकरी श्रमिक दलित अशा सर्व समाजघटकांसाठी झगडत राहतो. या चळवळी कधी परस्परांशी संवाद साधतात तर कधीकधी त्यांच्यातील भेदरेषाही जाणवतात.

ही कादंबरी फक्त शेतकऱ्याचं दुःख मांडत नाही. ती इथला कामगार मांडते, ती इथला श्रमिक मांडते, ती इथला दलित मांडते, ती इथल्या स्त्रीचा संघर्ष मांडते, ती इथल्या शोषित वर्गाचं दुःख मांडते,ती इथल्या सरंजामी वृत्तीच्या राजकारण्यांचा वावर मांडते आणि ती इथल्या स्वतःच्या आयुष्याची होळी करून या उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची फरफट मांडते. एकूणच सांगायचं झालं तर कादंबरीचा गाभा हा फक्त शेतकरी चळवळ हा नाही तो बहुपेडी समाजवास्तवाचा आहे. या चळवळीसोबत चालणाऱ्या इतर सर्व कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या ज्या चळवळी आहेत त्यांचा सर्व धुमसता कालखंड यामध्ये येतोय. यामध्ये शेतकऱ्याच्या घामाला मोल मिळावं यासाठी स्वतःच्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेऊन लढणारे कार्यकर्ते म्हणजे नामा आणि राम. ही जोडी कित्येक शेतकऱ्यांना आपली आधार वाटते. तर दलित, श्रमिक, कामगार यांच्यासाठी कसल्याही संकटाला समोर जाऊन तळमळीने लढणारा कार्यकर्ता म्हणजे रुस्तुम सत्वधर. चुलीतल्या लाकडाबरोबर जळणाऱ्या बहुसंख्य बायका खेड्यापाड्यात पाहायला मिळतात. कसलाही आवाज न करता संपून जाणाऱ्या. मात्र, एखादीच्या वाट्याला येतं मोकळा श्वास घेणं आणि कसल्याही बंधनाविना वावरणं. हेचं बळ वाट्याला आल्याने ग्रामीण प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या त्रिवेणीबाई नंद. तर दुसरीकडे या राबणाऱ्या हातांसाठी लढा देणाऱ्या या कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्यावर नामोहरम करायला बसलेले ग्रामीण भागातील सरंजामी राजकारणाचं प्रतीक म्हणता येईल ते बजरंग देसाई,बदामराव दौलतराव अस्वले आहेत. गावगावच्या तरूण पोरासोरांना पिण्याखाण्याच्या नादी लावून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आमदारकी कायम आपल्याकडं कशी राहील याच्याच हिशोबात. सत्तास्थाने आपल्या बुडाखाली ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे शोषण करणारे पुढारी या कादंबरीत आढळतात.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही चळवळीत उतरलेला बेधडक राम,ज्याची एक प्रिंटिंग प्रेस आहे. ही प्रेस कार्यकर्त्यांचे हक्काचे ठिकाण आहे. आंदोलनाची, सभेची आखणी, कार्यकर्त्यांच्या बैठका या सर्व गोष्टी प्रेसवरच ठरतात. अडीअडचणींमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या हक्काचं ठिकाण वाटावं अस हे रहदारीतलं ठिकाण. उमेद हरवल्यासारखं वाटलं तरी या ठिकाणी आल्यावर अंगात हत्तीचं बळ आल्यावाणी. पुढच्या तोंडाला लढायची तयारी करणारे कार्यकर्ते आणि त्यांचे अनेक लढे या कादंबरीत पाहायला मिळतात. प्रत्यक्ष चळवळीत लढणाऱ्याच्या मेहनतीचं मोल आपल्याला आपल्या शब्दात करता येईल का या भावनेतून लिहिणारे कवीही कार्यकर्त्याला भेटतात आणि आपल्या आजूबाजूचा अवघडलेला आणि शिणलेला पट कवितेतून त्याच्यापुढं मांडतात तेव्हा प्रत्यक्ष जगणाऱ्याचं आणि लिहणाऱ्याचं पडत चाललेलं अंतर या कादंबरीतल्या नायकाला प्रकर्षाने जाणवतं.

"पोटच्या गोळ्यांना नाही दिली माया, जीरवली काया ढेकळात. जगण्याचा पाटा काळ वरवंटा, जीव हा करंटा राबताना. कष्टविला देह रात्रीचा दिवस, तरी दारी आवस सदाचीच. हंबरला गळा सोसताना कळा, दाटला उमाळा उरातच. आता वाटू लागे जिण्याचीच लाज, मोकलावी आज आशा सारी.." दिवस उगवल्यापासून तो काळोखात बुडेपर्यंत राब-राब राबलं तरी हा समाधानाचा दोर काही हाताशी येईना या अवस्थेत जगणाऱ्यांची ही गोष्ट आहे.

सामाजिक विषमतेच्या चटक्यांनी भाजून निघालेल्या नारायण धुळे यांचा संघर्षही असाच आहे. रोज उठलंकी शेरडं-करडं घेऊन अर्ध वय झालेलं असतानाही या शेरडांमागं वर्षानुवर्षे धावावं आणि दहा पाच-दहा पाच रुपये गाठीशी साचून जमीन घ्यावी तर इथल्या निर्दयी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या झुंडीनी या माणसाचे अक्षरशः डोळे काढावेत. तेही जन्मदात्या पोरीसमोर आणि आयुष्याच्या जोडीदारणीसमोर. हे घडलं तेव्हा काय विचार केला असेल त्या कोवळ्या जीवाने आणि काय आघात झाले असतील त्या बायकोवर हे मांडणारी ही एक गोष्ट.

पिढ्यानपिढ्या सत्ता भोगणाऱ्या पुढाऱ्यांना सत्तेचा हव्यास वाढत गेला आणि कुठली सत्ता कशी राबवायची, टिकवायची, त्यातून आपला उत्कर्ष कसा साधायचा याचाही मेळ लागत गेला. पण या सत्तेच्या परिघात इथला राबणारा शेतकरी किती? आणि कशाचा वाटेकरी? त्याने फक्त राबायचं. लेकराला लवकर झोपी घालून उशिरा म्हशीची धार काढायची आणि सकाळी लवकर लेकरं उठायच्या आत ते दूध विकायचं. कारण घरच्या सगळ्याच लेकरांनी ते दूध पिलं तर मग डेअरीला काय घालायचं? एवढं सारं करूनही पिकलं त्याचा भाव का मिळत नाही त्याला? का होत नाही तो या कर्जबाजारातून मोकळा? किती दिवस त्याच त्याच लोकांना निवडून देणार? एकाच ठिकाणी सगळ्या सत्ता एकवटलेल्या मग आपण कार्यकर्ते फक्त राबण्यासाठीच का? यांना का नाही मिळत ही सत्ता? यांची पोर का होत नाही सत्ताधीश? लोकशाही म्हणून मिरवणाऱ्या देशात पुन्हा पुन्हा सत्ता एकवटली जाते तिचे विकेंद्रीकरण का होत नाही? आपण आपल्या आयुष्याची राख करून लोकांसाठी दिवे पेटवले तरी आपला अंधार का हटत नाही? घरावर तुळशीपत्र ठेऊन रात्रीचा दिवस एक केला तरी आपल्या संघर्षाला यश का मिळत नाही? चळवळीत काम करतो आहोत म्हणून कायम आपल्याच वाट्याला फरफट का? कुठल्या प्रस्थापित पक्षात असतो तर ही फरफट आली असती का वाट्याला? आपण फाटके कार्यकर्ते आहोत म्हणून कायम पराभवच पचवायचा का? अशा असंख्य प्रश्नांनी गारुड केलेली ही एक गोष्ट आहे आणि हे प्रश्न वाचकालाही कायम कुरतडत राहतात.

एवढ्या सगळ्या संघर्षानंतर शेवटी रामची आणि नामाची अवस्था काय झाली? या इतक्या कठोर लढाईत कुणालाही अंगावर घेण्याची ताकत ठेवणारा राम शेवटी आतून हललायं थोडा पण नामाने मात्र आशा कायम ठेवलीये. कुजलेलं खतसुद्धा वाया जात नाही, त्यानं मातीचा पोत सुधारतो मग जिवंत माणसांची धडपड वाया कशी जाईल असा विश्वास त्याला वाटत राहतो. आजवर पेरलेले उगवून येईल का असा प्रश्नच त्याला पडत नाही आणि सगळं वाया गेलंय असंही त्याला वाटत नाही. 'वाटतं एवढी वर्ष जे काम केलंय ते तण उपटून काढायचंच होत. राब भाजण्याचंच होत. आता पेरायचं काम पुढच्यांनी करावं, त्याचीच वाट मी पाहतोय. अजूनतरी माझ्यातला कुतूहल मेलेलं नाही.' कित्येक प्रश्न, कित्येक कार्यकर्ते जागच्याजगीच नष्ट झाले तरीही या असंख्य कष्टकरी हातांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची होळी झाली तरी आशा मात्र सोडली नाही. ही गोष्ट मोठी रोमहर्षक वाटते.

आजपर्यंत आसाराम लोमटे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अशाच कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि कथा आपल्या लेखणीतून मांडलेल्या आहेत. 'धुळपेर' नावाने लेखसंग्रह आहे. त्यामध्येही याच मातीतले आणि मनातले कित्येक प्रश्न त्यांनी मांडले. पुढे "इडा पीडा टळो" या कथासंग्रहातून गावजीवन मांडलं. तसाच 'आलोक' हा गावातल्या समाजवास्तवाचे चित्रण असणारा कथासंग्रह. साहित्य अकादमीचा पुरस्कार या कथासंग्रहाला मिळाला आणि एक नवी उंची लोमटे यांनी गाठली. अगोदर लेखसंग्रहातून नंतर दोन कथासंग्रह आणि आता कादंबरीतून आपल्या समोर आलेले आसाराम लोमटे यांचं लिहिणं म्हणजे प्रचंड खोलातलं निरीक्षण आणि अफाट समजावून सांगणारी वाक्यरचना. कथेचा शेवट होईपर्यंत कचकटून बांधून ठेवणारी निवेदनशैली. याच पायावर उभी असणारी अगोदरची साहित्यकृती आणि ही 'तसनस'ही त्याच मार्गावरून जाणारी. जगणं आणि जगण्यातला ज्वलंत संघर्ष सांगणारी !

कादंबरी - तसनस

लेखक - आसाराम लोमटे

प्रकाशन - शब्द पब्लिकेशन

किंमत - ४८५.g> रुपये.

--------------

ganeshpokale95@gmail.com

बातम्या आणखी आहेत...