आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईपणाला उदात्त बनवणाऱ्या, तिची महती गाणाऱ्या हजारो कविता, गाणी समाजात नैतिकतेचे मूल्य रुजवत आल्या आहेत. या आदर्शवादी संकल्पनेला तडा जाईल असं वागणारी, आईपण नाकारणारी, बाईपण नाकारणारी स्त्री या समाजात कलंकिनी, कुलटा, वाईट ठरते.

‘माँ ने बोला था, घर ज्यादा जरूरी है मन मारना पडता है औरतों को.. बर्दाश्त करना सीखो औरत हो.. लडका कुछ गलत करे कोई उसे नहीं कहता कि तुम गलत हो. औरतों से कहा जाता है माफ कर दो..’

जिथे मुलींना आत्मसन्मानाचा बळी द्यायला शिकवलं जातं त्या धारणेच्या, पारंपरिक समजुतींच्या गालावर थप्पड लगावणाऱ्या ‘थप्पड’ या सिनेमातील हा प्रसंग मला तेव्हा विशेष वाटला, जेव्हा हा प्रसंग पाहून, ‘अं, त्यात काय झालं, नवरा होय! मारतच असते बायकोला! त्यानं मारलं म्हणून काय तोड घ्यायची असते काय?’ अशी सिनेमा पाहून थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या एका स्त्रीची प्रतिक्रिया मी ऐकली होती.

पुरुषाने मारहाण, शिवीगाळ करणे, त्रास देणे ही सामान्य बाब नव्हे, त्याचा अधिकार म्हणून समाज त्याकडे पाहतो. म्हणजे अशा गोष्टींचं किती सामान्यीकरण झालंय हे लक्षात येतं. नवरा-बायकोच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये किंवा त्याचं प्रेम आहे तिच्यावर तो तिला मारेल नाही तर प्रेम करेल, तो अधिकार आहे त्याला, अशा समजुतींनी पुरुषांच्या स्त्रीवरील अन्यायाचे समर्थन आणि सामान्यीकरण केले जाते. मग ती बायको असो, बहीण, प्रेयसी वा आई असो. मातृत्वाच्या प्रतिमेला तर इतके गृहीत धरले जाते की तीही आपल्यासारखीच भावभावना असलेली स्वतंत्र व्यक्ती आहे हेच विसरलं जातं. साहित्य, काव्य, चित्रपटांमधून मातृत्वाचे गोडवे गात मातृत्वाला गौरवले गेले. दैवत्वाच्या पातळीवर सर्वोच्च स्थानी बसवले गेले. मात्र कुटुंबात, समाजात आईपणाच्या दडपणाखाली त्याच मातृत्वाकडून त्यागमय, सोशिक, उदात्त अशीच वर्तणूक अपेक्षिली गेली. ‘आई’ हा शब्द उच्चारताच नतमस्तक होऊन तिचे माणूसपण नाकारणे, तर आई कुणाचीही असो, तिला साष्टांग दंडवत, नमस्कार घालून तिचं सामान्यपण नाकारणं, आणि अशा कृतींमधून आईपणाचं देवत्वाचं दडपण तिच्यावर लादणं, ‘तू आई झाल्यावर कळेल लेकरांची काळजी काय असते’, किंवा ‘ती आई असून आईपणाला कलंक आहे.’ ‘पुत कुपुत सुने हैं पर ना माता सुने कुमाता’ अशा वाक्यांमधून नको असलेलं मातृत्व लादणं, वा मातृत्वाच्या आदर्शवादी कल्पना मुलींमध्ये रुजवणं, समाजात रुजवणं यात ही व्यवस्था सोयीस्कररीत्या यशस्वी झाली आहे.

‘चमचमत्या चांदण्यांचा कैफ आज अंबरात हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या उरात जाईन जरी कुठवरही.. वंदनीय तिचे पाय माझी माय सत्त्व एकच, दैव एकच, मंत्र एकच माझी माय’ किंवा ‘हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी स्त्री ही बंदिनी’ अशी गीते दूरदर्शन वाहिन्यांची शीर्षकगीतं असतात तेव्हा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. साने गुरुजींच्या “श्यामची आई’ने ही आदर्श मातृत्वाची आखीवरेखीव चौकट अधिक पक्की केली.

आईपणाला उदात्त बनवणाऱ्या, तिची महती गाणाऱ्या हजारो कविता, गाणी समाजात नैतिकतेचे मूल्य रुजवत आल्या आहेत. या आदर्शवादी संकल्पनेला तडा जाईल असं वागणारी, आईपण नाकारणारी, बाईपण नाकारणारी स्त्री या समाजात कलंकिनी, कुलटा, वाईट ठरते. देशभक्तिपर कवितांमध्ये देशप्रेम, देशभक्ती दिसत असली तरी व्यवस्थेने जनमानसात रुजवलेली विशिष्ट प्रतिमा अनेक गीतकाव्यांमधून अधोरेखित होते. ती म्हणजे मातृभूमी ही संकल्पना. यामागे देशासाठी जाणीवपूर्वक मातृभूमी, भारतमाता, जन्मभूमी ही मातृत्वाची गौरवशाली संकल्पना वापरणे आणि त्याआधारे तिच्या सन्मानार्थ, रक्षणार्थ स्फूर्तिकाव्य लिहून विशिष्ट भावना, उत्तेजना जागृत करणे या प्रेरणा होत्या. कारण माता, जननी ही संकल्पना समाजात आधीच उदात्त, दैवी मानली गेलेली असते. शिवाय तिची प्रतिष्ठा ही संवेदनाशील बाब असते. मातृभूमीच्या रक्षणार्थ तिच्या पुत्राने प्राणपणाने लढायचे असा संकेत तयार होतो. तर, तिच्यावर आधिकार गाजवू पाहणारे, तिला पारतंत्र्यात ठेवू पाहणारे तिचे शत्रू बनतात. स्वातंत्र्यपूर्व काळात साखळदंडांनी जखडलेली, चेहऱ्यावर, शरीरावर व्रण असलेली अशी बंदीवान भारतमातेची प्रतिमा, किंवा लुटली जाणारी दिन, गरीब भारतमातेचं चित्र असलेली प्रतिमा / कॕलेंडरसुद्धा छापलं गेलेलं होतं. आजही शाळा-महाविद्यालयांमधून अशी प्रतीकात्मक भारतमाता साकारली जाते. तिचं दुःखी असणं पारतंत्र्याचं तर अलंकारांनी सुशोभित असणं हे संपन्न, स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जातं.

दबलेली, पिचलेली, अन्यायग्रस्त अशी आणि उच्चभ्रू, दैवी अशी भारतीय स्त्रीची दोन रूपातली प्रतिमा कवितेतून, देशभक्तिपर गीतांतून साकारली गेली. या प्रतिमा कुणीही अल्पसंख्याक भारतीयसुद्धा नाकारू शकत नाहीत. इतकी जाज्वल्य देशभभक्ती आणि संवेदना भारतीयांच्या मनात रुजलेली आहे. इथेसुद्धा मातृत्वाच्या आडून देशाभिमान जागृत करणे, विशिष्ट धार्मिक, सांस्कृतिक सत्ता स्थापित करणे असा पुरुषी दृष्टिकोन सफल होतो. देश, राष्ट्र, प्रदेश ही संकल्पना जाणीवपूर्वक स्त्रीरूपात, मातेच्या रूपात तयार करण्यात आली. कारण स्त्रीभोवती परधर्मद्वेष, परसमूहद्वेष सहज गुंफता येतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या बहुतांश कवितांत या प्रतिमा वापरल्या. मातृत्व हे विशिष्ट पद्धतीने सत्तेला नामोहरम करण्यासाठी विशिष्ट व्यक्ती वा समूहाचे अवमूल्यन, अपमान करण्यासाठीसुद्धा वापरले गेले. संपूर्ण जगभरात ‘म’ वरील शिव्यांचे राजकारण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. अशा विविध आदर्शवादी मातृत्वाच्या संकल्पनांनी, व्यवस्थेच्या कुटिल राजकीय डावपेचांनी बाईचं जगणं मात्र एक व्यक्ती म्हणून नेहमीच नाकारलं जात आलं आहे. म्हणूनच नेहा नरुका या कवयित्रीच्या पुढील ओळी आठवतात.

मेरी माँ महान है / तभी तो आज तक मेरे लम्बे-चौड़े-मोटे घर का / अकेले ही खाना बना रही है / अकेले ही झाड़ू लगा रही है / अकेले ही बरतन साफ़ कर रही है / अकेले ही पीट-पीटकर कपड़े धो रही है /अचार से लेकर पापड़ तक, सबकुछ घोषित प्रेम की तरह अकेले ही बना रही है/

सारिका उबाळे संपर्क : muktaprabodhini@gmail.com

बातम्या आणखी आहेत...