आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाई आखर प्रेम का...:प्यार क्या है...?

गीत चतुर्वेदी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही गोष्टी अशा असतात की ज्यावर चिंतन,मनन करण्यापेक्षाही अधिक त्या जगणं आवश्यक असतं. प्रेमसुद्धा तेच आहे.प्रेमावरची दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर आहे, प्रेमाची दहा मिनिटे प्रत्यक्ष जगणं. जशी साखरेची चव आपण कुणाला सांगू नाही शकत,त्याला स्वतःलाच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तसेच प्रेमदेखील आहे.... ते तिखट आहे की गोड, हे जाणून घेण्यासाठी स्वतः प्रेम करावं लागतं. हा आगीचा समुद्र आहे की बर्फाचा पर्वत,स्वतः प्रेम केल्याशिवाय हे समजून घेता नाही येऊ शकत.

मानवी इतिहासात ज्या प्रश्नांवर सर्वाधिक चिंतन झालं आहे,त्यातील एक प्रश्न आहे, प्रेम काय आहे? आणि तमाम प्रश्नांप्रमाणे याचंही एक योग्य उत्तर आजपर्यंत मिळू शकलेलं नाही.ज्याप्रकारे दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे एकसारखे असू शकत नाहीत, त्याचप्रमाणे दोन व्यक्तींचे प्रेमाचे आकलन आणि त्याची परिभाषा एकसारखी असू शकत नाही.या जगात जितके लोक आहेत, प्रेमाला प्राप्त करण्याच्या आणि समजून घेण्याच्या त्यांच्या त्यांच्या पद्धती आहेत. याच्याव्यतिरीक्त प्रेमाची कुठली सर्वमान्य परिभाषा असू शकत नाही. जेव्हा कुणी असे म्हणतो की प्रेम ही एक अशी अनुभूती आहे की, जी मला एकटं पडण्यापासून वाचवते वा माझ्या चेहऱ्यावर हास्य आणते वा आयुष्याला होरपळवणाऱ्या आगीमध्ये माझ्या आत्म्यावर पाण्याचे शीतल थेंब बरसवते,तेव्हाही आपण खरेतर प्रेमाच्या परिभाषेवर नव्हे तर, उपयोगीतेवर चर्चा करत असतो. आणि निव्वळ प्रेमच नाही, प्रेमाशी जोडल्या गेलेल्या कलांची परिभाषादेखील जवळ जवळ असंभव आहे.आपण उपयोगितेला परिभाषा समजायला लागतो.

त्यानंतरसुद्धा, मनात एक प्रश्न अवश्यच येतो की अखेर आपण प्रेम का करत असतो? वा जसे की म्हटले जाते, ते केले जात नाही तर होत असते,तर प्रेम काय आहे? कुठची क्रिया आहे? कुठचा विचार आहे? कुठची मानसिक स्थिती आहे? की आपल्या वासनांना झाकण्यासाठी पांघरलेला एक मुखवटा आहे? आपल्या जगाला प्रेमाची गरज आहे? आपणांस खरोखरच बागेत बसणाऱ्या, गाणी गाणाऱ्या, डोळ्यांशी डोळ्यांनी बोलणाऱ्या रोमॅंटिक टाईप प्रेमाची आवश्यकता आहे? याचे उत्तर ना विज्ञानापाशी आहे ना मानसशास्त्राकडे आहे.या सर्वांजवळ आपापली थिअरी आहे,परंतू कुठल्याही थिअरीला परिपूर्ण मानले जाऊ शकत नाही.

बुद्ध म्हणत असत, प्रेम हा असा काही नजराणा आहे की जो आपण कुणालातरी देऊ शकतो. आणि यालाच पुढे नेत प्लेटो म्हणत होता की,प्रेमच ती गोष्ट आहे जी आपणांस परिपूर्ण बनवते अन्यथा आपण तर जगात अपूर्णच राहात असतो. एक जुनी ग्रीक कथा आहे की मनुष्याजवळ आधी चार हात,चार पाय आणि दोन चेहरे होते.तो गर्वाने ऐटीत इकडून तिकडे भटकत असे. एक दिवस त्याने देवतांचा अवमान केला.त्यामुळे देवतांचा राजा जियसला राग आला आणि त्याने माणसाला दोन भागात विभागले. दोन हात,दोन पाय,एक चेहऱ्याचे दोन भाग.तेव्हापासून मनुष्य अपूर्ण आहे आणि परिपूर्ण होण्याकरिता आपल्या दूसऱ्या भागाला शोधत राहातो तो.

यामुळेच, प्रेम खरेतर एक प्रतिक्षा आहे,आपल्या आत्म्याच्या दूसऱ्या तुकड्याचा शोध घेऊन ते प्राप्त करण्याची प्रतिक्षा. जर हीच गोष्ट असेल,तर प्रतिक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रीति संपून जायला हवी.वा काही वेळा मनुष्य एकापेक्षा अधिक प्रेमी,जोडीदारासोबत स्वतःला परिपूर्ण मानायला लागतो.एका प्रचलित मान्यतेनुसार प्रेम हे एकदाच होत असते आणि एकाबरोबरच होत असते.अनेकांवर जडते ते प्रेम नव्हे वासना आहे परंतू ही गोष्टही पूर्णपणे पटत नाही कारण प्रेम एक तहान पण आहे, प्रेम एक नशासुद्धा आहे.आणि एकदा पाणी प्यायल्याने आयुष्यभराची तहान शमत नसते.काही लोक असे मानतात की प्रेम नदीच्या प्रवाहासारखे असते जे प्रत्येक क्षणी नवं नवं होत राहातं. आपणांस वाटलं तर एकाच व्यक्तीशी हजारदा प्रेम करावं आणि वाटलं तर हजार लोकांबरोबर वेगवेगळ्या तर्‍हेने प्रेम करावं. काही लोक आनंदी होण्यासाठी प्रेम करतात,तर काही लोक प्रेम केल्यानंतर समोरच्यामध्ये इतक्या त्रुटी शोधायला लागतात की चहूबाजूला अक्षरशः फक्त दुःखच दुःख पसरावे.जर्मन तत्ववेत्ता शोपेनहाॅवर म्हणायचा की लोक या गफलतीतून प्रेम करतात की त्यांचा प्रेमी त्यांना आनंद देईल. तो स्पष्टपणे म्हणत असे की,आपणांस कधीही अन्यजन आनंद देऊ शकत नाहीत,केवळ आपणच स्वतःला आनंदी करू शकतो.

असा सर्व विचार करणे हेच समस्येचे खरे मूळ आहे. काही गोष्टी अशा असतात की ज्यावर चिंतन,मनन करण्यापेक्षाही अधिक त्या जगणं आवश्यक असतं. प्रेमसुद्धा तेच आहे.प्रेमावरची दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर आहे, प्रेमाची दहा मिनिटे प्रत्यक्ष जगणं. जशी साखरेची चव आपण कुणाला सांगू नाही शकत,त्याला स्वतःलाच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तसेच प्रेमदेखील आहे.... ते तिखट आहे की गोड, हे जाणून घेण्यासाठी स्वतः प्रेम करावं लागतं. हा आगीचा समुद्र आहे की बर्फाचा पर्वत,स्वतः प्रेम केल्याशिवाय हे समजून घेता नाही येऊ शकत. इथेच बुद्धांचा विचार पुन्हा एकदा आठवतो की 'आपण खरेतर स्वतःच्याच एका प्रतिबिंबावर प्रेम करत असतो'. याप्रमाणे असं म्हणता येऊ शकतं की माणूस जसा असेल त्याचा ईश्वरदेखील तसाच असेल आणि त्याचे प्रेमसुद्धा तसेच असेल.

प्रेम याप्रमाणे

प्रेम याप्रमाणे केले जावे

की प्रेम शब्दाचा कधी

उल्लेखसुद्धा न व्हावा.

याप्रमाणे चुंबिले जावे

की ओठ नेहमी गफलतीत राहावेत

तू चुंबिलेस की,

माझ्याच खालच्या ओठाने अचानक

वरच्याला स्पर्शिले आहे.

स्पर्श असा व्हावा

की मैलोन् मैल दूर तुझ्या त्वचेवर

हिरवी हिरवी स्वप्नं उगवावीत

तुझ्या देहाच्या सज्जाखाली

पहाटेने जलतरंग वाजवावे.

याप्रमाणे राहावे की

निद्रेच्या आत एक स्मितहास्य

तुझ्या चेहऱ्यावर राहावे

जेव्हा तू डोळे उघडशील,

त्याने वेष बदलावा.

प्रेम याप्रकारे केले जावे

की जगाचा व्यवहार सुरू राहावा

कुणाला पत्ताही लागू नये की

प्रेम जडले आहे

खुद्द तुलाही माहित पडू नये.

कुणाला ऐकवावी आपल्या

प्रेमाची कहाणी,

तर कुणी विश्वासपण ठेऊ नये

प्रेमकथांमधील पात्र बनण्यापासून

बचावले जावे

अन्यथा सर्वजण तुझ्या प्रेमाची

कीव करतील.

मूळ कविता - गीत चतुर्वेदी (हिंदी साहित्याचे प्रख्यात कवी)

लेख आणि कविता अनुवाद : भरत यादव

बातम्या आणखी आहेत...