आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धे आकाश:लिंगभाव : विपर्यास आणि वास्तव

डॉ. मंजुश्री लांडगे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आधीच्या लेखात आपण जन्मापासून मुला-मुलींच्या वाढण्यातील सामाजिकीकरण आणि संस्कृतीकरणाच्या विविध टप्प्यांवर भाष्य केले. जन्मापासूनच सुरू झालेला हा प्रवास हा एका अर्थाने पुरुषांना वंशाचा दिवा म्हणून त्यांच्या अस्तित्वाला विशिष्टत्व बहाल करतो, तर त्याच वेळेला मुलींचे सर्वसामान्यीकरण करत तिचे खच्चीकरण करतो. या दोन्हीही जडणघडणींमध्ये प्राथमिक आणि दुय्यम लिंग अशा सामाजिक ओळखीच्या या रचनेमधून ‘त्व’मध्ये जगण्याला बांधले जाते.

याच समाजातील आणखी एक अवकाश जो या ‘त्व’च्या पुढे जाऊन लढतो आहे. आपली विशिष्ट ओळख घेऊन हा समूह जगतो आहे. त्यांच्या या जगण्याच्या, अस्तित्वाच्या ओळखीचे जे काही मार्ग आहेत, ते अनेक संघर्षांनी भरलेले आहेत. कोणतेही बाळ जन्माला येते त्या वेळेस कुठे, कसे, काय म्हणून जन्म घ्यायचा, हे त्यांच्या हातात नसते. कधी जन्मतः, तर कधी विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांना आपली खरी ओळख होत जाते. वाढत्या वयातील शारीरिक बदलांमुळे आपली वेगळी ओळख घेऊन हा समूह अनेक वर्षांपासून जगत आला आहे. त्यांच्या हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल बोलू लागला आहे. होय, ज्या समूहाबद्दल मी आज बोलणार आहे, तो म्हणजे ‘एलजीबीटीक्यू’, ज्यांना काही जण तृतीयपंथीदेखील संबोधतात. मुळात तृतीयपंथी हा शब्दच विषमताधिष्ठित आहे. प्रथम, द्वितीय आणि मग उरलेले तृतीय हेच स्वीकारार्ह नाही. हा सामाजिक दर्जा म्हणजेच लिंगभावी संरचना, समाजातील प्रथम, द्वितीय दर्जा ही ओळखच लिंगभावी संरचना उभी करते. या संरचनेमधूनच तृतीयपंथी हा शब्द पुढे आलेला दिसतो. म्हणून या शब्दालासुद्धा काही पर्यायी शब्दाचा विचार होऊ शकतो. त्यांचं जे अस्तित्व आहे, ते स्वीकारण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नावर बोलणं महत्त्वाचं ठरू शकतं, असं मला कायम वाटतं.

मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा जेवढा इतिहास राहिला तितकाच मोठा इतिहास हा एलजीबीटीक्यू या समुदायालादेखील आहे. आतापर्यंत इतिहास हा कायम पुरुषांनी लिहिल्यामुळे त्या लेखनामध्ये पुरुषी हस्तक्षेप दिसतो. त्याचप्रमाणे या समुदायाचा, या तिसऱ्या अवकाशाचा (हा शब्द नाइलाजाने मला वापरावा लागतोय.) देखील इतिहास हा दुर्लक्षित, वंचित राहिलाय. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्त्री किंवा पुरुष यांच्याबरोबर या दुर्लक्षित समूहाचे प्रश्न आजही विदारक आहेत. समाज त्यांच्याकडे कसे बघतो व काय विचार करतो, यामुळे बऱ्याचदा कुटुंबात त्यांची ओळख न स्वीकारता त्यांचे जगणे असह्य होत जाते. वाढत्या वयातील शारीरिक फरकांमुळे कितीही झाकण्याच्या प्रयत्न केला तरीसुद्धा कुटुंबाला नको असलेली ओळख जाहीरपणाने कुटुंबात, समाजात सर्वांसमोर येतेच. कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्यांना मान-सन्मान, प्रतिष्ठा देणारी असते. मात्र, ज्या समूहाबद्दल आपण बोलतोय, त्याची ओळख त्यांची मानहानी करणारी आहे.

आज भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. या ७५ वर्षांच्या स्वतंत्र भारतात अनेक संघर्षांनंतर या समूहाला नागरिक ओळख मिळाली, त्याला अवघी काही वर्षेच झाली आहेत. एलजीबीटीक्यू हे भारताचे नागरिक म्हणून आजही बाल्यावस्थेतील नागरिक आहेत, म्हणून त्यांच्या निकोप संगोपनासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते. आतापर्यंतच्या पारंपरिक, दैववादी, वाढत्या आधुनिकीकरणातून होणाऱ्या नागरीकरणाच्या प्रवाहामुळे त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न हे कधी भिक्षा मागून, तर अनेकदा देहविक्रयामधून सुटले आहेत. भारताची राज्यघटना प्रत्येक नागरिकाला कलम २१ (अ) अंतर्गत ‘लिव्ह अ लाइफ विथ डिग्निटी’ बहाल करते. हे कलम भारताच्या प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देते. त्याच वेळेला हा समूह त्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी धडपडतोय, हे वास्तव आहे. एकीकडे आज स्वतंत्र भारतामध्ये जेंडर इक्वॅलिटी अर्थात लिंग समानतेची चर्चा सुरू असताना, कधी जन्मत:, तर कधी स्वत: निवडलेल्या लिंगओळखीमुळे त्यांना नागरिकत्वाचे अधिकार हा समाज नाकारतो. त्यांच्या ओळखीचा स्वीकार करून त्यांना या देशाचे एक सुज्ञ नागरिक म्हणून जोपर्यंत आपण सर्वमान्य करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रश्नांचा विचार होऊ शकणार नाही. पिढ्यान‌्पिढ्या दाबून-दडवून ठेवलेल्या विचारांना मोकळी वाट देत, त्यांच्या सहअस्तित्वातून भारतीय नागरिक म्हणून आपण जगू शकतो, हे सत्य स्वीकारणार नाही, तोपर्यंत त्यांची जनगणनाही पारदर्शकपणे होऊ शकणार नाही. यासाठी सार्वजनिक अवकाशातील मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण यामध्येही त्यांच्या वावरण्यातील अघोषित बंदी उठवावी लागेल. वेगळ्या वाटेवर जाणारे सहप्रवासी म्हणून जोपर्यंत त्यांच्यामध्ये सहजपणाने मिसळू शकत नाही, त्यांच्या भावभावना या आपल्यासारख्याच आहेत, हे समजून घेऊ शकत नाही, तोपर्यंत हा अपुरा असा प्रवास ठरेल.

आपण लहानपणापासूनच शाळेमध्ये “वी द पीपल ऑफ इंडिया’ असं म्हणत वाढलो आहोत. या ओळींमधील ‘वी’मध्ये त्यांचा सहभाग निश्चितच महत्त्वाचा आहे, जो शिक्षणातून, त्यांच्या व्यवहारातून, त्यांच्या श्रमातून, योगदानातून पुढे येऊ शकतो. हा सहभाग निश्चितच कुटुंबाच्या, समाजाच्या व पर्यायाने राष्ट्राच्या विकासामध्ये भर घालणाराच राहू शकेल, यात काही शंका नाही...

बातम्या आणखी आहेत...