आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:आता तरी संघटित व्हा !

पौर्णिमा सवई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कष्ट पहाडाएवढे। राई एवढाच दाम। बैलाचं राबणं जिनं। रात भुकी सामसुम। पिढ्यावर पिढ्या गेल्या। सारं काेरडं आभाळ। कुठं शिजतंया सोनं। कुटं फुका उतू जाळ।।

ए का कवीने शेतकऱ्याचे विदारक चित्र या कवितेतून मांडलेले आहे. शेतकऱ्याच्या पूर्वीपासून असलेल्या परिस्थितीचे अवलोकन केले, तर असेच चित्र आजही थोड्याफार फरकाने असल्याचे आपल्याला दिसते. परंतु, आता मात्र त्याच्या या परिस्थितीने टोकाची भूमिका घेतली आहेे. याला कारण आज शेतकऱ्याला ज्या अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो आहे, नैसर्गिक आपत्तीला तोंड देता देता त्याची दमछाक होते आहे आणि त्यातून काही प्रमाणात पीक वाचलंच, तर ते सुलतानी संकटाला बळी पडते आहे. परिणामी शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आजपर्यंत जवळपास चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा आढावा घेतला तर असे दिसते की, “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण’ अशी स्थिती आहे. शेती व्यवसायाकरिता लागणारी सामग्री, बी-बियाणे यांच्या किमती दुपटीने वाढत आहेत. मजुरांच्या मजुरीत दरवर्षी वाढ होते आहे, परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमती शाश्वत राहत नाहीत, उलट कमी होताना दिसत आहेत. मागच्या वर्षी मिळालेला पिकाचा भाव तोच टिकून राहील, याची शाश्वती नाही आणि म्हणून शेतकरी पुढल्या वर्षी जास्त भाव मिळेल, या आशेने शेतीत राबत असतो. परंतु, घडते नेमके उलटे. जसे जुगाराच्या डावात हरले की सर्वस्व जाते, तसेच शेतीसुद्धा जणू एक जुगार म्हणून केली जाते. त्यात उत्पन्नाची आणि भावाची हमी नसल्यामुळे शेतकरी डाव हरतो. सर्वांना भावना आहे, मन आहे, पण माझ्या शेतकरीराजाला ना मन ना भावना. अशा स्थितीत तो जगत असतो. आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काम करतात. त्यातील शेतीच्या शोधापासून ते शेतीतील जवळपास सर्वच कष्टाची कामे महिला करतात. परंतु, शेतकऱ्याची आजची अवस्था बघता ‘शेतकरीराजा, देशाचा कणा’ हे त्याला दिलेले भूषण-उपाधी आज शाप ठरतेय. कारण शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या. आज शेतीची परिस्थिती बघितली तर शेतकरी “ना घर का ना घाट का’ अशा स्थितीत पोहोचलाय. स्वतःच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार त्याला नाही. सरकारी खरेदीत स्वतःचा माल विकताना रांगेत उभे राहून अपमान सहन करावा लागतो. तिथेही त्याच्या मालाचे ग्रेडेशन (प्रतवारी) करून शेतकरी नाडवला जातो. शेतकऱ्याची बाजारपेठेतील अवस्था पाहिली, तर तिथे साधे पाणी पिण्याची व्यवस्थाही नसते. पुष्कळदा अवकाळी पावसात शेतकऱ्याचा माल उघड्यावर असतो आणि त्यात झालेले शेतकऱ्याचे नुकसान त्याला एकट्यालाच सहन करावे लागते. म्हणजे, शेतकऱ्याची बाजारपेठ म्हणून ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ ही शेतकऱ्याच्या किती हिताची आहे, हे दिसते. पण, संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, शेतमाल सोडून एकाही वस्तूची किंमत कमी होताना दिसत नाही. दररोज त्यात वाढच होते आहे. दरवर्षी कर्ज काढून शेती करणारा शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबून मरतो आहे. याची सरकार दरबारी नोंद घेतली गेली नाही, तर त्याचा उद्वेग होणे अपरिहार्य आहे. या वर्षी एका वर्षात ४५०० आत्महत्या नोंदल्या गेल्यात. त्यात काही महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा झाल्या आहेत. पूर्वी पुरुष शेतकरी आत्महत्या करायचे, परंतु या वर्षी महिला शेतकऱ्यांची त्यात भर पडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात... स्त्रीलाच भक्ती। स्त्रीलाच ज्ञान। तिलाच संयम शहाणपण। तिच्यानेच हलती वाटते। संपूर्ण संसारचक्र।। परंतु, आता तिच्या सहनशीलतेचा, संयमाचा बांध सुटला आहे. कारण ज्या कुटुंबात पुरुष काही कारणाने (आजारपण, मृत्यू) शेती सांभाळत नसेल, तर त्या कुटुंबातील महिलेला शेती सांभाळावी लागते. शेतकरीराजा ज्या संकटाचा सामना करत होता, आता त्या संकटाचा सामना शेतकरी राणीला करावा लागतोय. सर्व सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यकर्ते मात्र कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाहीत. निवडून जाणारे लोक प्रथम शेतकऱ्यांची मुलं असतात. परंतु, सत्तेत गेल्यावर मात्र याचा त्यांना विसर पडतो. शेतकऱ्याचा, त्याच्या कुटुंबाचा विजेचा संघर्ष, शेतमालाच्या भावाचा संघर्ष जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शासनाने याचा विचार करावा की, जेथे कर्मचाऱ्यांना ३० हजार ते ८० हजार रुपये पेन्शन पुरत नाही, तिथे शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये कसे पुरतील? शेतकरी संघटित नाही. कर्मचारी संप पुकारतात. पण स्वतःच्या मालाला भाव मिळत नाही तरी शेतकरी कधी संपावर जात नाही. सर्व जगाची पर्वा करत तो जगतो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी जर संपाचे अस्त्र वापरले तर हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही. पाच आकडी पगार कमावणाऱ्या कामगाराला आई-वडील सांभाळता येत नाही. ते त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. परंतु शेतकरी मात्र वेळप्रसंगी शेत विकून, कर्ज काढून आई-वडिलांची सेवा करतात. शेतकऱ्याला पीक विमा हेसुद्धा एक गाजर आहे. कारण कधीच विम्याचा लाभ मला तरी दरवर्षी िवमा भरूनसुद्धा आजतागायत मिळालेला नाही. यामुळे विमा कंपनी हेसुद्धा सुलतानी संकट वाटते. माझा शेतकरी संघटित नाही, हे या शोषणामागचे कारण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात... हत्तीसी आवरी गवती दोर। मुंग्याही सर्पाशी करिती जर्जर। व्याघ्र सिंहाशी फाडती हुशार। रानकुत्रे संघटोनी।। आता ही वेळ शेतकऱ्यांवर, त्यांच्या घरातील राबत्या महिलांवर आली आहे. त्यामुळे त्यांनी संघटित व्हायला हवे. शासन दरबारीसुद्धा खऱ्या तत्त्वाला पुजणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींची गरज आहे. कारण मतदान ही दुधारी तलवार असते, थोडा चुकला तर स्वतःचा वार स्वतःवर वार उलटतो. याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांनी मतदानाच्या शस्त्राचा ब्रह्मास्त्रासारखा वापर करण्याची तयारी ठेवायला हवी. म्हणून शेतकरीराजा जागा हो, सैनिक म्हणून लढ. कारण ज्या वेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी संप पुकारला, तेव्हा कुटुंबासहित सहभाग नोंदवला. त्यामुळे शेतकरी बंधू-भगिनींनीही आता ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ असा नारा देत आपला हक्क पदरात पाडून घेतला पाहिजे. संपर्क : ९७६६०२२१२६