आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:उठता लाथ, बसता बुक्की...

डॉ. सविता बहिरट19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्याला नियंत्रणात, धाकात ठेवण्यासाठी हिसेंचा वापर या अर्थाने ‘उठता लाथ, बसता बुक्की’ ही म्हण वापरली जाते. अशाच अर्थाची ‘दो उठती के मारो, दो बैठती के मारो’ ही म्हण भारताच्या काही राज्यांमध्येदेखील वापरली जाते. एका अर्थाने या म्हणी स्त्रियांना नियंत्रित, धाकात ठेवण्यासाठी प्रचलित आहेत. याच म्हणींना पुष्टी देणारी व सर्वसामान्यांना थक्क करणारी आकडेवारी भारताच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलीय. २०१९ ते २०२१ या काळात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार नवऱ्याने केलेली मारहाण बायकांना व पुरुषांनाही योग्य वाटत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. पत्नी घरकाम व्यवस्थित करत नसेल, तिची कर्तव्ये पार पाडत नसेल, योग्य पद्धतीने वागत नसेल, तिला स्वयंपाक चांगला बनवता येत नसेल तर पतीने पत्नीला मारायला काहीच हरकत नाही, असे बहुतांश पुरुषांबरोबर महिलांनीही मान्य केलेय. विशेष म्हणजे देशभरातील ४५.४ टक्के स्त्रिया व ४४ टक्के पुरुषांनी यावर सहमती दर्शवलीय. ही आकडेवारी आपल्याला एकविसाव्या शतकात पाहायला मिळत आहे ही चिंताजनक बाब आहे. स्त्री-पुरुषांमधील या वर्चस्वाच्या, हुकमीपणाच्या धारणा या समाजमनात कळत-नकळत खोलवर रुजल्याचे चित्र या आकडेवारीतून दिसते.

नवरा-बायकोची भांडणं झाल्यानंतर चारचौघांत सहजपणे बायकोचा अपमान करणारी मंडळी ही आपल्याही आजूबाजूला आहेत. काही प्रसंगी बायकोवर अगदी सहजपणे हातही उगारला जातो. ही हिंसा जेवढी शारीरिक असते तेवढीच ती मानसिकही असते. अशा प्रसंगांमध्ये स्त्रियांना कायम एक सल्ला दिला जातो तो म्हणजे नमतं घ्या, ऐकून घ्या. आणि हा नमतेपणा, ऐकून घेण्याचे सत्र नंतर आयुष्यभरासाठी सुरू राहते. याची असंख्य उदाहरणे दिसतात. म्हणूनच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची ही आकडेवारी समाजातील स्त्री-पुरुष मानसिकतेचा आरसा दाखवणारी आहे.

जेव्हा नवऱ्याकडून बायकोला मारहाण होते, शिवीगाळ होते त्याकडे सहजपणे डोळेझाक केली जाते. कारण त्या स्त्रीचा तो नवरा असतो, पती परमेश्वर असतो...! तो उगीच कसा हात उचलेल? तिचीच काहीतरी चूक असल्यामुळे तो तसा वागतो, अशीच बडबड आपण ऐकतो. त्या मारहाणीचा, शिवराळ भाषेचा स्वीकारही करतो. पुरुषाकडून स्त्रीला झालेली मारहाण एका भीषण नैसर्गिकतेचे रूप घेते. या मारहाणीचे समर्थन करणारी मंडळी नवरा त्याच्या बायकोला प्रेमापोटी (?) मारतो असंही स्पष्टीकरण देतात. मग त्याअर्थी तर बायकोचं नवऱ्यावर प्रेमच नाही असं म्हणायचं का? कारण बायका चारचौघांत नवऱ्यावर हात उगारत नाही, शिवराळ भाषाही वापरत नाही. अर्थात, काही अपवाद असू शकतात. परंतु बहुतांशपणे बायका नवऱ्यांना आपला मान, स्वाभिमान ठरवत असतात. अर्थात, हा मान पुरुषांकडून त्यांना मिळेल याची काहीच शाश्वती नसते तरीही कपाळावरचं कुंकू हा तिचा सर्वात मोठा दागिना आहे व या दागिन्याचा मान राखणे हे त्या स्त्रीचे कर्तव्य आहे असे अगदी लहानपणापासून सामाजिकीकरण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांना शिकवलेले असते.

वास्तविक, पुरुषांकडून स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचे समर्थन करणारा हा दृष्टिकोन निव्वळ एकांगी आहे. समाजात स्त्री-पुरुषांना मोठे करताना पुरुषी वर्चस्वाच्या व हुकमीपणाच्या धारणा या लहानपणापासूनच बालमनावर कळत-नकळत संस्कारित होत असतात असं ‘थेरिरायझिंग पॅट्रिआर्की’ या पुस्तकात सिल्विया वाल्बी स्पष्ट करतात. निसर्ग समाजात स्त्री व पुरुष ही निर्मिती करतो, जी जननेंद्रियांच्या आधारे भेदीकृत असते. हा लिंगभेद नैसर्गिकच असतो. परंतु त्यापलीकडे स्त्री-पुरुषांमध्ये जे भेद निर्माण केले जातात ते समाजरचित असतात. तो लिंगभाव असतो असे कमला भसीन त्यांच्या ‘अंडरस्टँडिंग जेंडर’ या पुस्तकात नमूद करतात. याचाच अर्थ निसर्गाने पुरुषाला स्त्रीला मारण्याचा, नियंत्रणात ठेवण्याचा किंवा मग तिच्यावर हुकमीपणा करण्याचा अधिकार मुळीच दिलेला नाही. तसा तो स्त्रियांनाही पुरुषांच्या बाबतीत नाहीच. परंतु तरीही स्त्रियांवर अगदी सहजपणे हात उगारला जातो व त्याचे समर्थन स्त्री-पुरुष दोघेही करतात. पितृसत्तेतील वर्चस्वाच्या धारणा या केवळ स्त्री-पुरुषांमधील संघर्षाचे कारण ठरत नाही, तर पुरुषां-पुरुषांमधील संघर्षाचे कारणदेखील ठरतात. पुरुषांचे गँगवॉर, दोन गटातील हाणामारी, टवाळखोरी करून इतरांनाही हिंसा पोहोचवणे, एकतर्फी प्रेमातली हिंसा ही संघर्षाची कारणेही वर्चस्वाच्या, हुकमीपणाच्या धारणांमुळे निर्माण होतात. उलटपक्षी स्त्रियांचे गँगवॉर, भांडणे, टवाळखोरी करणे किंवा मग एकतर्फी प्रेमातून समोरच्या मुलावर हिंसा करणे अशा काहीशा बाबी आपण क्वचितच ऐकलेल्या असतील. याचे मुख्य कारण म्हणजे मुलींना स्त्रियांना मुळी शांत, सुस्वभावी, संयमी व शिस्तीने वागण्याचे संस्कारच असतात, तर पुरुषांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. लहानपणी मुलाचे नको ते हट्ट पुरवले जातात. त्यामुळेच कोणत्याही बाबतीतला नकार मुलांना सहन होत नाही.त्याचे पडसाद कुठल्या ना कुठल्या संघर्षात दिसतात. मुलांचा संयमीपणा, त्यांचा शांतपणा किंवा त्यांचा स्वभाव हा कोणीतरी काहीतरी केलं म्हणून लगेच संघर्षाच्या रूपात बदलतो. उलटपक्षी मुलींच्या बाबतीत ताणतणाव, संघर्ष कितीही असला तरी त्या संयमाच्या भूमिकेत दिसतात.

याचेच एक उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात औरंगाबादेत घडलेली घटना. एका नवविवाहित तरुणाने आत्महत्या केली. त्याचे कारण त्याच्या बायकोला व्यवस्थित साडी नेसता येत नाही, चांगला स्वयंपाक करता येत नाही हे होते..! बरं या पुरुषांकडून होणाऱ्या हिंसेचे समर्थन स्त्रिया का करतात, हाही प्रश्न गंभीरच आहे. याबाबतीत कमला भसीन म्हणतात, ज्या सत्तासंबंधाच्या वातावरणात पुरुषांचे सामाजीकरण होते त्याच वातावरणात स्त्रियादेखील मोठ्या होतात. पुरुषी वर्चस्वाच्या नजरेतून, त्याच विचारधारेतून त्या समाजात वावरत असतात त्यामुळे या वर्चस्वाच्या धारणा त्या अगदी सहजपणे स्वीकारतात. अंगीकारतात. त्यामुळे समाजात, कुटुंबात मुलींना-मुलांना मोठं करत असताना वर्चस्वाच्या सामाजिकीकरणापेक्षा समानतेचे, समतेचे सामाजिकीकरण महत्त्वाचे असते ही बाब अधोरेखित होते.

कमला भसीन म्हणतात, ज्या सत्तासंबंधाच्या वातावरणात पुरुषांचे सामाजिकरण होते, त्याच वातावरणात स्त्रियादेखील मोठ्या होतात. पुरुषी वर्चस्वाच्या नजरेतून, त्याच विचारधारेतून त्या समाजात वावरत असतात. त्यामुळे या वर्चस्वाच्या धारणा त्या अगदी सहजपणे स्वीकारतात. अंगीकारतात.

बातम्या आणखी आहेत...