आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारणतः आमचे पत्रकारितेचे वर्ग भरायचे ते संध्याकाळी, पण मी बरेचदा दुपारच्या सुमारास, चारेक तास आधीच कलिना कॅम्पसमध्ये जायचो. तिथे लायब्ररीमध्ये वाचन करत बसायचो किंवा मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा, टाइमपास करायचो. कुर्ला स्टेशनच्या वेस्ट बाजूने बाहेर पडलं की, बेस्टच्या बसची रांग लागलेली असायची. तो बसचा आरंभीचा स्टॉप. आता नेमका नंबर आठवत नाही, पण तिथून दोन बस कलिनाला जायच्या. एक साधी आणि दुसरी डबलडेकर. डबलडेकर कलिना कॅम्पसच्या आत जायची. त्यामुळे ती सोयीची असे. बरेचदा मी डबलडेकर बस धरायचो. मला डबलडेकर फार आवडायची. याचं एक कारण म्हणजे वरच्या मजल्यावर बसून खाली, रस्त्यावरची मजा पाहायला भारी वाटायचं आणि दुसरं म्हणजे, वरच्या मजल्यावरच्या दोन्ही रांगांच्या, सर्वांत पहिल्या सीट्सवर बसून समोरच्या खिडकीतून येणारा भणाण वारा अंगावर घेत प्रवास करायचा! यातला आनंद मुंबईकर म्हणून भन्नाट असायचा. कोंदट, दमट हवेत जणू खुल्ला एसीच! एके दिवशी असाच डबलडेकरमध्ये चढलो. भराभरा वर जाऊन पहिल्या सीट्स रिकाम्या आहेत का पाहिलं आणि खट्टू झालो. त्यावर लोक बसले होते. दुपारची वेळ असल्याने बस तशी रिकामी होती. रहदारीही ठीकठाकच. तसं मुंबईत कायम ट्रॅफिक असतंच, पण दुपारी जेवणाच्या वेळेला जरा कमी. खिडकीसमोरच्या पहिल्या सीटवर बसलेले लोक आपल्यासारखे वाराखाऊ असतील, असं मनातल्या म्हणत ‘ठीक आहे, धीर धर..’ असं स्वतःला समजावत मीही बसून घेतलं. बसलो खरा, पण माझं लक्ष सारखं पहिल्या सीटवर लागलेलं. कधी एकदा ते उठताहेत आणि मी जाऊन बसतोय, असं झालेलं. कंडक्टर आला आणि मी माझं लक्ष ढळू न देता तिकीट काढलं. सुटे पैसे घेतले. तेवढ्यात माझं लक्ष खेचलं गेलं ते हसण्याच्या आवाजाने. आवाज मोठा होता, पण मंजुळ होता, गोड लागत होता कानाला. मी मागे वळून पाहिलं, तर शेजारच्या रांगेतल्या दोन मुली गप्पा मारत, हसत-खिदळत होत्या. त्या दोघी जणींंनी काळेभोर बुरखे घातले होते. पडद्याच्या भागावर नाजूक एम्ब्रॉयडरी होती, दिसेल न दिसेल अशी. दोघी मैत्रिणी असाव्यात. मधल्या स्टॉपला चढल्या असाव्यात किंवा पहिल्यादेखील असेल. माझं लक्ष होतंच कुठे आजूबाजूला? पण, आता मात्र ते दुसरीकडे गेलंं. त्या दोघींचे डोळे कमालीचे सुरेख, रेखीव होते. ते नुसतेच सुंदर होते असं नाही, बोलकेही होते. जणू काही त्यांची सगळी अभिव्यक्ती त्या डोळ्यांमधूनच होत असावी! हाताची बोटं नाजूकसर आणि लांबसडक, अंगाला लावलेल्या अत्तराचा हलकासा, मंद सुवास. साधारणतः माझ्याच वयाच्या असाव्यात किंवा फार तर दोनेक वर्षांनी मोठ्या असाव्यात. हातवारे करत त्या एकमेकींशी काहीतरी बोलत होत्या. चांगलं मोठ्याने. जणू काही बुरख्याआड आवाज लपून राहू नये, याची पुरेपूर काळजी घेत होत्या त्या! त्यांच्याकडे टक लावून पाहणं योग्य नव्हतं, म्हणून मी समोर पाहू लागलो. पण माझे कान मात्र त्यांच्याकडेच होते. काय बोलत असतील त्या, कसं असेल त्यांचं आयुष्य, त्यांना असं बुरखा घालून जगणं आवडत असेल का, मुंबईतल्या दमट वातावरणात, उकाड्यात, उन्हात वैताग येत नसेल का त्यांना? अशा एक ना अनेक प्रश्नांचा विचार करत मी त्यांचं बोलणं ऐकू लागलो. बसच्या, ट्रॅफिकच्या आवाजात त्यांचं सगळं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं, पण तरी साधारणतः अर्थ समजत होता. पहिली म्हणाली, ‘अम्मी बाई आहे ना.. तरी कशी पार्शलिटी करते बघ..’ ‘काय झालं?’ दुसरीने विचारलं. ‘अगं आज सकाळी मला प्रोजेक्ट कम्प्लिट करायचा होता. म्हणून ब्रेकफास्ट करून मी अभ्यासाला गेले. तर अम्मीने हाक मारून आवरायला बोलावलं..’ ‘त्यात नवीन काय?’ ‘अगं, मी म्हणाले की भाईजान रिकामाय, तर त्याला टेबल आवरू दे. मला आज प्रेझेन्टेशन करायचंय वर्गात!’ ‘हां. नेहमीचंच म्हणाली असेल तुझी अम्मी – मुलगाय तो!’ ‘करेक्ट! हेच म्हणाली. माझं डोकंच सटकलं. मी म्हणणार होते, मी पण करून घेते ऑपरेशन आणि होते मुलगा. मग सोडते सगळ्यांना ऑर्डर!’ ‘काय? खरंच असं म्हणालीस तू!’ असं म्हणून त्यांनी एकमेकींनी टाळ्या दिल्या असणार. ‘मग काय, भेंडी मुलगाय तर काय झालं? नुसता बसून तर असतो, शिकत नाही. कामधंदा नाही. मी- आपण शिकतोय. उद्या चांगली नोकरीबिकरी लागेल, पण तरी यांचं म्हणणं हेच – मुलगाय तो! मी तर विचार करतेय की अमेरिकेलाच जायच- भुर्र उडून..’ दोघी हसू लागल्या. मलाही हसू येऊ लागलं, पण मी स्वतःला आवरतं घेतलं. तेवढ्यात ती म्हणाली, ‘चल जल्दी.. चल..’ अत्तर किंवा सेंटचा गंध हलकेच माझ्या अंगावरून पुढे गेला. खिडकीसमोरच्या, पहिल्या सीट्स रिकाम्या झाल्या होत्या आणि त्यांवर या बुरख्याआडच्या मुली जाऊन बसल्या होत्या! लक्ष विचलित झालं यार आपलं.. मी मनातल्या मनात चरफडलो. पण, ठीक आहे, बसू दे त्यांना.. असंही लगेच वाटलं. पुढच्या स्टॉपला शेजारच्या रांगेतली, खिडकीसमोरची पहिली सीट रिकामी झाली. मी लगेच जाऊन बसलो. त्या दोघींच्या बाजूला. त्या स्टॉपनंतरचा पुढचा स्टॉप बऱ्यापैकी अंतरावर होता. बस मोठ्या रस्त्याला लागलेली. त्यामुळे ड्रायव्हरने जरा वेग घेतला आणि वाऱ्याचा एक झोत झपकन् समोरच्या खिडकीतून अंगावर आला. मी तिरक्या डोळ्यांनी बाजूला पाहिलं, तर त्या दोघांनी एकमेकांचे हात हातात घट्ट धरले होते आणि त्या आपल्या नाकातून, फुफ्फुसात वारा भरून घेत होत्या. वाऱ्याच्या झोताने बुरख्याचा पडदा फडफडू लागला, तो वर उचलला जाऊ लागला. चेहरे दिसले, न दिसलेसे झाले. पण, त्यांचे डोळे बंद होते. त्यांना मात्र कशाचीही पर्वा नव्हती. ना माझी, ना बसची, ना बसमधल्या माणसांची, ना बुरख्याची, ना जगाची. शिडात वारं भरून घ्यावं तशा त्या वारा पिऊन घेत होत्या. त्याची फार गरज होती त्यांना...
प्रणव सखदेव संपर्क : 7620881463
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.