आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुकथा:सोन्याचा दिवस...

सई लळीत20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भराभरा पाय उचलत सुमन उन्हातून तळपत चालली होती. सकाळचे फक्त साडेनऊ वाजले होते. तरी पण उन्हाचा तडाखा जाणवत होताच. नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचला तिला जाग आली होती. हवेत गारवा होता. अजून जरा वेळ पडावं, असं तिला वाटत होतं. पण, अचानक इंद्रायणी मॅॕडमचा निरोप आठवला आणि ती उठलीच. चहा घेऊन केरवारा केला. न्हाणीत चार करवंट्या आणि दोन लाकडं ढकलून विस्तव केला. दहाएक चपात्या आणि मुगाची उसळ केली. खायला वेळ नव्हताच. पटकन् आंघोळ करून ती निघाली. आंघोळ करून कामाला का जातेस? आल्यावर आंघोळ कर, असं मुलगी तिला ओरडायची. पण, आंघोळ केल्याशिवाय तिला काम सुधरायचं नाही. शिवाय, आपण दुसऱ्याच्या घरी स्वयंपाकाचं काम करणार, ते पारोशाने करणं बरोबर नाही. आपण पण स्वच्छ पायजे आणि काम पण स्वच्छ पायजे, असा तिचा नेम होता.

इंद्रायणी मॅडमच्या घरी गेली, तर त्या तिची वाटच बघत होत्या. ‘अग आज महिला दिन आहे ना, आम्ही मैत्रिणी फिरायला जाणार आहोत. तू जरा डबा करून दे पटकन् आम्हाला. पुरी आणि मटर पनीर. मी पीठ भिजवून ठेवलंय.’ हातपाय धुऊन ती लगेच कामाला लागली. मटार सोलले. वाफवून घेतले. कांद्या-टाॕेमॅटोची प्युरी केली. ‘मॅॕडम, गेल्या वर्षी तुम्ही भाषण ठेवलं होतं ना एका डाॕक्टरीण बाईंचं? मी पुलाव केला होता सगळ्यांसाठी!’ “होय होय. सुमन चांगलं लक्षात आहे तुझ्या. पुलाव पण छान झाला होता तेव्हा..’ “होय, तर! ते व्याख्यान ऐकल्यापासून मी शिळंपाकं खाणं अगदी सोडून दिलं बघा. काय चार घास खायचे ते चांगले. हल्ली पोट बिघडत नाही माझं..’ बघता बघता मटार पनीर रटमटायला लागला. टम्म फुगलेल्या लालसर पुऱ्यांचा ढीग लागला. “ताई, तुमच्या मैत्रिणीबी खूप चांगल्या आहेत. रस्त्यात कधीबी दिसल्या तर ओळख दाखवतात. कधी लिफ्ट देतात. तोंडभरून हसतात. मनभरून बोलतात. अजून काय हवंय जिवाला? पैसा काय, आपुन कमवून खाऊ शकतो..’ “तू पण आमची मैत्रीणच आहेस. बरं.. आता किचन कट्टा आवरून ठेव. मी डबे भरते.’ दोघीही आपापल्या कामात गढून गेल्या. दहा मिनिटांनी सुमन जायला निघाली, तेव्हा इंद्रायणीने तिच्या हातात एक पिशवी दिली. ‘हे काय मॅॕडम?’ सुमनने विचारलं. “अगं, तुला इरकल खूप आवडते ना, म्हणून इरकली साडी घेतली तुझ्यासाठी! तुझ्याच पैशाची आहे.’ “माझ्या पैशाची?’ “गेल्या सहा महिन्यांपासून पगार वाढवलाय तुझा. पण, म्हटलं रोख पैसे देण्यापेक्षा वस्तू देऊया. बघ, आवडली का तुला?’ “खूप छान आहे. मॅॕडम आज महिला दिन आहे ना? आज संध्याकाळीच घडी मोडते. नगरपालिकेत महिलांसाठी कार्यक्रम आहे. जल्लोष.. आणि पुढे काय तरी आहे.. तो बघायला मी आणि प्रिया जाणार आहोत. तेव्हाच नेसेन ही साडी.’ ‘बरं, बरं बाय.. नेस हो!’ ‘मॅडम...’ ‘काय?’ ‘आजचा दिवस सोन्याचा केला तुम्ही!’ { संपर्क : ९४२२४१४८००

बातम्या आणखी आहेत...