आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:चांगली संगत आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते

ज्ञानवत्सल स्वामी, प्रेरक वक्ते आणि विचारवंत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले जग रंगीबेरंगी आहे. आपल्या सभोवतालच्या जगातून रंग नाहीसे झाले तर जीवन किती नीरस आणि रंगहीन वाटेल! रंगच जगाला सुंदर बनवतात. निसर्गात जसे रंग आहेत, त्याचप्रमाणे भगवंताने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट रंगांनी भरलेली आहे. मानवही त्यापासून वंचित राहत नाही.

व्यक्तीही रंगीबेरंगी असतात, इथे बाह्य शरीराचा व त्वचेच्या रंगाचा नव्हे, तर माणसाच्या स्वभावाने ओळखल्या जाणाऱ्या आंतरिक मनाच्या रंग-वैभवाचा मुद्दा आहे. चित्रात रंग भरले की, त्याची मूळ कलाकृती चमकदार आकार घेते. माणसाचेही आयुष्य जसजसे रंगांनी भरून जाते, तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्वही खुलत जाते. साहजिकच प्रश्न पडतो की, हे रंग कोण भरते? प्रश्न अतिशय मार्मिक व विचार करण्यासारखा आहे.

याचे उत्तर आहे संगत. आणि याचा जिवंत प्रमाण म्हणजे डॉ. बेन कार्सन. आपल्या ‘गिफ्टेड हँड्स’ या पुस्तकात आपला जीवनप्रवास सांगताना न्यूरो सर्जरीच्या क्षेत्रात ध्रुवतारा म्हणून ओळखले जाणारे डॉ. बेन लिहितात, “लहानपणी माझा स्वभाव खूप आक्रमक होता. तो किशोरवयात हिंसक झाला होता. लोकांवर विटा, दगड आणि बेसबॉलने हल्लाही करायचो. एकदा कपड्यांवरून आईशी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून आईवर हातोड्याने हल्ला केला होता. क्षुल्लक कारणावरून मित्रावर वार केले होते. परिणामी मला शाळेतून हाकलून दिले जाणे स्वाभाविक होते.’

कार्सन यांना वडील नव्हते. त्यांची आई दोन-तीन नोकऱ्या करून घर सांभाळायची. तथापि, त्यांनी मुलाची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्याच्या आयुष्यात असे रंग भरले की जो मुलगा पौगंडावस्थेपर्यंत लोकांवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नव्हता, तो १००% बदलला. सयामी जुळ्या मुलांना यशस्वीपणे वेगळे करणारे कार्सन पहिला न्यूरोसर्जन ठरले. १९८४ मध्ये ते अमेरिकेतील प्रसिद्ध जॉन हॉपकिन्स चिल्ड्रन सेंटरमध्ये बालरोग न्यूरोसर्जरीचे सर्वात तरुण संचालक झाले, तेही वयाच्या ३३ व्या वर्षी. मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होईल की, कार्सनच्या आईने असे काय केले की तिचा मुलगा पूर्णपणे बदलला? शाळेतून काढून टाकल्यानंतर कार्सनला त्यांच्या आईने सांगितले, “बेटा, तुला एक काम करावे लागेल. आठवड्यातून दोन पुस्तके वाचून त्याचा अहवाल मला द्यायचा.’ फक्त या एका सद्गुणी सवयीने कार्सनचे जीवन बदलले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कार्सनची आई निरक्षर होती. पुस्तकांच्या सहवासात कार्सनचे विचार-वर्तन आणि संपूर्ण आचरण बदलले - हाच आहे रंगांचा संग. नकारात्मक संगतीचा प्रभावही इतकाच सखोल आणि घातक ठरू शकतो.२४ मार्च १९८९ रोजी ब्रिटिश वृत्तपत्र डेली एक्सप्रेसने एक धक्कादायक घटना नोंदवली - ब्रायन ब्रिटन नावाचा १६ वर्षांचा मुलगा एका चित्रपटाने इतका प्रभावित झाला की त्याने आपली खोली तशीच बनवली. त्याने बेडवर बंदूक, दारूगोळा आणि स्मोक ग्रेनेड ठेवले होते. त्याची या चित्रपटाची आवड अशी होती की, एकेदिवशी सकाळी आई-वडिलांशी भांडण झाल्यावर त्याने आई-वडील व भाऊ तिघांवरही गोळ्या झाडल्या. हा घातक संगतीचा परिणाम.ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराजांचे गुरू योगीजी महाराज आपले जीवन पाण्यासारखे नसून अग्नीसारखे असावे याचे सुंदर उदाहरण देत असत. ते म्हणायचे की, पाण्यात कोणताही रंग घातला तरी ते शोषून घेते, पण आगीला काहीही दिले तर ती त्याला आपला रंग देते. सैद्धांतिकदृष्ट्या आपले जीवन अग्नीसारखे असले पाहिजे, जेणेकरून अभद्र रंग आपले जीवन कलंकित करू शकणार नाहीत. त्याचबरोबर तुमच्या अंतरंगातील चारित्र्य, नैतिकता, पवित्रतेचा रंग अशा प्रकारे प्रगल्भ करा की, जे आपल्या सहवासात येतात त्यांचे जीवनही ऊर्ध्वगामी व्हावे. जीवनाची रांगोळी अशा प्रकारे भरावी की तिच्या सौंदर्याने आयुष्याला अधिक सार्थक करावे. ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज आणि प्रगट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी लाखो लोकांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला. व्यसनमुक्ती, कौटुंबिक ऐक्य आणि सदाचाराचे प्रवासी करून लाखो लोकांचे जीवन त्यांनी पावित्र्याने सावरले आहे.

----------------