आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट लाखमोलाची:आजोबा अन् त्यांची नात

सई लळीत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म ध्यरात्रीची वेळ. सगळीकडे नीरव चांदणं पडलं होतं. जांभूळबाबाचा जरा डोळा लागला होता. एवढ्यात पलीकडे असलेल्या चिंचेची पानं जोरात सळसळली आणि आई गं... अशी अस्फुट किंकाळी ऐकू आली. ‘काय झालं ग पोरी? काही वाईट स्वप्न पडलं का?’ जांभूळबाबाने मायेने विचारलं. चिंच काहीच बोलली नाही. फक्त हुंदके गदगदत राहिले. ती काहीच बोलली नाही, तरी जांभूळबाबाला माहीत होतं, पोर घाबरलीय. धसका घेतलाय या जगाचा तिनं. गेले आठ दिवस रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची जोरदार कत्तल सुरु झालीय. दिवसभर झाडं तोडण्याचे खटाखट आवाज सुरू असतात. किंकाळ्यांनी आसमंत हादरून जातो. आपण दोघं रस्त्यापासून जरा आत असल्यामुळं वाचलोय; पण मेलो असतो तर बरं झालं असतं, असं वाटतंय. हे सगळं बघावं तरी लागलं नसतं. काल शिरीष गेल्यापासून सगळंच ओसाड दिसायला लागलंय. चार माणसं मिठी मारायला लागतील, एवढा मोठा घेरा होता त्याचा. डोक्यावर फांद्यांचा, पानांचा, फुलांचा केवढा मोठा पिसारा. दहा बैलगाड्या आराम करतील एवढी दाट थंड सावली होती त्याची. जरा जरी हसला तरी वारा वाहायचा आणि परिसर थंडगार होऊन जायचा. काहीतरी जोक मारून भरदुपारी, नाहीतर मध्यरात्री गडगडाटी हसायची सवय होती त्याला. सगळेच वैतागायचे मग झोपमोड झाली म्हणून! पण, त्याच्यामुळे किती जाग होती या रस्त्याला..! आता उजाड भकास दिसतंय सगळं... काल त्याला तोडायला चार तास लागले. सगळीकडे हिरवा पिसारा आणि गुलाबी फुलं मातीत लोळत होती. परवापर्यंत त्याच्या सावलीत बसून आराम करणारी लोकं काल त्याची बारीक बारीक लाकडं पळवण्यासाठी धावपळ करत होती. त्या सगळ्यांशी प्रेमाने बोलणाऱ्या मावशी स्वतः कोयता हातात घेऊन जळणासाठी लाकडं जमा करीत होत्या. कसं काय त्या असं क्रूरपणे वागू शकतात? कुणी साधा रुमाल पण नाही लावला डोळ्याला..! कसली बेइमान दुनिया आहे ही! चारपदरी रस्ता होण्यासाठी चाललंय सगळं! वाहनं वाढलीत म्हणं.. ट्रॕॅफिक जाम होतंय. वेळ लागतो म्हणे पोचायला. अरे, लागू दे वेळ. त्यासाठी आमचा जीव का घेताय तुम्ही? असं सुसाट धावून कुठे पोचायचंय तुम्हाला? जा जरा रमतगमत कुटुंबाबरोबर, मित्रमंडळींबरोबर जरा बसा आमच्याजवळ.चार गोष्टी बोला सुखदुःखाच्या! परवा वड आणि पिंपळ एकाच दिवशी गेले. ते गेल्यावर काही जण म्हणाले, क्रेनने दुसरीकडे हलवून जगवायला हवं होतं त्यांना! पण, ते सगळं एकच दिवस. परत फिरून काल जोरदार कापाकापी झाली. माणसांच्या मनात एकपण हिरवा ठिपका नसतो का आमच्यासाठी? अरे, आम्ही सगळे नाहीसे झालो तर कसे जगाल तुम्ही? आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, हे लक्षात असू दे! चिंच पोर.. रडली रडली आणि दमून झोपली बापडी. उद्या बरंच सहन करायचंय पोरीला. उद्या पळस आणि सावर जाणार आहेत. नाही बघवणार त्यांना तोडताना..! किती लहान लहान मुलं इथे येऊन पळसाची आणि सावरीची लालचुटुक फुलं जमा करत बसायची. त्या सावरीच्या फुलांच्या आतल्या मऊ मऊ टोप्या जमा करीत तासन‌् तास खेळायची. मुलांनी काय यापुढे फक्त मोबाइल बघत मोठं व्हायचं का? देवा, फक्त एक विनंती आहे तुला, हे बघताना माझा धक्क्याने जीव जाऊ देऊ नको. चिंचेसाठी.. या पोरीसाठी मला घट्ट राहिले पाहिजे. नाही तर कोण धीर देणार तिला या आजोबाशिवाय? { संपर्क : ९४२२४१४८००