आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Gujarat's Past Achievements Disappear In The Blaze Of Marketing |Article By Rajdeep Sardesai

दृष्टिकोन:गुजरातची भूतकाळातील कामगिरी मार्केटिंगच्या झगमगाटात गायब

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हा गुजरात आम्ही घडवला आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीची घोषणा केल्यानंतर एका सभेत काढले. गुजरातच्या विकासाचे श्रेय त्यांनाच जाते, असा त्यांचा सूर होता. गेल्या दोन दशकांत त्यांनी गुजरातचे सीईओ म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. गांधीनगरहून ७, लोककल्याण मार्गावर गेल्यावरही गुजराती लोकांसोबतचे त्यांचे अनोखे नाते कमकुवत झाले नाही. आता निवडणुकीचा ज्वर पुन्हा उफाळून आला असताना ज्याने त्यांना राजकीय गती दिली तेच गुजराती अस्मितेचे प्रतीक म्हणून पंतप्रधान स्वतःला पुन्हा प्रस्थापित करत आहेत.

ही पंचलाइन नवीन नाही. २००२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीत उतरल्यापासून ते गुजराती अस्मिता आणि स्वाभिमानाबद्दल बोलत आहेत. त्याच वर्षीची गुजरात गौरव यात्रा आठवा, तेव्हा त्यांनी दंगलीत गुजरात सरकारवर केलेल्या कोणत्याही टीकेला ‘गुजरातच्या लोकां’वर केलेल्या टीकेशी जोडले होते. २००७ मध्ये भाजपचा नारा ‘जीतेगा गुजरात’ होता. याद्वारे मोदी केंद्र पातळीवर यूपीए सरकारकडून गुजरातबाबत केल्या जात असलेल्या भेदभावाचा उल्लेख करत होते. आता २०१७ च्या म्हणजे मागील निवडणुकांकडे येऊ. तेव्हा काँग्रेसने गुजरात मॉडेलला आव्हान देत ‘विकास वेडा झाला’ असा नारा दिला. तेव्हा मोदी मुख्यमंत्री नव्हते, तरीही त्यांनी स्वतःला ‘मी गुजरात, मी विकास’ या घोषणेशी जोडले.

मोदी हे गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आणि एका रात्रीत केंद्रात पोहोचणारे राज्यातील पहिले नेते होते. त्यामुळे गुजरातच्या पहिल्या क्रमांकाच्या नेत्याच्या त्यांच्या प्रतिमेला आव्हान देता येणार नाही. आठ वर्षे पंतप्रधान असूनही आणि वाराणसीचे खासदार असूनही मोदींनी आपल्या गृहराज्याशी असलेल्या विशेष संबंधांवर भर देण्याची संधी कधीही सोडली नाही, मग परदेशी नेत्याला अहमदाबादमध्ये आणणे असो किंवा संपूर्ण गुजरातमधील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन असो, त्यांची पंतप्रधानाची प्रतिमा आणि गुजरातच्या मातीच्या सुपुत्राची प्रतिमा नेहमीच सोबत राहिली आहे.

परंतु, आधुनिक गुजरात केवळ पंतप्रधान मोदींनीच पुढे नेला का? खरे तर १९९० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी गुजरातच्या औद्योगिक विकासाला गती दिली. चिमणभाईंच्या आधी माधवसिंह सोळंकी यांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांवर लक्ष केंद्रित केले. बळवंत राय यांनी मुख्यमंत्री असताना पंचायत व्यवस्था वाढवली, तर हितेंद्र देसाई यांनी सहकार क्षेत्र वाढवण्यात हातभार लावला. भाजपचे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनीही त्यांच्या अल्पशा कार्यकाळात बंदरांच्या खासगीकरणाला गती दिली. किंबहुना, मोदींच्या नेतृत्वाच्या वर्षांचा भक्कम पाया दूरदर्शी नेत्यांनी-कार्यक्षम नोकरशहांनी तयार केला होता. यशस्वी सुधारणा, रुंद रस्त्यांचे जाळे, मोठ्या सिंचन योजना, यासह मोदी युगाच्या अनेक कामगिरी होत्या.

परंतु, गुजरात मॉडेलला एक काळी बाजूही आहे. आंतर-प्रादेशिक असमानता, बहुतांश संपत्ती आणि संधी शहरांत केंद्रित आहेत, नगरपालिकांमधील प्रशासकीय अकार्यक्षमता, असमान सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि कमकुवत शिक्षण व्यवस्था त्रासदायक आहे. (उदा. २०१८-१९ उच्च शिक्षणावरील सर्वेक्षण दाखवते की, ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुजरात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरानुसार २६ व्या क्रमांकावर आहे). कुपोषण हादेखील चिंतेचा विषय आहे. एनएफएसएच सर्वेक्षणानुसार (२०१९-२०), २००५-०६ मधील ७% च्या तुलनेत ५ वर्षांखालील सुमारे ११% मुलांचे वजन कमी होते. या वर्षाच्या सुरुवातीला १७ लाख लोकांनी तलाठी (ग्राम प्रशासक) नोकऱ्यांसाठी ३,४०० पदांसाठी अर्ज केले, तेव्हा ग्रामीण तरुण बेरोजगारीचे वास्तव समोर आले. याहून त्रासदायक बाब म्हणजे सामाजिक समरसतेच्या गांधीवादी मूल्यांवर विश्वास ठेवणारा ‘जुना’ गुजरात आता ‘नव्या’ गुजरातच्या फुटीरतावादी अजेंड्यात अडकला आहे.

ता.क. : २०१७ च्या निवडणुकीदरम्यान आम्ही भरुचजवळील आदिवासीबहुल गावात राहिलो. तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल बहुतांश गावकऱ्यांनी फारसे ऐकले नव्हते. अजूनही मोदीच राज्य चालवत आहेत, असे त्यांना वाटत होते. बहुतांश पोस्टर्समधून रुपाणी गायब होते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने तर आम्हाला स्पष्टपणे सांगितले की, “मोदी म्हणजे गुजरात आणि गुजरात म्हणजे मोदी.” यात १९७० च्या काँग्रेसच्या “इंदिरा भारत आहे!” या घोषणेची झलक दिसते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...