आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:​​​​​​​सईद मिर्झा हाज़िर हो !

गुरुदत्त सोनसुरकर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सईद मिर्जा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सिनेमा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा परिचय करून देणारा लेख.

"इथं माझ्या पिढीची बरीच माणसं बसलीयेत. व्हिएतनाम युद्ध आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. त्याच काळात जगभरात दंडेलशाही विरुद्ध आवाज उठवण्याचा सूर लागत होता. भारतात कुठे नक्षलवादी चळवळ जोर धरतेय तर कुठे दलित पँथर. खूप महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं आणि जर समोर बसलेल्या माझ्या वयाच्या माणसांना हे माहीत नसेल तर "आय वूड लाईक टू नो, व्हॉट एक्झॅक्टली दे वेयर डूइंग.'... सत्तरीच्या वरचा तरुण जो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होत असलेल्या चर्चासत्रात, त्या दिखाऊ झगमगाटातही स्वतःच्या बुद्धिमत्तेने झळाळून गेला होता तो होता सईद अख्तर मिर्झा. फिल्ममेकर, लेखक, समाजवादी, समाजसेवक आणि एक समाज संशोधक.

सईद मिर्झासारखी माणसं त्यांना भिडणारे प्रश्न, त्यांना सापडलेली उत्तरं, त्यांना भेडसावत असलेल्या चिंता या सतत व्यक्त करत असतात. एक माणूस आणि या समाजाचा भाग म्हणून आवाज उठवत असतात मग माध्यम कुठलंही असो. "नया दौर' आणि "वक्त'सारखे सिनेमे लिहिणाऱ्या अख्तर मिर्झाची अझीज आणि सईद ही दोन मुलं... जन्म मुंबईत! जाहिरातक्षेत्रात थोडं फार काम करून सईद पुण्यात एफटीआयआयला गेला. तिथून प्रशिक्षित होऊन काही काळ तिथे शिकवूही लागला आणि मग काही डॉक्युमेंट्रीज करून मुख्यधारेतल्या सिनेमात आला. खरंतर ही माहिती सईद साहेबांच्या अनेक मुलाखतीत आणि विकिपीडियावर मिळेल त्यामुळे मला वाटतं त्यात वेळ न घालवता "सईद मिर्झा को गुस्सा क्यूँ आता हैं' या वर थोडं बोलायला हवं. वर लिहिल्याप्रमाणे जरी "मुख्यधारेतल्या चित्रपटात' असा शब्द असला तरी १९७८ मध्ये, म्हणजे ऐन अँग्री यंग मॅनच्या काळात "अरविंद देसाई की अजीब दास्ताँ' सारखे सिनेमे "आर्ट फिल्म' म्हणवले जात. या "अरविंद देसाई' चित्रपटात, एका सीनमध्ये दिलीप धवन आपल्या गाडीतून जात असताना थिएटरला लागलेली "अमर अकबर अँथनी' आणि "मुक़द्दर का सिकंदर' ची भव्य पोस्टर्स दिसतात. त्या काळात असा "स्लो' आणि "आर्ट' सिनेमा बनवणं म्हणजे धाडसच. पण तसंही तेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत "समांतर' सिनेमा चळवळ उभी रहात होती. त्यात "अरविंद देसाई'ला बेस्ट फिल्मफेअर क्रिटिक अवॉर्ड मिळालं. इतकंच नाही तर सईद मिर्झा म्हणतात पैसे रिकव्हर झाले आणि एनएफडीसीकडून पुढला चित्रपट बनवण्यासाठी अजून पैसे मिळू शकले.

सईद साहेबांचे दोन सिनेमे "अरविंद देसाई की अजीब दास्ताँ' आणि "मोहन जोशी हाज़िर हो' सोडले तर इतर चित्रपटात मुख्यत्वे, (भारतातील) धार्मिक विसंवाद किंवा समाजातल्या धर्म या कारणाने विभागल्या गेलेल्या स्तरातल्या समूहांचा, त्या मानसिकतेचा शोध, कुतूहल आणि intersection, त्यात डोकावून पाहणं आढळतं. मग तो "अल्बर्ट पिंटो' असो की "सलीम लंगडा" की "नसीम'. सईदसाहेब ज्यांना इथे 'डावा (लेफ्टीस्ट) सुफी' म्हटलं जातं, त्यांनी १९८९ चा "सलीम लंगडे पे मत रो' करण्याआधी, मला वाटतं, एखाद्या समाजवाद्याचं उदात्त आणि आदर्श स्वप्न असावं अशी एक मालिका आपले बंधू अझीज मिर्झा यांच्याबरोबर केली आणि आजही ती मालिका भारतातल्या सर्वोत्तम कन्टेन्टमध्ये गणली जाते ती म्हणजे १९८७ सालची "नुक्कड'. बडे शहर की एक गली में बसा हुआ हैं नुक्कड, नुक्कड के सारे बाशिंदे तकदीरोंसे फक्कड़. अशा फक्कड़ सामान्य माणसांच्या कथा, मुंबईसारख्या बहुरंगी, मिश्र वस्तीच्या एका नाक्यावर घडणाऱ्या गमतीजमती इतक्या खुबीने मांडल्या गेल्या होत्या या मालिकेत की आजही त्यातील पात्रं लोकांच्या हृदयात आहेत. सामान्य माणसांच्या या सामान्य असण्यावर एखाद्या अस्सल समाजवाद्यासारखं प्रेम व्यक्त करताना सईदसाहेब म्हणतात "सामान्य माणूस सिनेमातून दिसायला हवा. मात्र तो वर्तमानपत्रातून फक्त अपघातग्रस्त बातम्यातून दिसत राहतो." (पण समकालीन मनमोहन देसाई, प्रकाश मेहराप्रमाणे सामान्य माणसांचं "रंजन' करणारे सिनेमे त्यांनी कधी बनवले नाहीत एक नुक्कड मालिकेचा अपवाद वगळता.)

मला सईद मिर्झा या माणसाचा चित्रपट प्रवास हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक, सामाजिक समजुती, आकलन, अनुभव आणि संवेदना यांची प्रामाणिक मांडणी वाटतो. त्यांचा पहिला सिनेमा 'अरविंद देसाई की अजीब दास्ताँ' (१९७८) बघा. अरविंद देसाई हा एक गालिचे व्यापाऱ्याचा मुलगा. श्रीमंत घरातला. सुरुवातीलाच एका गावात हे गालिचे बनवणारे, विणणारे स्त्री, पुरुष अगदी लहान मुलं राबताना दिसतात. आणि मग एका सुंदर गालीच्याचा स्लो झूम येतो. त्यावर किंमत लावलेली दिसतेय आणि मग एक नाजूक हात त्यावर फिरतो. मला वाटतं इतक्या कमी शॉट्स मध्ये सईद मिर्झा जे सांगून जातात ते - निर्मिती ते बाजारपेठ या प्रोसेसमध्ये श्रमिकांसारख्या दुर्बळ घटकांचं, एखादी प्रथा असल्याप्रमाणे होणारं शोषण आणि यापासून बेखबर असणारा, आपल्याच दुनियेत मश्गुल असा चंगळवादी उपभोक्ता वर्ग, या सगळ्यांवर एक सुप्त अंकुश ठेवून असलेला व्यापारीवर्ग असं कित्येक शब्दांत समर्थपणे मांडता येणार नाही असं आहे. कामगारांची होणारी गळचेपी, असंवेदनशील भांडवलशाही वर्गातून आलेला नायक, सामान्य निम्न मध्यमवर्गीय स्तरातील त्याचा मित्र, त्याची स्टेनो आणि अरविंदचा स्वतःला शोधण्याचा प्रवास. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, "अरविंद देसाई की अजीब दास्ताँ' हा भारतीय सिनेमात एक उत्तम आणि वेगळा प्रयोग म्हणून ओळखला जावा. "श्रीमंत वर्गातला तरुण काय विचार करतो, याचं मला कुतूहल होतं" असं म्हणणाऱ्या सईदसाहेबांच्या या चित्रपटाची शेवटची दृश्य चौकट - ज्यात त्या उंची गालिच्यांच्या दिवाणखान्यात उभा असलेला सुटबुटातला देखणा दिलीप धवन ज्याने आपल्या कानशीलावर पिस्तुल ठेवलीय, बघणाऱ्याच्या मनात रुतून बसणारी फ्रेम आहे.

त्यानंतर सईद मिर्झांचा "अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता हैं' (१९८०) हा चित्रपट भारतातील किंवा मुंबईतील ख्रिश्चन समाजातील अल्बर्ट पिंटो या तरुणाला मध्यवर्ती ठेवून अन्यथा या वरकरणी शांत समूहातली अंतर्गत विचारधारणा, भारतीय किंवा या समाजाचा एक भाग म्हणून वावरतानाची अडचण, हेटाळणी असे मुद्दे व त्याचबरोबर कॅथलिक लोकांमधील एका गटाचा पाश्चात्य देशांकडे असलेला ओढा, बांधिलकी संयतपणे मांडतो. नसिरुद्दीन शाहने उभा केलेला सतत धुमसणारा, श्रीमंत लोकांच्या गाड्या चालवायला मिळाल्याने स्वतःला उच्च आणि वेगळा समजणारा मेकॅनिक अल्बर्ट सुंदर उभा केलाय. इकडे त्याच्या वाया गेलेल्या संगीतकार भावाच्या डॉमनिकच्या भूमिकेत दिलीप धवन खुलला आहे. स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्याही छान भूमिका आहेत. सईद मिर्झा यांच्या अल्बर्ट पिंटोला सुद्धा फिल्मफेअर क्रिटिक अवॉर्ड मिळालं. यात एक दिग्दर्शक म्हणून ते आपली समाजवादी भूमिका टोकदार करताना दिसतात. एका विशिष्ट समूहावर भाष्य करताना दिसतात किंवा त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा उहापोह करताना दिसतात.

त्यानंतर आलेला १९८४ चा "मोहन जोशी हाज़िर हो' मात्र सईद साहेबांच्या गंभीर आणि संथ प्रकारच्या कथनशैलीपेक्षा थोडा वेगळा, थोडा उपहासात्मक, अर्कचित्र मांडून थोडी हलकी ट्रीटमेंट घेताना दिसतो. यात एखादा धार्मिक समूह न दिसता मुंबईच्या एका जुनाट, पडीक चाळीतले रहिवासी हाच एक मजेशीर आणि विविध वृत्तींनी भरलेला समुदाय म्हणून समोर येतो. अमजद खान या बॉलिवूडमधल्या मोठ्या नटाने फुकट काम केलं असं प्रेमादराने सईदसाहेब सांगतात. यातली नसिरुद्दीन शाह यांची वकिलाची अफलातून व्यक्तिरेखा लक्षात राहण्यासारखी आहे. मोहन जोशी आणि तो राहत असलेली चाळ हे पिचलेल्या, दुबळ्या, हतबल मुंबईच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांचं प्रतीक आहे. जे मुर्दाड लाचखोर यंत्रणा आणि धनदांडगे बिल्डर्स यांच्या टाचेखाली भरडला जात होते (आजही चित्र वेगळं नाही म्हणा).

तद्नंतर १९८६ मधल्या नुक्कड मालिकेबद्दल आपण बोललोच आहोत. कुठेही प्रचारकी न होता, सर्वधर्म समभाव आणि बंधुता (fraternity) अप्रतिम चितारणारी ही मालिका म्हणजे सईद मिर्झा या दिग्दर्शकाचा तत्कालीन मुंबईतलं धूसर होत जाणारं चित्र पकडून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न होता. (मात्र दुर्दैवाने ते चित्र फार काळ टिकलं नाही.) नुक्कड ही मालिका अझीज मिर्झा आणि सईद मिर्झा यांचा मिलाजूला प्रयत्न होता हे ही नोंदवायला हवं.

ऐंशीचा काळ हा भारतात, आणि मुंबईत हिंदुत्ववादी सूर जोर धरत होता. आधी हिंदूबहुल असल्याने मुळं होतीच फक्त ती जोखून घट्ट करायचं होतं. त्यात मुस्लिम डॉन कंपनी आणि मग त्यांच्या बेगुमान वर्चस्वाच्या कहाण्या आणि दहशत. हे खतपाणी हिंदुत्ववादी शक्तींना उलट बळच देत होतं. शिवसेनेसारखा जहाल प्रांतीय पक्ष आता हिंदुत्वाची आरोळी देत होता. दुफळी तयार होत होती. समाज दुभंगला जात होता. आज जसं सोशल मीडियावर तिरस्कार, वंश आणि वर्णवादाचे उघड फुत्कार टाकले जातात तसेच उन्मादी रणघोष गल्ल्या मोहल्ल्यात दिले जात होते. भिवंडीला होणाऱ्या दंगली, भेंडीबाजारमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर फुटणारे फटाके, सईद साहेबांच्या नुक्कडच्या स्वप्नाळूपणाला हादरे देत होते.

१९८९ चा सलीम लंगडे पे मत रो' याच मुंबईच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि शिक्षणाची वानवा असलेल्या मुस्लिम तरुणांची कथा बेझिजक मांडतो. मुसलमान पोरांमध्ये असलेला हिंदू समाजाबद्दलचा राग, द्वेष त्याच बरोबर त्यांचं गुन्हेगारीकडे वळणं आणि त्यातच संपणं भेदकपणे मांडतो. "समाजात हिंसा आहे, तिरस्कार आहे. आपण ते मान्य केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ते केलं तरच आपण त्याच्यावर तोडगा काढू शकू." सईद मिर्झा एके ठिकाणी म्हणतात. सलीम लंगडे पे ज्या वर्षी आला त्याच्या एक वर्ष आधी अनिल कपूर "हां हां मैं तेजाब हूं" म्हणत थेटर्सला हलवून गल्लाबारीवर पैशांचा पाऊस पाडून गेला होता. सलीम मात्र सईद साहेबांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच समांतर सिनेमा म्हणून मर्यादित कौतुकाच्या परिघात राहिला. "तुम्ही समाजातला असंतोष मांडत असतानाच अमिताभ बच्चन हा नट अँग्री यंग मॅन म्हणून उभा रहात होता मग तुम्ही अमिताभला घेऊन एखादी कथा का नाही मांडलीत?" यावर उत्तर देताना सईद मिर्झा म्हणतात, "अमिताभ एका व्यापक आणि एका सर्वसमावेशक अशा समाजाचा राग व्यक्त करत होता, मात्र हाच राग एखाद्या विशिष्ट समूहाचा होतो किंवा एखाद्या विशिष्ट मुद्द्याचा होतो तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसादही सीमित होतो." कदाचित सलीम आणि मुन्ना देशमुख मध्ये हा फरक असावा.

सईद मिर्झा किंवा मुंबईतली समाजवादी चळवळ संपल्यात जमा होती. सईद साहेबांना अभिप्रेत असलेला नुक्कडवाला समाज आता फक्त एपिसोड्स मध्ये बद्ध होता. "मला कामगार नेते कृष्णा देसाईवर सिनेमा बनवायचा होता." म्हणणारे सईद मिर्झा कुठेतरी आपला आधारही चाचपून पहात असावे. १९९२-९३ ला घडलेल्या बाबरी मशीद आणि दंगली, मग बॉम्बस्फोट या घटना भारताचा राजकीय, सामाजिक पट बदलून टाकणाऱ्या ठरल्या. राजकीय महत्त्वाकांक्षेपायी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न सफल झाला होता. १९९५ चा सईद साहेबांचा 'नसीम' ही वेदना, हे दुःख एका शाळकरी, अल्लड मुलीच्या आणि तिच्या अंथरुणाला खिळलेल्या आजोबांच्या कथेतून मांडतो. 'नसीम'ने सईद मिर्झा साहेबांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला पण सईद साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जे काही सांगायचं होतं ते सारं संपलं होतं. फिल्म्समधून सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही उरलं नव्हतं. एका आदर्श समाजाचं स्वप्नं रंगावणाऱ्या सहृदय माणसाला जिव्हारी लागलेला घाव होता तो.

त्या नंतर सईद मिर्झा यांनी 'अम्मी : लेटर टू अ डेमोक्रॅटिक मदर' या पुस्तकातून आपल्या आठवणी लिहिल्या. एक लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला. या पुस्तकात त्यांनी 'नसीम' नंतर भारतभर आपल्या केलेल्या प्रवासातले अनुभवही मांडले आहेत. "जेव्हा तुम्ही सामान्य माणसांना भेटता तेव्हा माणुसकीवरचा तुमचा विश्वास परततो, गाढ होतो." असं निरीक्षण त्यांनी मांडलं आहे.

सईद अख्तर मिर्झा आंतरराष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन क्लबचे आजीवन सदस्य आहेत. हा माणूस निव्वळ बोलका बुद्धिवंत नसून, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे. 'अनहद'सारख्या समाजसेवी संस्थांशी निगडित आहे. समाजवाद आणि राष्ट्रवाद या विचारधारांमधील संघर्षामुळे त्यांच्या काही वैचारिक भूमिका ह्या हल्ली वादग्रस्त ठरल्या आहेत. पण आपल्या भूमिका स्पष्ट करायला ते नेहमी तयार असतात, चर्चेला तयार असतात, शिकायला तयार असतात ही फार महत्वाची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती एखाद्या जहाल धार्मिक भूमिका असणाऱ्या राजकीय पक्षात प्रवेश का करते यावर फिल्म बनवायचीय पण ते समजून घेतल्यानंतरच, ते चूक किंवा बरोबर ही माझी भूमिका नाहीच, असं म्हणणारा हा फिल्म मेकर निखळ माणूस आहे. या वयात नव्या चित्रपटाकडे वळायला मात्र तेवढी शारीरिक ऊर्जा नसल्याचं सईद साहेब म्हणल्याचं वाचलं. सईद साहेब, फार नाही पण आमच्यासारख्या तुमच्या चाहत्यांकडून, सिनेरसिकांकडून, तुम्हाला चांगल्या स्वास्थ्याकरता आणि तुमच्या आगामी 'एक ठो चान्स' या चित्रपटाकरता तुम्हाला भरपूर ऊर्जा लाभावी अशी मनःपूर्वक सदिच्छा. या प्रेमळ घोषणेसह... सईद मिर्झा हाज़िर हो!

gurudutt26@gmail.com

बातम्या आणखी आहेत...