आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींच्या गावा:हॅशटॅग नाॅस्टॅल्जिया

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळ-दुपार-संध्याकाळ या शब्दांच्या व्याख्येमधे न बसणाऱ्या अधल्यामधल्या वेळेतला माझा आवडता कार्यक्रम म्हणजे बाल्कनीत नवीन झाडांसाठी कुठे जागा करता येईल का ते पाहणं. त्यातच माझ्या बाल्कनीत मनसोक्त पसरलेला मनीप्लँट बघून लहानपणी हवं असलेलं पैशाचं झाड हल्ली अधूनमधून डोकावत असतं माझ्या आठवणींच्या फीडमध्ये! अगदी जाणीवपूर्वक हौसेनं नाॅस्टॅल्जिकचा हॅशटॅग चिकटवून भूतकाळात शिरणं कितीही टाळलं तरीही...या आठवणींच्या लपंडावाला नाॅस्टॅल्जिया म्हणतात, हे कळायच्या बऱ्याच आधीपासून माझ्या बाल्कनीत डोकावणारा हा नाॅस्टॅल्जिया सालाबादाप्रमाणे सरत्या वर्षातदेखील जड झालेलं आठवणींचं पोतं ठेवून जाऊ पाहतोय...खरं तर आयुष्य पुढे सरकतं तसं बाल्कनीत खुर्च्या आणि चहाच्या वाफांसोबत हा नाॅस्टॅल्जिया अजूनच खुसखुशीत होत जातो, अपूर्ण राहिलेल्या इच्छांमध्ये खरपूस परतल्यासारखा! सोशल मीडियावर हॅशटॅगनं आठवणींना वाट मोकळी करून देण्याचा अल्टिमेट ऑप्शन माहितीच नव्हता त्या वेळेस, म्हणजे माझ्या लहानपणी परसदारी चुलीवर तापत ठेवलेल्या हंड्यातून उकळणाऱ्या पाण्यासारखी चुलीजवळची ऊबदार सकाळ हल्ली माझ्या फ्लॅटच्या उंबरठ्यावर रेंगाळत राहते. तेव्हा परसदारी चुलीच्या धुरकट सुगंधात रेंगाळणारी मी आता चक्क आवरून रांगोळीचे चार ठिपके रेखाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करते आणि ते बघून माझी लहानपणीची हरवलेली सकाळ ओशाळवाणी हसते. येणाऱ्या-जाणाऱ्यांची पावलं चुकवीत अंग चोरून बसलेली माझी इवलीशी दारातली रांगोळी लहानपणी अंगणातल्या पारिजातकाला केवढी मोठी जागा द्यायची सडा घालायला! सुस्तावलेल्या दुपारच्या उन्हात हौसेने लावलेली माझी बुटकी झाडं वाऱ्यावर डुलत असतात तेव्हा गावाकडची हरवलेली दुपार मधूनच मिश्किल हसते. मोठ्या धीराने छताला आधार देत करकर करणारा पंखा, ओसरीच्या बुटक्या भिंतीआडून सळसळणारी पिंपळ पानं आणि चकवणारे तिरकस कवडसे आता खूप महाग झालेत. आठवलेलं साठवणारं पोतं जड होऊ लागलं की, समजावं महागडं आणि सोनेरी बरंच काही जमा झालंय त्यात! अशीच आठवलेलं साठवत आणि साठवलेलं आठवत मी चाचपडत असते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ तशीही गोंधळलेलीच, आताही आणि तेव्हाही! गृहपाठ महत्त्वाचा की दूरदर्शनवरच्या बातम्या हे ठरवण्यात संपून जाणारी. लाइट गेल्यावर कंदील आणि चिमणीच्या उजेडात अभ्यास केला म्हणजे आपणसुद्धा एक प्रेरणास्रोत असल्याच्या दिमाखात मिरवायला पुरेसा वाव देणारी माझी लहानपणीची संध्याकाळ डेली सोप आणि इन्व्हर्टरच्या हातमिळवणीत हिरमुसली, पण माणूस सवयीचा गुलाम होतो तो काय उगीच? माझी लहानपणीची संध्याकाळ हल्ली हॅशटॅगचं बोट धरून घुटमळत असते डेली सोप संपण्याची वाट पाहत! दिवसभर रेंगाळत राहणाऱ्या सकाळ-दुपार-संध्याकाळच्या पाठशिवणीचा खेळ संपला म्हणजे टेकायला जाडीभरडी गोधडी आणि टेबल फॅनच्या हवेसाठी फॅनसमोरची जागा मिळवण्याची धडपड किती थंडगार होती हे आठवून रात्र अर्धवट राहिलेल्या गृहपाठाच्या वहीत झोपी जाते. आता एसीच्या हवेत त्या लहानपणीच्या निवांत बिनघोर झोपेला चाचपडत! आता वाटतं एरव्ही संसाराच्या रहाटगाडग्यात नेटानं उभं राहणाऱ्या मनाचा एक कप्पा मात्र, त्या हॅशटॅगच्या आडव्या उभ्या रेषांमध्ये सतत शोधत राहतो हरवलेल्या आठवणींच्या उभ्या आडव्या पाऊलखुणा, हॅशटॅग हरवलेतेगवसले या आशेवर...!

नेहा जोशी संपर्क : ९५६१५३७६९९

बातम्या आणखी आहेत...