आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यपथावरचा प्रजासत्ताक...:कर्तव्यपूर्तीचा मनस्वी आनंद

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लोकशाहीत आपण एक भारतीय नागरिक म्हणून हक्क आणि कर्तव्य बजावतो. ज्या क्षेत्रात आपला उदरनिर्वाह किंवा रोजगार असतो, त्या ठिकाणी, त्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे त्या- त्या संस्थेच्या हितरक्षणातून विकासात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करत असतो. लोकशाहीत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करताना अधिक जबाबदारीने सेवेच्या माध्यमातून कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करावे लागते. शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील नोकरीच्या निमित्ताने मी लातूर, नांदेड औरंगाबाद या ठिकाणी काम केलं. सर्वसामान्यांसाठी शासन जे काही करत आहे त्याची माहिती वृत्त ,लेख जाहिराती इ.द्वारे प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमातून देण्यासाठी काम करणे, हे माझ्या कामाचं स्वरूप आहे. ते करताना प्रत्येक कर्मचारी, अगदी शिपाई पदापर्यंतची सर्व टीम सांघिकतेने काम करते. यातूनच “संघभावना’ वृद्धिंगत होते. भारतीय प्रजासत्ताकाचे संघभावना हे एक महत्त्वाचे मूल्य अहे. प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते. आपले विचार, हक्क, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून याचा उपयोग केला जातो. ही प्रसारमाध्यमे समाजाचेच प्रतिनिधित्व करतात आणि त्याचा एक घटक शासन आहे ,याचा मला सार्थ अभिमान आहे. येथे महिला असणे गौण असते. तुम्हाला प्रथम भारताचे नागरिक आणि भारतीय नागरिकत्व अधिनियमाअंतर्गतच देशाच्या कर्तव्य, हक्क, अधिकारांसाठी शासनात काम करावे लागते. प्रशासन, शासन, समाज आणि प्रसारमाध्यमे यांमधील समन्वय यंत्रणा म्हणून लोकशाहीत काम करण्याचा अनुभव आनंददायी व अभिमानास्पद आहे. अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून महिलांना वेगळे कर्तव्य नाही, समानता या मूलभूत तत्त्वाच्या आधारे तेवढ्याच क्षमतेने पुरुषांच्या बरोबरीने तर कधी त्यांच्यापुढे जाऊन कर्तव्य निभावले जातात. समान हक्क, नागरिकत्वाचा हक्क मिळावा म्हणून तृतीयपंथीयांना देखील सामावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच नागरिकांचे हक्क व अधिकार मिळाले पाहिजेत आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या लोकशाही प्रक्रियेतील सर्व सुविधा; जसे आधार क्रमांक, रेशनकार्ड, घरकुल, पायाभूत सुविधा ,शिक्षण, रोजगाराच्या संधी अशा गोष्टी शासन समन्वयातून समाजातील या घटकांपर्यंत पोहोचवण्यात आपलाही खारीचा वाटा आहे, आपण आपल्या कर्तव्यातून व्यक्त होत आहोत, याचा मनस्वी आनंद आहे.

डॉ. मीरा ढास (माहिती अधिकारी )

बातम्या आणखी आहेत...