आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातलं काही:साडीत अडकलेला तिचा जिव्हाळा...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण म्हटले की धार्मिक रीती-परंपरांसोबतच नटणे, सजणे आलेच. या सणांना कपाटातून बाहेर निघतात तिच्या विविधरंगी साड्या. ज्या घालून ती मिरवते. भारतीय स्त्रीचं आणि साडीचं वेगळं नातं आहे. स्त्रीसौंदर्य-साडी आणि सोहळा हे एक अजब रसायन आहे. साडीचा प्रवास अथपासून इतिपर्यंत असतो असं मला वाटतं. हा प्रवास मुलीचा जन्म झाल्यापासूनच सुरू होतो. तो इवलासा जीव जेव्हा आईच्या किंवा आजीच्या सुती, धुवट साडीने बनवलेल्या दुपट्यामध्ये गुंडाळला जातो तो असतो साडीचा पहिला स्पर्श. वयाच्या तिसऱ्या वर्षी आजीकडून परकर पोलकी शिवली जातात आणि त्यावरची छोटीशी ओढणी घेऊन “माझी साली बघा’”माझी साली बघा’असे बोबडे बोल प्रत्येक आजी-आजोबांनी ऐकलेले असतात. माध्यमिक शाळेत शिक्षक दिनाला वर्गशिक्षिका बनताना किंवा दहावीच्या निरोप समारंभाला मुलगी साडी नेसून समोर येते तेव्हा प्रत्येक पिता हळवा झालेला असतो. आपल्या समोर बागडणारी सोनुली साडीमध्ये एकदम मोठी दिसू लागली या जाणिवेने थोडासा हलून गेलेला असतो. महाविद्यालयीन जीवनात स्नेहसंमेलनासाठी मुलगी साडी नेसून तयार झाली की नकळत आईबाबांचे डोळे पाणावतात. काही वर्षात ती आपल्यापासून दुरावणार म्हणून. भावा/बहिणीच्या लग्नात नाजूकशी ती मानाची करवली सगळ्यात हटके असणारी साडी नेसून दिमाखात वावरत असते. लग्नवधू म्हणून ती जेव्हा शालू नेसून साजशृंगार करून मंडपात येते तेव्हा संपूर्ण अतिथीवर्ग कौतुकाने पाहतो.

सासरी जाताना हिरवीगार साडी नेसलेली ती जणू हिरव्या वेलीसारखी थरथरत असते. पुढेही कित्येक प्रसंगांत साडीची उबदार सोबत हवीहवीशी वाटतेच स्त्रीला. तिच्याकडे प्रत्येक साडीची वेगळी आणि खास अशी काही आठवण असतेच असते. पहिली मंगळागौर, दिवाळसण, लग्नाचा पहिला वाढदिवस, सामोपचाराने मिटवलेले पहिलेवहिले भांडण, बारसे, जावळ, मुंज, मुलांच्या पहिल्या पगारात त्याने/तिने आणलेली साडी....एक न दोन किती आठवणी...आणि शेवटच्या क्षणीही साडीच. माहेरची साडी असते म्हणे. असे मरण याचसाठी तर मागत नसेल ना स्त्री... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्त्रीची सखीच असते साडी. कितीही आधुनिक स्त्री असली तरी साडी घेण्याचा आणि ती नेसून मिरवण्याचा मोह होतोच तिला. कारण तिच्या सौंदर्याला द्विगुणित करत असते साडी.

वैशाली पाटील संपर्क : 9420350171

बातम्या आणखी आहेत...