आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Hindu Votes Are Decisive, But Not In The Whole Country|Shekhar Gupta's Article In Marathi

थेट भाष्य:हिंदू मते निर्णायक, परंतु संपूर्ण देशामध्ये नाहीत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी-शहांच्या युगात भाजपची रणनीती निश्चित आहे. पन्नास टक्के हिंदू मते घ्या आणि जिंका. परंतु, हे सूत्र प्रत्येक ठिकाणी चालत नाही.

भाजपला हरवायचे असेल तर...
भाजपचा पराभव करायचा असेल तर एक तर त्याला मोठ्या संख्येने हिंदू मतांपासून वंचित ठेवा किंवा बालेकिल्ला राखण्याची क्षमता असलेला एक मजबूत प्रादेशिक नेता किंवा पक्ष तयार करा. तिसरा व चांगला उपाय म्हणजे इतका मजबूत प्रादेशिक, स्थानिक व भाषिक किल्ला तयार करावा की हिंदू मतदार प्रामुख्याने तामिळ, तेलगू वा मल्याळी यांच्याप्रमाणे मतदान करतील. योग्य राजकारण केले तर भाजप अजिंक्य नाही.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीच्या अश्वमेधाचा घोडा झाला आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विजयानंतर भाजप निवडणुका का आणि कशा जिंकत आहे, हे विश्लेषक सांगत आहेत. अशा परिस्थितीत तो निवडणूक कशी आणि का हरतो हे समजून घेणे आवश्यक आणि मनोरंजक असेल. होय, तोदेखील हरतो! २०१८ मध्ये तो मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या देशातील तीन प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत पराभूत झाला. त्याच वर्षी तो कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु स्पष्ट बहुमत मिळवू शकला नाही. आम्ही २०१७ आणि २०२२ चा पंजाब यात मोजत नाही, कारण तिथे भाजप मजबूत नाही. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजयानंतर पश्चिम बंगालमध्ये तो तृणमूल काँग्रेसकडून पराभूत झाला आणि झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो-राजदने त्याच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. हरियाणातील लोकसभेच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्यानंतर तिथल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे स्पष्ट बहुमत हुकले आणि त्याचा मोठा मित्रपक्ष शिवसेनेने साथ सोडल्यामुळे महाराष्ट्रात निवडणूक जिंकूनही राज्य गमावले.

मोदी-शहा युगात भाजपची किमान रणनीती निश्चित आहे. पन्नास टक्के हिंदू मते घ्या आणि निवडणूक जिंका. उत्तर प्रदेशचे उदाहरण पाहा. योगी आदित्यनाथांनी हे ८० विरुद्ध २० चे युद्ध असल्याचे म्हणण्याची चूक केली, पण ते खरेच बोलत होते. कारण उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदार १९ टक्क्यांच्या वर आहेत. त्यामुळे भाजपने मुस्लिम मते सोडून दिली तर ८० टक्के हिंदू हे त्यांचे लक्ष्य आहे. निवडणूक निकालांनुसार भाजपने मित्रपक्षांसोबत एकूण ४४ टक्के मते मिळवली, म्हणजे त्याने ५५ टक्के हिंदू मते मिळवली, हे स्पष्ट आहे. प्रचंड बहुमत मिळवण्यासाठी हे पुरेसे आहे. अर्थात, भाजपच्या बाजूने काही मुस्लिम मते असली तरी ती फारच क्षुल्लक ठरतात.

हे ८०:२० चे सूत्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बदलते, पण ते फक्त हिंदी पट्टा आणि पश्चिमेकडील तीन राज्ये म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये लागू होते. उत्तर प्रदेशमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सहकारी पक्षांसोबत ५२ टक्के मते मिळवली होती. पुन्हा एकदा मुस्लिम वगळून यातील ६७ टक्के किंवा दोनतृतीयांश मते हिंदू होती. म्हणजे प्रत्येक तीनपैकी दोन मते त्याला मिळाली. त्यामुळेच तो कागदावर खूपच शक्तिशाली भासणाऱ्या सपा-बसप आघाडीला हरवू शकला. पण, ज्या ठिकाणी हे सूत्र जुळून आले नाही, तिथे काय झाले? पश्चिम बंगालचे उदाहरण घ्या. उत्तर प्रदेश सोडले तर भाजपने बंगालमध्ये अधिक वेळ, ऊर्जा आणि संसाधने वापरली. ‘सीएए’ कायद्याबाबतच्या गदारोळामुळे ध्रुवीकरणाची परिस्थिती निर्माण केली होती. आणखी एका मोठ्या राज्यात विजय मिळवणे हे भाजपचे लक्ष्य होते, पण घडले त्याउलटच. ममता बॅनर्जींच्या तृणमूलने त्यांचा पराभव केला.

मग भाजप प. बंगालात कसा आणि का हरला? कारण तिथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४२ पैकी १८ जागा भाजपने जिंकल्या होत्या व मजबूत होत होता. २०२१ च्या विधानसभा व २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळवली होती; पण जागांचा आकडा गाठता आला नाही. मग दोन वर्षांत काय बदलले? पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस-डाव्या आघाडीने २०१९ मध्ये धुव्वा उडाल्यानंतर जवळपास उर्वरित सर्व मतदार गमावले. पण याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशच्या उलट पश्चिम बंगालने भाजपला ८० विरुद्ध २० असे समीकरण उपलब्ध करून दिले नाही. तिथे बहुतांश ७१ विरुद्ध २७ असे समीकरण होते. केवळ ५० टक्के हिंदू मते त्यांना बहुमताच्या पलीकडे नेऊ शकत नाहीत. एकूण मतांपैकी ३८.१३ टक्के मते मिळवून त्याने ५० टक्क्यांहून अधिक, परंतु हिंदू मतांच्या ५३ टक्के मते मिळवली. परंतु, ७१ विरुद्ध २७ या समीकरणात त्याला सुमारे ६५ टक्के हिंदू मतांची गरज भासली असती. ममता बॅनर्जींनी महिला मतदारांना आपल्यासोबत ठेवल्याने असे घडू शकले नाही. तेथील महिला शक्तीने हिंदू व्यूहरचना हाणून पाडली.

त्यामुळे हा पहिला धडा आहे. मोदी-शहा यांच्या भाजपला हरवायचे असेल तर तुम्हाला ५० टक्क्यांहून अधिक हिंदू मतांपासून भाजप वंचित होईल इतक्या पुरेशा प्रमाणात हिंदू मते मिळवावी लागतील. जेणेकरून ते ५० टक्क्यांचे सूत्र नाकारले जाईल. उत्तर प्रदेश, बिहार आणि आसामप्रमाणे ही गोष्ट तुम्ही करू शकला नाहीत, तर तुमचा पराभव निश्चित आहे. त्यामुळेच मुस्लिम-यादव मतदारांवरच आधारित असलेले अखिलेश आणि लालू यादव यांच्या पक्षांना आता विजय मिळवता आला नाही. जोपर्यंत हिंदूंमधील इतर शक्तिशाली जातसमूहांना ते एकत्र आणू शकणार नाहीत, तोपर्यंत त्यांना विजयाची संधी मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही भाजपशी हिंदू मतांसाठी स्पर्धा करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला संधी नाही. जातीय समीकरणाच्या आधारेही भाजपचा पराभव होऊ शकत नाही. हा अयशस्वी प्रयत्न २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस-सपा आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशात सपा-बसप, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडी (एस.) यांनी करून पाहिला आहे.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...