आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला कुस्तीगिरांसाठी यंदापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात झाली. सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने पहिली महिला ‘महाराष्ट्र केसरी’ गदा पटकावली. अर्थात, हा दिवस उजाडण्यामागे १९९६-९७ पासूनच्या महिला कुस्तीगिरांच्या अविश्रांत शारीरिक-मानसिक मेहनत, आर्थिक विवंचना, सुविधा आणि प्रशिक्षणाची वानवा अशा सगळ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीचा इतिहास आहे. अशा प्रतिकूलतेतही अंजली देवकरे, चित्रा मुरादे, संध्या पाणबुडे यासारख्या खंद्या कुस्तीपटूंनी महिला कुस्तीचा शड्डू ठोकला. राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. मुलींचा ओढा आणि पालकांचा पाठिंबा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी पुण्यात राज्यातील मुलींसाठीच्या पहिल्या निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा श्रीगणेशा केला. अर्थात, हा झाला इतिहास... कुस्तीची प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंच्या परिस्थितीत या देदीप्यमान इतिहासामुळे कितीसा फरक पडला? दुर्दैवाने आजही याचे उत्तर समाधानकारक नाही. राज्यात कुस्तीच्या आखाड्यात उतरलेल्या मुलींची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, त्यांच्यासाठी महिला प्रशिक्षक, स्वतंत्र आखाडे शेकड्यातही नाहीत. राज्यातील जवळपास १५ महिला कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली, पण गावखेड्यामधील कुस्तीपटू अजूनही संधी मिळण्यासाठी लालफीतशाही आणि निवड समितीच्या घाणेरड्या राजकारणाचा सामना करीत आहेत. कौटुंबिक पाठिंबा वाढता असला, तरी कुस्तीसारख्या खेळासाठी लागणाऱ्या पूरक पौष्टिक आहाराची तजवीज करणे, हे पालकांसाठी आजही आव्हान आहे. मुलींचं कुस्ती खेळणं समाजाने स्वीकारलं असलं, तरी पंजाब, हरियाणासारख्या राज्यातील महिला कुस्तीपटूंना मिळणाऱ्या सुविधा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकल्यानंतर मिळणाऱ्या सरकारी नोकऱ्या आणि मुख्य म्हणजे, लग्नानंतर मुलींचा आखाडा पुढे सुरू राहणं या सगळ्या निकषांवर महाराष्ट्रातील चित्र अत्यंत निराशाजनक आहे. जिद्दीचा शड्डू ठोकून परिस्थितीला चितपट करत महिला आखाड्यात उतरताहेत खऱ्या, मात्र त्यांच्यावरील अश्लील शेरेबाजीच्या विकृत मानसिकतेवर अजूनही लगाम नाहीच. आणि म्हणूनच पहिल्या महिला ‘महाराष्ट्र केसरी’च्या निमित्ताने या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उहापोह करणारे लेख आणि प्रतिकूलतेला आसमान दाखवणाऱ्या महिला कुस्तीगिरांच्या यशकथांचं हे विशेष पान. पहिली महिला महाराष्ट्र केसरी म्हणून प्रतीक्षाचं कोडकौतुक झालं. चार-दोन वृत्तपत्रांत तिची मुलाखत छापून आली. टीव्ही चॅनल तिच्याबद्दल भरभरून बोलले. पण, काही दिवसांनी हे सगळं इतिहासजमा असेल. भविष्यात अशा आणखी प्रतीक्षा महाराष्ट्राला हव्या असतील, तर केवळ इतिहासाची उजळणी करुन चालणार नाही. कारण इतिहास घडतो; भविष्य घडवावे लागेल...
संकल्पना, संकलन, संपादन : वंदना धनेश्वर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.