आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:घरकाम करणारे लोक आपले गुलाम नाहीत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील एका सुशिक्षित, माजी आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने त्यांच्या घरात काम करणाऱ्या आदिवासी महिलेशी गैरवर्तन केल्याची नुकतीच घडलेली घटना चर्चेत होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, परंतु महिलेवरील आरोप भयानक होते, त्यांची मी येथे पुनरावृत्ती करणार नाही. अशा घटना सर्रास घडत नाहीत, मात्र हे घरातील कामगारांसोबत गैरवर्तनाचे टोकाचे उदाहरण म्हणता येईल. असे असूनही आज घरकामात मदत करणाऱ्या लाखो लोकांना नगण्य अधिकार आहेत, हे नाकारता येणार नाही. सहसा त्यांचे नियोक्ते भारतातील मध्यम किंवा उच्च वर्गातील लोक असतात आणि त्यांच्याकडे सामान्यतः अशी कोणतीही आचारसंहिता नसते, ज्याच्या आधारावर ते त्यांच्या घरगुती कामगारांशी चांगले वागू शकतील. झारखंडमध्ये घडलेली ही एक गुन्हेगारी घटना होती आणि बहुतांश भारतीय तसे करत नाहीत, परंतु आता आपला देश विकसित होत असताना घरकामगारांसह प्रत्येक भारतीयाचे हक्क आणि प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे, हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. यासाठी मी काही सूचना करत आहे, तसेच घरकामगारांच्या मालकांसाठी एखादा नवा कायदा बनवल्यास त्याचा तपशील काय असावा, हेही सांगत आहे.

१. किमान वेतनश्रेणी : आता घरगुती कामगारांसाठी किमान वेतनश्रेणी निश्चित करण्याची वेळ आली आहे. वेगवेगळी शहरे आणि राज्यांमधील वेगवेगळ्या राहणीमानाच्या खर्चानुसार हे पगार बदलू शकतात, परंतु आज मालक आणि घरातील नोकर यांच्यातील संबंधात असंतुलन निर्माण झाले आहे आणि निश्चित वेतनश्रेणी नसल्यामुळे शोषणाची शक्यता खूप वाढते.

२. साप्ताहिक सुटी : जे लोक घरातील कामे करतात तेसुद्धा मानवच असतात. तुम्हाला ऑफिसने आठवड्यातून एक दिवस सुटी दिली नाही तर काय होईल, याची कल्पना करा. तुमच्या आयुष्यात कामातून ब्रेक नसेल तर तुमच्या वीकेंडला तुमच्यासाठी काहीच अर्थ उरणार नाही. पण, आज भारतातील बहुतेक घरगुती मदतनीसांची हीच परिस्थिती आहे. कृपया तुमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना आठवड्यातून एक दिवस सुटी द्या, जेणेकरून ते पुन्हा ताजेतवाने होऊन कामावर परत येतील. यामुळे तुमच्या मुलांनाही एक दिवस घरच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरगुती कामगारांना एक दिवस सुटी द्यावी, असा नियम आहे. आपल्याकडे असा कोणताही कायदा नाही, त्यामुळे त्यांना स्वेच्छेने सुटी देण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण भारतीय कर्मावर विश्वास ठेवतो आणि आपण मानवतेने वागलो तर ते आपल्यासाठीही चांगले ठरेल.

उद्धटपणे वागू नका : बरेच भारतीय त्यांच्या कामगारांना रागावत राहतात किंवा त्यांचे कधीच आभार मानत नाहीत किंवा ते जेवण वाढतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात हे पाहून खूप वाईट वाटते. ज्या लोकांना आयुष्यात काही विशेषाधिकार मिळालेले असतात त्यांना त्यांचे महत्त्व कळत नाही. तुमच्या आयुष्यात तुमची सेवा करणारे आणि तुमचे जीवन सुकर करणारे काही लोक असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. याबद्दल कृतज्ञता दाखवा आणि आपल्या मदतनीसांशी रुक्षपणे वागू नका. त्यांच्याशी बोला, त्यांना वेळोवेळी धन्यवाद द्या आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागा. तुम्ही करू शकता असा हा किमान परोपकार आहे. हे रेस्टॉरंट्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्या सर्व्हिंग स्टाफलाही लागू होते.

त्यांना नोकर म्हणू नये : प्रतीकात्मकता किंवा नामकरण इत्यादींचा मर्यादित प्रभाव असला तरी सेवक आणि नोकर असे शब्द न वापरण्याची वेळ आली आहे. त्याऐवजी त्यांना मदतनीस किंवा घरगुती कर्मचारी म्हणणे चांगले ठरेल. ते उदरनिर्वाहासाठी काम करत आहेत, परंतु ते तुमचे गुलाम नाहीत.

राहण्यासाठी उत्तम परिस्थिती : तुमचे मदतनीस तुमच्या घरात राहत असतील तर त्यांना राहण्याची आणि झोपण्यासाठी चांगली जागा आहे का, याची खात्री करा. स्वच्छ अंथरूण, उन्हाळ्यात किमान एक पंखा, हिवाळ्यात ब्लँकेट किंवा हिटर, स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले शौचालय इत्यादी असावेत. या सर्व अतिशय मूलभूत गोष्टी आहेत, परंतु त्या अनेक घरकामगारांना उपलब्ध नाहीत. काही जण म्हणतील की. हे सर्व खूप खर्चिक होईल. अशा परिस्थितीत एवढेच म्हणता येईल की, तुम्ही एखाद्याला राहण्याच्या चांगल्या सुविधा देऊ शकत नसाल तर आपल्या घरी राहणारे घरकामगार घेऊ नका. कारण मग तुम्हाला पूर्णवेळ मदतनीस ठेवण्याचा अधिकार नाही. अलीकडे आपल्या अर्थव्यवस्थेने ब्रिटनला मागे टाकले आहे. पण जीडीपी आणि दरडोई उत्पन्नाच्या आकड्यांव्यतिरिक्त एक देश म्हणून विकसित होणेदेखील महत्त्वाचे आहे आणि तेथील नागरिकांशी चांगले वागले तरच असे होईल. आपले लाखो घरगुती मदतनीस अमानवी परिस्थितीत जगत असतील तर अब्जाधीश आणि युनिकॉर्नची संख्या वाढूनही काय होईल? नुकतीच घडलेली एक घटना आपल्यासाठी वेकअप कॉल असावी. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...