आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:चुका सांगितल्या नाहीत तर चांगली कामे कशी होणार?

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ असा होता की, नोकरशहा त्यांच्या राजकीय धन्यांना निःपक्षपाती सल्ला द्यायचे आणि कोणती कृती योग्य असेल, हे त्यांना सांगायचे. त्यांचा सल्ला आवडला नसला तरी ज्येष्ठ राजकारणीही त्यांचे कौतुक करत असत. पण, आज हुजरेगिरीचे वातावरण आहे, त्यात नोकरशहा कर्तव्यापेक्षा निष्ठेचा अधिक विचार करतात. ते ‘येस मॅन’ झाले आहेत आणि वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. राजकारणी की नोकरशहा यापैकी कोणाला जास्त दोष द्यायचा हे सांगणे कठीण आहे. अधिकाऱ्यांची निष्ठा आणि धारिष्ट्यासाठी त्यांचा आदर करणारे राजकारणी आता दुर्मिळ होत चालले आहेत. त्याचबरोबर झुकण्यास सांगितले तर गुडघ्यांवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे नेते आणि अधिकारी दोघेही एकमेकांवर खुश राहतात अशी एक संस्कृती निर्माण झाली आहे. त्यामध्ये एकाला जी-हुजुरी मिळते, तर दुसऱ्यालामालदार पोस्टिंग किंवा यशस्वी कारकीर्द असे त्याचे बक्षीस मिळते.

तत्त्वांशी तडजोड करून सत्तेला समर्थन देण्याच्या प्रवृत्तीने हुजरेगिरीला एक कला बनवले आहे. यामुळेच चमचा आणि मस्का या शब्दांचा अर्थ भारतभर सर्वांना समजतो. ज्यांना सत्तेच्या जवळ राहून जास्तीत जास्त फायदा मिळवायचा आहे, त्यांना यासाठी अनेक प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच ते योग्य गोष्ट योग्य पद्धतीने, योग्य वेळी सांगण्याची प्रतिभा विकसित करतात. चमचा आणि त्याच्या धन्याची देहबोली आता एक आचारसंहिता झाली आहे. हे पदानुक्रमातील व्यक्तींच्या स्थितीनुसार निर्धारित केले जाते. हुजरेगिरीची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती गुप्तपणे केली जात नाही, तर उघडपणे व अतिरेकीपणे केली जाते. यामुळे मालकाला लाज वाटत नाही आणि हुजरेगिरी करणाऱ्यालाही संकोच वाटत नाही. ते हे आवश्यक ठरवून त्याचे समर्थन करतात, कारण स्तुती परमेश्वरालाही प्रिय आहे.

तुलसीदासांनी अगदी अचूकपणे सांगितले आहे – समरथ को नहिं दोष गुसाईं, रवि पावक सुरसरि की नाईं| म्हणजेच जो सामर्थ्यवान आहे, त्याच्यात कोणताही दोष असू शकत नाही; तो सूर्य, अग्नी, गंगा यांच्यासारखा शुद्ध असतो. एखाद्या नोकरशहाचे एखाद्या मंत्र्यासमोर किंवा खासगी क्षेत्रातील बॉससमोर वरिष्ठ अधिकारी किंवा कोणत्याही वरिष्ठ-कनिष्ठ नात्यातील लोकांसमोरचे वागणे बघा. मग ‘समरथ को नहिं दोष...’ हे किती सत्य आहे हे कळेल.

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. एका बादशहाला वांगी खाऊन कंटाळा आला होता. एकेदिवशी तो वजिराला म्हणाला, वांगी ही निरुपयोगी गोष्ट आहे. वजीर होकारार्थी मान हलवत वांगे कसे वाईट हं सांगू लागला. काही दिवसांनी राजवैद्य बादशहाला भेटले आणि त्यांनी वांग्याच्या फायदेशीर गुणधर्मांबद्दल सांगितले. हे बादशहाने वजिराला सांगितले तेव्हा त्याने वांग्याची स्तुती सुरू केली. वजिराने पूर्वी वांग्याला वाईट म्हटल्याचे बादशहाला आठवले. नाराज होऊन तो वजिराला म्हणाला की, तू असे परस्परविरोधी कसे बोलू शकतोस? वजीर म्हणाला, हुजूर, मी तुमची नोकरी करतो, वांग्याची नव्हे.

वजीर ज्या पदावर होता त्या पदाच्या दर्जाएवढे त्याच्या वैयक्तिक मताला महत्त्व नव्हते, या धारणेवर वजिराच्या वागण्यातील ही लवचिकता आधारित होती. सत्ता कुठे आहे, ती कशी प्रकट होते आणि त्यातून आपल्याला कोणते फायदे मिळतात हे एकदा आपल्याला समजले की ही वृत्तीच आपल्याला पराक्रमी लोकांसमोर नतमस्तक करवते. या अटींची पूर्तता झाली तर वैयक्तिक स्वार्थाच्या वेदीवर तत्त्वांचा बळी सहज दिला जाऊ शकतो. पण, लोकशाहीतील ‘येस मॅन’ संस्कृती चिंताजनक आहे. त्यामुळे सत्ता निरंकुश होते आणि शेवटी त्याचा फटका नागरिकांनाच सहन करावा लागतो. नैतिक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी राजकारण्यांना पुढाकार घ्यावा लागतो, परंतु ते असे करणार नाहीत.

पवन के. वर्मा लेखक, मुत्सद्दी, माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

बातम्या आणखी आहेत...