आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • How Long Will The Gulf Oil And Property Party Last? | Article By Ruchir Sharma

दूरदृष्टी:आखाती देशांची तेल व मालमत्तेची पार्टी आणखी किती काळ चालेल?

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील मंदीच्या दु:खापासून थोडा दिलासा हवा असेल तर या दु:खाचे केंद्रस्थान म्हणजेच लंडनमधून विमान पकडून कोणत्याही आखाती देशाची राजधानी गाठा. आर्थिक विकासाच्या अंदाजात वाढ दिसत असलेले हे क्षेत्र आहे. फिफा विश्वचषकाचे आयोजन करताना दोहाचा आनंद गगनात मावत नाही, तर कतारची हॉटेल्स बाकीच्यांच्या स्वागतासाठी भरलेली असल्याने त्याचे शेजारीही उत्साहाने भरलेले आहेत. दुबई पुन्हा रिअल इस्टेटमध्ये तेजीचा आनंद घेत आहे. रियाधसारखे प्रादेशिक प्रतिस्पर्धीदेखील स्पर्धेत आहेत आणि ते तेलाच्या नफ्याला मोठ्या मालमत्ता प्रकल्पांमध्ये रूपांतरित करत आहेत. आखाती देशांतील अनेक नेत्यांना असे वाटते की, तेल आणि मालमत्तेच्या चढ्या दरांमुळे वाढलेली तेजी फार काळ टिकणार नाही, परंतु ही जुनी समस्या आणखी प्रतीक्षा करू शकते. सध्या पार्टी सुरू आहे. दर ३०० मीटरवर २८ इमारतींसह दुबई हे सर्वात उंच इमारती असलेले शहर झाले आहे. यापैकी बहुतांश गेल्या १० वर्षांत बांधल्या गेल्या आहेत. चीनचे मॅनहॅटन आणि शेनझेनही याच्यासमोर फिके दिसतात. गेल्या १० वर्षांतील तिसऱ्या आणि सर्वात नेत्रदीपक रिअल इस्टेट बूममध्ये दुबई विकल्या गेलेल्या इमारतींची संख्या आणि मूल्य यासाठी विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यातही चढ्या किमतींच्या बाजारात दर झपाट्याने वाढत आहेत. दुबईच्या प्रसिद्ध अरमानीपासून ते झुमासारख्या ब्रँडेड रेस्टॉरंटपर्यंत, कोणत्या अब्जाधीशाने आपल्या नवीन लक्झरी व्हिलासाठी किती पैसे खर्च केले, याचीच चर्चा आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती-ज्यामध्ये दुबई आणि अबुधाबीचा समावेश आहे- यांचा आखाती अर्थव्यवस्थेत ७५% वाटा आहे. बहुतांश आर्थिक केंद्रेदेखील येथे आहेत. जगभरातून आयपीओची कमाई कमी झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये ते ९५% ने घटून ७ अब्ज डाॅलर झाले. परंतु, रियाधमध्ये ते तिप्पट, अबुधाबीमध्ये पाचपट आणि दुबईमध्ये शून्य ते ७ अब्ज डाॅलर झाले आहे. आखाती देशांमध्ये हळूहळू तेजी आली आहे. यामागे संकटाच्या मागच्या दशकात केलेल्या सुधारणा आहेत. २०२० च्या सुरुवातीला तेलाचे दर वाढू लागल्याने याला आणखी वेग आला. २०१४ मध्ये जागतिक तेलाच्या किमती घसरल्या तेव्हा दुबईतील मालमत्ता बाजारावर वाईट परिणाम झाला. एमिरेट्सने तेथे करमुक्त राहणे आणखी सोपे केले. आता हे शहर अधिकाधिक परदेशी खरेदीदारांना आकर्षित करत आहे. यात मोठ्या हेज फंडांपासून ते युक्रेन युद्धानंतर लादलेल्या निर्बंधांपासून सुटण्याचा मार्ग शोधत असलेल्या रशियन टायकूनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. सौदी अरेबियाने तेलाच्या दरांतील घसरण रोखण्यासाठी २०१४ मध्ये अधिक व्यापक सुधारणांचा अवलंब केला. यामध्ये कामाच्या पद्धती सुधारणे, धार्मिक निर्बंध कमी करणे, महिलांना काम करणे सोपे करणे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे यांचा समावेश होता. तेलाचे दर प्रति बॅरल ७० डाॅलरच्या खाली आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील वेतन कपातीमुळे सौदीला त्याचे बजेट वाढण्यास मदत झाली आहे. २०१५ मध्ये ते १०० डाॅलर होते. नोकरी करणाऱ्या सौदी महिलांचा वाटा पाच वर्षांत दुप्पट होऊन ३५% झाला आहे. सीमेवर महिला एजंट्सकडून स्वागत केल्याने आणि देशभरात आयोजित कॉफी शॉप डेटिंग आणि हॅलोविन पार्ट्या पाहून पाहुण्यांना आता आश्चर्य वाटते. दशकापूर्वीपर्यंत सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष एकत्र येण्यावर बंदी होती. तथापि, जुने दिवस पूर्णपणे गायब झालेले नाहीत. धार्मिक पोलिस आता हिजाबचा आग्रह धरत नाहीत, परंतु बहुतांश महिला अजूनही हिजाब घालतात. परदेशी लोकांना अजूनही गुडघे न दाखवण्यास सांगितले जाते. तरीही अनेक देश मागे जात असताना सौदी मोकळेपणाकडे कूच करत आहे. लास वेगासच्या स्वच्छंदतेसह नसले तरी रियाध एक व्यावसायिक केंद्र म्हणून दुबईच्या स्थितीला आव्हान देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे. उत्पादकता वाढवण्यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. आखाती देश या बाबतीत नेहमीच मागे राहिले आहेत. सिटी रिसर्चच्या मते, १९८० पासून सहा आखाती अर्थव्यवस्थांमध्ये मुख्य उत्पादकता दरवर्षी सरासरी २% नी घटली आहे. संशोधन यासाठी सरकारांना जबाबदार धरते, ते चांगले नियम बनवू शकले नाहीत व आवश्यक कर्ज देऊ शकत नाहीत. तेलाचे दर कमी झाले की सौदी अरेबियामध्ये दरडोई उत्पन्न घसरू लागते. आखाती देशांना हे समजून घेणे आवश्यक आहे की, तंत्रज्ञान आणि उत्पादनात गुंतवणूक करूनच त्यांची अर्थव्यवस्था तेल आणि रिअल इस्टेटमधील तेजी व दिवाळे या दुष्टचक्रातून मुक्त होऊ शकेल. त्याशिवाय ते शाश्वत प्रगती करू शकणार नाहीत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर, बेस्टसेलिंग रायटर ruchir13@gmail.com

बातम्या आणखी आहेत...