आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Human centered Science Fiction, Divya Marathi Special Supplement, Adoobal Rasik Special

पुस्तकामागच्या गोष्टी:माणसं केंद्रस्थानी ठेवणाऱ्या विज्ञानकथा

आदूबाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानकथांच्या जगात ‘ह्युगो’ आणि “नेब्युला’ हे वार्षिक पुरस्कार मानाचे समजले जातात. जवळपास ५० वर्षांची परंपरा असलेल्या या पुरस्कारांचे विजेते विज्ञानकथांच्या जगातले ठळक मानकरी आहेत. कर्ट वॉनेगट, उर्सुला के लग्विन, आयझॅक असिमोव्ह, आर्थर सी क्लार्क या ‘क्लासिक’ समजल्या जाणाऱ्या नावांबरोबरच नील गेमन, लिऊ सिशीन हे नवे सितारेही विजेत्यांच्या यादीत झळकतात. पण, तब्बल अकरा वेळा ह्युगो आणि सात वेळा नेब्युला पुरस्कार जिंकणारी कॉनी विलिस ही लेखिका या सगळ्यांची राणी म्हणावी अशी आहे.

विज्ञानकथांचे सामान्यतः दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारच्या विज्ञानकथा विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवतात. त्या विज्ञान/तंत्रज्ञानाची शक्याशक्यता आणि शक्य असल्यास नेमक्या कशा प्रकारे ते शक्य होऊ शकतं, हे सांगत पुढे जातात. वैज्ञानिक वर्णनांनी अशा प्रकारच्या कथांची पानंच्या पानं भरून वाहतात. भा. रा. भागवतांनी मराठीत अनुवाद केलेली ज्यूल व्हर्नची ‘चंद्रावर स्वारी’ ही कादंबरी या प्रकारच्या विज्ञानकथेचं उदाहरण मानता येईल. दुसऱ्या प्रकारच्या विज्ञानकथांमध्ये विज्ञान/तंत्रज्ञान हे जवळपास दुय्यम असतं. विज्ञान/तंत्रज्ञानाचा जगावर, माणसांवर, माणसा-माणसांतील आणि माणूस - जग यांच्यातील परस्परसंबंधांवर कसा प्रभाव पडतो, हे या कथा सांगतात. जयंत नारळीकरांच्या ‘यक्षांची देणगी’ कथासंग्रहातील ‘पुत्रवती भव’ ही कथा या प्रकारात मोडते.

विलिस यांच्या विज्ञानकथा दुसऱ्या प्रकारातील आहेत. आपल्याला कथेतून जे सांगायचं आहे, त्यासाठी प्रसंगी काही वैज्ञानिक तथ्यांना सोयीस्कर मुरड घालावी लागली तरी हरकत नाही, अशी त्यांची धारणा आहे. कालप्रवास (टाइम ट्रॅव्हल) या विषयावर विलिस यांनी कथा-कादंबऱ्यांची एक मालिका लिहिली. भविष्यात, म्हणजे २०५० च्या दशकात घडणाऱ्या या मालिकेत तत्कालीन ऑक्सफर्ड विद्यापीठातील इतिहास विभागाचे काही विद्यार्थी कालप्रवास करून भूतकाळात जातात आणि ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करतात. कालप्रवास या विषयावर लिहिणाऱ्या अनेक विज्ञानकथालेखकांनी त्यात येऊ शकणाऱ्या विविध अडचणींवर भरपूर लिहिलं आहे.

‘कालप्रवासाचा विरोधाभास’ (टाइम ट्रॅव्हल पॅराडॉक्स) म्हणजे ‘भविष्यातून येणाऱ्या कालप्रवाशांनी भूतकाळातल्या घटनांमध्ये हस्तक्षेप केल्यास त्याचा भविष्यावर होणारा परिणाम.’ किंबहुना कालप्रवास अद्याप प्रत्यक्षात आला नसला, तरी ‘कालप्रवासाचे नियम’ मात्र जगभरातील विज्ञानकथालेखकांच्या प्रतिभेतून तयार झालेले आहेत! विलिस मात्र आपल्या लेखनात ‘कालप्रवासाच्या विरोधाभासा’ला चतुराईने बगल देतात. ही अडचण ठरणार असल्याची जाणीव त्यांना होती. ‘ब्लॅक आउट’ आणि ‘ऑल क्लिअर’ या नेब्युला / ह्युगो विजेत्या कादंबरीद्वयीमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील चार इतिहास अभ्यासक दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंग्लंडमध्ये अभ्यासासाठी जातात. काही कारणाने ते तिथे अडकतात. डंकर्कची माघार, इंग्लंडवरचे बॉम्बहल्ले, जर्मनांची सांकेतिक भाषा उलगडण्याचे प्रयत्न यात अडकलेले विलिस यांचे चार कथानायक, त्यांचे आपापसातले आणि तत्कालीन लोकांशी असलेले नातेसंबंध हा या कादंबरीच्या गाभ्याचा विषय आहे. ‘कालप्रवासाचा विरोधाभास’ ही वैज्ञानिक संकल्पना कदाचित विलिस यांना जे सांगायचं आहे त्याला अडथळा ठरू शकली असती.

विलिस यांच्या लेखनाचा सूर नर्मविनोदी, काहीसा चहाटळ असतो. याचा अर्थ त्या गंभीर विषयांवर गंभीरपणे लिहीत नाहीत असा नाही. गांभीर्याने लिहिण्यासाठी भाषा गंभीरच असावी, हे गरजेचं नाही. विलिस यांचं आपल्या पात्रांवर प्रेम असतं, त्या अतिशय सहृदयपणे त्यांच्याबद्दल लिहितात. त्यामुळे पात्रं जिवंत होऊन उठतात. कालप्रवासाशी संबंधित कादंबऱ्यांमध्ये निरनिराळ्या काळातील लोक एकत्र येतात. त्यांच्यामध्ये काही देवाण-घेवाण होते. ते एकमेकांपासून काही शिकतात, एकमेकांचा राग, लोभ, प्रेम, द्वेष करतात. वर्णभेदासारखी एका काळातील समाजमान्य धारणा दुसऱ्या काळात गुन्हा ठरू शकते. माणूस इथूनतिथून शेवटी सारखाच असला, तरी तो आपापल्या काळाचं अपत्यदेखील असतो, हे विलिस यांच्या लेखनातून दृग्गोचर होतं.

हे सगळं लिहिताना विलिस ऐतिहासिकतेवरची पकड मात्र कधीही ढिली होऊ देत नाहीत. त्यांच्या लेखनातील ऐतिहासिक तपशील अचूक असतात आणि त्यावर खूप मेहनत घेतलेली जाणवते. ते साहजिकही आहे. कारण विलिस यांना माणसांच्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि तेही विज्ञानकथांमधलं विज्ञान अंगावर येऊ न देता.

पुस्तकामागच्या गोष्टी
आदूबाळ
aadubaal@gmail.com