आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:‘आई’ मनोहर तरी...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत कवी संमेलन रंगात आलं होतं. स्वरचित कवितांचं वाचन सुरू होतं. जवळपास निम्म्याहून अधिक कविता आईवर लिहिलेल्या. स्वाभाविक आहे म्हणा. जगात कुठेही असा कोपरा नसावा जिथे आईवर कविता लिहिल्या गेल्या नाहीत. अगदी मंगलेश डबरालच्या ‘माँ पर नहीं लिख सकता कविता’ पासून ते आताच्या पवन करणच्या कवितांमधून झळकणारी ‘माँ ‘. तेवढ्यात एका मुलीने हुमैरा रहमानचा कलाम पेश करण्यास सुरुवात केली,

वो लम्हा जब मेरे बच्चे ने माँ कहा मुझको मैं इक शाख से कितना घना दरख़्त हुई

.... आणि उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मला ही माझा जयवर्धन पहिल्यांदा ‘आई’ म्हणाला, तो क्षण आठवला आणि ओठावर नकळत स्मित उमटलं. सहज बाजूला बसलेल्या स्त्रीकडे पाहिलं आणि हसले. सुन्या डोळ्यांच्या स्त्रीने मला हसून प्रतिसाद देण्याऐवजी कोरड्या शब्दात विचारलं “आपको शायद अपने बच्चे का, माँ कहना याद आ रहा है जो आप मुस्कुरा रही हैं|’ मला कौतुक वाटलं तिचं. म्हणाले, “खूब चेहरा पढ़ लेती हैं आप!’ सपाट आवाजात ती बोलली,”यहाँ आप जैसी माँओं के चेहरे ही तो पढ़ने आयी हूँ ,वरना मुझ अभागन को यह एहसास कैसे मिले ? बाँझ हूँ मैं.’ मी चमकले. स्त्री प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करणारी मी स्तब्ध झाले. आपण इतर स्त्री प्रश्नांच्या तुलनेत बाईला वांझ ठरवून अर्धमेलं करण्याच्या वृत्तीला गंभीर का म्हणत नाही आहोत? स्त्री असणं सुंदर. आई होणं कदाचित त्याहूनही सुंदर. पण जी स्त्री “आई’ नाही ती बाईच नाही असं ठरवणं भयंकरच. सुशिक्षित स्त्रियांच्या घोळक्यात मी “अगं, तिचं काय? लेकरू न बाळ आणि जीवाला काळ’ हे वाक्य ऐकलं आणि काळजाचा ठोका चुकला. मूल नसलेली बाई अपशकुनी म्हणत मंगल प्रसंगी तिला आजही आमंत्रण देणं टाळलं जातं. ‘देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्यानं आई निर्माण केली’ हे वाक्य ऐकायला मिठ्ठास वाटत असेल पण जी स्त्री ‘आई’ नाही, तिच्यातील देवत्वाचा जाऊ द्या हो, स्त्रीत्वाचा अंश सुद्धा आम्ही नाकारतो. आपल्याकडे भाषेचा मोठा घोळ करून ठेवलेला आहे. तमाम नाजूक बाबी स्त्रीलिंगी आणि कठोर शौर्यदर्शक बाबी पुल्लिंगी ठरवून आपली भाषा म्हणजे भाषा निर्माण करणारी व्यवस्था मोकळी झालीय. स्त्रीमध्ये मातृत्व नावाची सुरेख भावना असू शकते, पण पुरुषांमध्ये मातृत्व (पितृत्व नव्हे) नसते, हे कोणी सांगितलं? याप्रमाणेच मातृत्वाला आयुष्याचं सार्थक न समजणारी स्त्री देखील असूच शकते पण आपल्या समाजात मातृत्व हा आनंददायी अनुभव कमी आणि पूर्णत्वाचं सामाजिक प्रमाणपत्र अधिक आहे.

लग्न झालेल्या जोडप्याला मूल व्हायलाच हवे, हे गरजेचे नाही. मूल होऊ देणं वा न होऊ देणं, हा त्यांचा चॉईस, त्यांचा निर्णय असूच शकतो; पण हे पचवण्याएवढा आपला समाज अजूनही प्रगल्भ झालेला नाही आणि मग हे आईपणाचं ओझं स्त्रियांवर वाईट पद्धतीनं लादलं जातं. “लग्नाचे लाडू केव्हाच पचले. आता कधी देणार गुड न्यूज?’ सारखे सवाल तिच्या काळजाला घरं पाडू लागतात. एखादी स्त्री जैविकदृष्ट्या मूल जन्माला घालण्यास सक्षम नसेल तर एकूण तिच्या बाई असण्यावरच प्रश्नचिन्ह लावलं जातं. बऱ्याचदा तर दोष पुरुषात असतो पण धारेवार धरले जाते बाईला. आपण कल्पनाही करू शकत नाहीत की हा लोकदबाव आणि त्यातून निर्माण झालेली अपूर्णतेची भावना किती भयानक असू शकते.

आपल्या समाजात मातृत्वाचे एवढे गोडवे गायले गेले आहेत की ज्याचं नाव ते. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ पासून सुरू झालेलं हे उदात्तीकरण स्त्रीचं निव्वळ स्त्रीयुक्त अस्तित्व नाकारून, “स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ इथपर्यंत येऊन ठेपतं. आता जिच्या हाती पाळण्याची दोरीही नाही आणि जी अनंतकाळची माताही नाही, अशी स्त्री या व्यवस्थेत स्वतःला किती अधुरं समजत असेल? तमाम लेखक, कवी स्त्रीच्या बाईपणावर कमी आणि आईपणावर अधिक लिहितात. जी स्त्री स्वतःतील बाईपणावर कमी आणि आईपणावर अधिक बोलते तिचा उदो उदो अधिक होतो.

आज परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे असं म्हणतात बुवा, पण आजही संपूर्ण स्त्रीची कल्पना मातृत्वाशिवाय मान्य नाही. आज-काल युरोपमध्ये जाणीवपूर्वक मातृत्व-पितृत्व टाळलं जातंय. उन्मुक्त जीवनाचा स्वीकार म्हणा, जबाबदारी नको असेल म्हणून म्हणा, पृथ्वीवरचा वाढता भार कमी करण्याच्या दृष्टीकोनातून म्हणा किंवा पर्यावरण रक्षणासाठी म्हणा, ‘चाइल्डलेस बाय चॉईस’ कडे विदेशात कल वाढू लागलाय. यातून बऱ्याचदा स्त्री स्वतःचं मूळ स्वरूप, आपल्या अस्तित्वाचा गाभा शोधण्याचा प्रयत्नही करताना दिसतेय. भारतात मात्र बाईला आजही आईपणापासून मुक्ती नाही. ज्या स्त्रीला आपल्या स्त्रीत्वाची परिपूर्णता आई होण्यात गवसते तिच्या बाबतीत ठीकच, पण जी आई होऊ शकत नाही वा होऊ इच्छित नाही, तिच्या बाईपणावर प्रश्नचिन्ह लावून तिचं अस्तित्वच झूठ ठरवणारा आपला समाज कधी बदलणार, कोण जाणे..?

भारती गोरे संपर्क : drbharatigore@gmail.com

बातम्या आणखी आहेत...