आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी ? फोटोसाठी..!:मैं चली... मैं चली...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिना चढत असतानाच जिन्याखाली टेकून ठेवलेली एक जुनी सायकल दिसली. मी थांबले. कारण तिचं अन् माझं जुनं नातं - अगदी लहानपणापासूनचं. भिंतीला असलेला पिवळसर रंग, मळकट करड्या रंगाची जमीन. त्यावर सायकल उठून दिसत होती. मी फोटो क्लिक केला. जिना चढताना सायकल हाच विचार मनात घोळत होता. आजोबांच्या नोकरीचा बहुतांश काळ ग्रामीण भागात, खेड्यात व्यतीत झाल्याने त्यांचा सर्व प्रवास सायकलवरच असायचा. मलासुद्धा शाळेत जायला सायकलच होती. परंतु ती जरा आकर्षक व आधुनिक होती.

माझे शिक्षण संपल्यावर तीच सायकल आईने आमच्या घरी घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलीला दिली. आम्ही मैत्रिणी शाळेत घोळक्याने सायकलवर जात असू. थोडक्यात काय? तर मला कळायला लागल्यापासूनच मी सायकल पाहत आले. जुन्या काळी क्वचितच सायकल चालवणाऱ्या मुली दिसत. त्यांच्याकडे लोक कौतुकाने पाहत असत. नवरदेवाला हुंड्यात मिळालेल्या सायकलची चर्चा गावभर होत असे इतकी प्रतिष्ठा सायकलला होती, असे आजोबा सांगायचे. राम नगरकर नवरी मुलगी म्हणून जिला पाहायला गेले तिनेच त्यांना सायकलने धडक दिली होती असा किस्साही माझ्या वाचनात आला होता.

या सायकलप्रेमातून चित्रपटसृष्टीही सुटलेली नाही. वास्तव जीवनात अालिशान गाड्यात फिरणाऱ्या नट-नट्या यांनी सायकलला कधीही हात लावला नसेल, पण अनेक सिनेमांमध्ये ते सायकलवरून दिसलेले आहेत.

‘बन के पंछी गाये प्यार का तराना मिल जाये अगर कोई साथी मस्ताना...’ असे म्हणत हसमुख चेहऱ्याची नूतन आपल्या मैत्रिणींसोबत ‘अनाडी’ सिनेमात सायकलवर दिसली. ‘मैं चली.. मैं चली...’ असे म्हणत एखाद्या हरणांचा कळप आपल्या मस्तीत हुंदडावा तशी हसमुख सायरा बानो व तिच्या मैत्रिणी ‘पडोसन’ सिनेमात सायकलवर दिसतात. एवढंच काय तर ‘प्रेमरोग’ सिनेमात ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे आणि ‘तेरे मेरे सपने’ या सिनेमात देवानंद-मुमताज सायकलवर डबल सीट बसून गाताना दिसतात. गमतीची गोष्ट म्हणजे टीव्हीला दूरदर्शन संच, तर कॉम्प्युटरला संगणक म्हटले गेले; पण त्याअगोदर भारतात सायकल येऊनही सायकलच्या प्रत्येक भागाला जे इंग्रजी नाव आहे ते तसेच आहे. आपण त्यांना आजपर्यंत पर्यायी शब्द देऊ शकलो नाही. असो. आजही सायकलवर भाजीविक्रेता, कल्हई करणारा, लोखंडी पेटीत बटर-पाव विकणारा असे हातावर पोट असणारे कित्येक जण सायकलवरून गल्लीतून जाताना दिसतात...

प्रियंका सातपुते संपर्क : ७३८५३७८८५६

बातम्या आणखी आहेत...