आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:जमलं तर ठीक, नाही तर..

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लि व्ह इन रिलेशनशिप म्हणजे विवाहबंधनाशिवायचे सहजीवन. परदेशातून विशेषतः अमेरिकेत व अन्य संपन्न देशांमधून ही पद्धत काही दशकांपूर्वीपासूनच प्रचलित आहे. आता ती भारतातही आलीय. आरंभी अशा प्रकारचे सहजीवन हे ‘सेलिब्रिटीज’ अर्थात सिनेतारे-तारका जगायचे. याबद्दल समाजाने कुतूहल व्यक्त केले. काहींनी हे अनैतिक आहे असे म्हणत यावर नाके मुरडली. टीका केली. महिला संघटना, संस्था, सामाजिक व्यासपीठे यावर चर्चा-परिसंवादही झाले. पण नंतर अशा प्रतिक्रिया येणे कमी कमी होत शेवटी बंदही झाले. आता मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, उच्चशिक्षित, सुसंस्कृत वर्गातही लिव्ह इन बाबत कुठलाही ‘टॅब्यू’ राहिलेला नाही!

‘लिव्ह इन..’बाबत इच्छुक असणाऱ्या लोकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पुढील काही बाबी ठळकपणे दिसतात. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग ‘वेल सेटल्ड’ असतो. शैक्षणिकदृष्ट्या हे लोक उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित असतात. जीवनाबाबतचा त्यांचा दृष्टिकोन तुलनेने अधिक व्यापक असतो. त्यांचे राहणीमान, खानपान, आधुनिक असते. स्वतःचे आरोग्य, फिगर याबाबत ते विलक्षण जागरूक असतात. त्यामुळे त्यांच्या समवयीन अन्य लोकांपेक्षा ते स्मार्ट आणि फिट असतात. अधिक आंनदी-उत्साही असतात. अनेकांनी आयुष्यात विवाहाचा वाईट अनुभव घेतलेला असतो, चटके सोसलेले असतात. त्यामुळे ‘नको ते लग्न आणि नको तो त्यातून उद्भवणारा मनःस्ताप’ अशी त्यांची धारणा असते. म्हणून ते लिव्ह इनला प्राधान्य देतात. त्यासाठीचा जोडीदार त्यांना त्याच विचारांचा, मानसिकतेचा, दृष्टिकोनाचा आणि सुंदर, उत्साही अपेक्षित असतो. “लोक काय म्हणतील?’ हा प्रश्न त्यांना बिलकूल पडत नाही. कारण त्यांचे लोकांवर काही अवलंनबूनही नसते. कसेही जगा लोकं “उलटसुलट बोलतातच’ यावर त्यांचा विश्वास असतो. या सर्व गुणवैशिष्ट्यांवरून लिव्ह इनवाले स्त्री-पुरुष हे स्वच्छंदी, बेजबाबदार, विलासी, चारित्र्यशून्य म्हणून अत्यंत वाईट असतील असा समज होऊ शकतो. त्यात मर्यादित स्वरूपाचे तथ्य असेलही.

परंतु लिव्ह इनवाले बहुतांश लोक विचारी, सकारात्मक, काळाच्या पुढचा विचार करणारे असतात! मग ते लग्नपद्धतीवर विश्वास का ठेवत नाहीत? आणि हाच या विषयातील कळीचा प्रश्न आहे. तसेच पिढी, अपत्ये याबाबतच्या कर्तव्याबाबतही ते त्यांची जबाबदारी का घेत नाहीत ? त्यांना केवळ भौतिक चैन विलास “एन्जॉय’ करायचा आहे, पण जबाबदारी मात्र काहीही नको. जमतेय तेवढे दिवस एकत्र राहू. मौजमजा करू नंतर सोडून देऊ एकमेकांना अशीच मनोवृत्ती वा भूमिका नसते का? असे अनेक मुद्दे आहेत. विवाह ही एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. तिच्यामुळेच समाजरचना, सामाजिक स्वास्थ्य टिकून यात वादच नाही. परंतु दुर्दैव वा अन्य असंख्य कारणांमुळे जर योग्य जोडीदार मिळाला नाही तरीही लोढण्यासारखे एकमेकांसोबतच जीवन कंठायचे, यात कुठला सुज्ञपणा आहे? लग्न संस्था अनेक देशातून टिकून आहे ती तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळेच. पण या सर्वांच्या मुळाशी-तळाशी म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांच्या मुळाशी काय असते? त्याचा आधार काय असतो? तो प्रामुख्याने असतो विश्वास, प्रेम आणि आस्था. या तीन मूलभूत निकषावर जर आपण होणारे विवाह वा लग्ने तपासून पाहिली तर ती सगळीच्या सगळी म्हणजे शंभर टक्के खरी उतरतील का? म्हणजेच लग्न या पद्धती, संस्कार, रिवाज वा संस्थेतही काही तिच्या अंगभूत मर्यादा आहेत. लग्न ही संस्थाही परिपूर्ण म्हणजे नाही. आणि जी गोष्ट परफेक्ट वा परिपूर्ण नाही तिच्यासाठी पर्याय वा अन्य मार्गांचा शोध माणूस करीतच असतो. त्या शोधाचेच एक रूप म्हणजे “लिव्ह इन रिलेशनशिप.’ हे रूप पूर्णांशाने परफेक्ट आहे, असा दावा मी मुळीच करणार नाही. पण लग्न संस्थेतील अनेक त्रुटींवर, मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. म्हणून आपण या पर्यायालाही एक संधी अवश्य दिली पाहिजे असे वाटते.

सुधीर सेवेकर संपर्क : 9834066747

बातम्या आणखी आहेत...