आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • 'If You Want Someone Else, It Will Be Difficult...' | Article By Dr. Aratishyamal Joshi

निमित्त:‘तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी...’

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत झालेली कशिशची हत्या हा काही केवळ अल्लड वयातल्या मानसिकतेपुरता मर्यादित प्रश्न नाही. हा प्रश्न आहे, स्त्रियांच्या नकाराधिकाराचा, ‘तुम किसी और को चाहोगी, तो मुश्किल होगी..’ या वृत्तीचा आहे, पुरुषी वर्चस्वाला मिळणाऱ्या मूक समाजमान्यतेचा आहे...

गे ल्या काही वर्षांत राज्यात एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनांच्या मालिकेत औरंगाबादमध्ये २२ मे २०२२ रोजी घडलेली कशिशची हत्या जोडली गेली आहे. कशिश आणि लेखात उल्लेखलेल्या घटनांमध्ये एक साम्य आहे. या मुलींनी एकतर्फी प्रेमाला नकार दिला. एकतर्फी प्रेमातून नीता हेंद्रे, अनिता श्रीखंडे, वैशाली पाटील, सत्त्वगुणी जाधव, जान्हवी तुपे आणि आता कशिशला जिवाला मुकावे लागले. या घटनेनंतर साहजिकच भरकटलेली तरुण पिढी, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव, चित्रपटाचे दुष्परिणाम, पालकांचे दुर्लक्ष, मुलींनी घरच्यांपासून अशा बाबी लपवणे यावर चर्चा सुरू झाल्या. काहींनी प्रेम म्हणजे त्याग, समर्पण अशा तात्त्विक बाबींवर मते मांडली, तर एक वर्ग स्त्रियांच्या नकाराच्या अधिकारावर मत मांडत व्यक्त होताना दिसला. तिला न्याय मिळावा यासाठी शहरात कँडल मार्च झाले. काहींनी पोस्टरही लावले. दुसऱ्याच दिवशी आरोपी पकडला गेला. आता खटला चालेल, त्याला शिक्षा होईल, कशिशला न्याय मिळेल. पण तिचा गेलेला जीव काही परत येणार नाही. पुन्हा पुढची घटना होईपर्यंत समाज ही घटना विसरून जाईल, हेच खरे वास्तव आहे. त्यामुळे अशा घटनांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. या घटना अचानक घडत नसतात. त्यांची बीजे रुजत असतात. त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात का, हा प्रश्न आहे.

तुम किसी और को चाहोगी, तो मुश्किल होगी… या मुकेशच्या स्वरातील १९६३ च्या “दिल ही तो है’ चित्रपटातल्या गीतापासून १९९३ च्या “डर’ चित्रपटातील “तूू हां कर या ना कर तू है मेरी किरन…’ यासारखी गीते नेमकी काय ठसवतात? समाजात वर्षानुवर्षे पितृसत्ताक संस्कृती अनेक पद्धतींनी जोपासली जाते. समाजात जे घडते तेच माध्यमांमध्ये उमटते. अनेक चित्रपटांत एकतर्फी प्रेमाचे उदात्तीकरण केले जाते आणि त्यातून अशा घटनांचा

पाया रचण्यास मदत होते. वास्तविक पाहता अशा हत्या मुलीच्या एका नकारातून होत नसतात. वर्षानुवर्षे रुजवण्यात आलेल्या पुरुषसत्ताक पद्धतीला, मानसिकतेला जेव्हा ठेच पोहोचते तेव्हा त्याचा हिंसेतून उद्रेक होतो. ज्या कुटुंबात पुरुष हा पित्याच्या रूपात कर्ता तर आई स्त्रीच्या रूपात आश्रित, परावलंबी असे चित्र असते, तेथे पितृसत्तेला खतपाणी मिळते. स्त्रीत्वाला परावलबंनात टाकण्याची स्थिती ज्या वेळी निर्माण केली जाते, त्याच वेेळी प्रेयसी, पत्नी, बहीण यांचा रक्षणकर्ता म्हणून साहजिकच सहवासातल्या पुरुषांचे उदात्तीकरण होते. मग घरातल्या स्त्रीने तर आपले ऐकावेच; परंतु प्रेयसी, आपल्याला आवडणारी स्त्री हिनेसुद्धा आपला शब्द राखावा,

अशी अपेक्षा निर्माण होत जाते. नुसता शब्द राखू नये तर आपली मालकी स्वीकारावी हा अट्टहास असतो. मुलगी ज्या वेळी शाळा-महाविद्यालयात प्रवेश करते, त्या वेळी दप्तरासोबत कुटुंबाची इज्जतही ती सोबत घेऊन जात असल्याचे तिच्या मनावर सातत्याने बिंबवले जाते. यामुळे काही ‘ऊंच-नीच’ झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तिच्यावरच असल्याचे ठसवले जाते. शिक्षणासाठी पाठवून तिच्यावर उपकारच करत असल्याचा पालकांचा आविर्भाव असतो. एवढ्या दडपणातून शिक्षण घेताना धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान जपण्याचा दबावही तिच्यावर असतो. चुकीचे पाऊल पडले तर तंगडे मोडेन, थोबाड फोडेन, शिक्षण बंद करून लग्न लावून टाकू, ही भाषा घरातील पुरुषांसह पुरुषसत्तेचे नियम वाहणाऱ्या आईचीही असते. अशा परिस्थितीत मुलीने एखाद्या मवाली, रोडरोमिओकडून होणाऱ्या त्रासाची माहिती घरात सांगितली तर पहिल्यांदा तिलाच आरोपीच्या कठड्यात उभे केले जाते. एवढ्या मुलींतून तुलाच त्रास का देतो, तुझ्याच मागे का लागतो, अशा प्रश्नांचा भडिमार केला जातो.

याची उत्तरे तिच्याकडे नसतात. मग आलेल्या अनुभवातून शहाणे होत ती उत्तरे तयार ठेवते. ते म्हणजे मौन बाळगणे, गप्प राहणे. आपल्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ती शांतच राहते आणि येथेच एकतर्फी प्रेम करणाऱ्याचे फावते. तो तिला त्रास देत राहतो आणि ती सहन करत जाते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तिचेे ओठ शिवण्याचे काम नकळत ही समाजव्यवस्थाच करते. प्रेम आणि हिंसा या परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्या एकत्र राहू शकत नाहीत. प्रेम ही तरल भावना आहे. त्यात आकर्षण हा भाग असला तरी विश्वास आणि विचारांचा धागा जुळणे गरजेचे आहे. आदर, समर्पण आणि त्याग हे प्रेमाचे भांडवल आहे. यात स्वामित्वाची भावना असू शकत नाही. हा विचार पितृसत्तेच्या कक्षा मोडून अमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलींना घरातून पाठिंबा देण्याची गरज आहे. तिला होणारा त्रास तिने वेळीच सांगितला तर मदतीचा हातच मिळेल, हा विश्वास द्यायला हवा. या त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांना, पोलिसांना माहिती देऊन त्यास चाप बसवता येऊ शकतो. एकतर्फी प्रेमातून जाणारे जीव वाचवता येऊ शकतात. अशा घटना जेव्हा अचानक घडतात तेव्हा नागरिकांची काय भूमिका असावी, तात्काळ काय कृती करावी याचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करण्यापेक्षा सामूहिक प्रतिकार केला, पोलिसांना तातडीने खबर दिली तर जीव वाचू शकतात. असे खटले फास्टट्रॅकमध्ये चालवण्यासाठी सरकारचे खास धोरण असावे. संघटनात्मक पातळीवरील एकजूट, वैचारिक मंथन अशा घटनांना आळा घालू शकेल. घराघरांत स्त्रियांकडे मादी म्हणून न पाहता व्यक्ती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झाला तर तिच्या मतांचाही आदर होईल हे निश्चित.

पुरूषी वर्चस्व मानसिकतेच्या बळी... - १९९० - उल्हासनगरमध्ये रिंकू पाटीलला दहावीच्या पेपरदरम्यान हरेश पटेलने परीक्षा केंद्रातच जाळले. - १९९८ - सांगलीच्या अमृता देशपांडेची बबन राजपूतने हत्या केली. - २००० - मुंबईच्या रसिक सोलंकी या टेलरने रिझर्व्ह बँकेतील विद्या प्रभुदेसाईला रॉकेल टाकून जाळले. - २०११ - नागपूरमध्ये मोनिका किरणापुरेची रस्त्यात भोसकून हत्या झाली. यात मोनिकाचा चुकून बळी गेला. - २०१८ - ठाण्यात प्राची झाडे या तरुणीची आकाश पवार याने हत्या केली. - २०२० - हिंगणघाट येथे प्राध्यापिका असलेल्या फुलराणीला विकी नगराळेने भररस्त्यात पेटवून दिले. - २०२२ - साताऱ्यात निखिल कुंभार याने एकतर्फी प्रेमातून पायल साळुंखे या अल्पवयीन मुलीला भोसकले.

डॉ. आरतीश्यामल जोशी - संपर्क : ९९२३१०६५६६

बातम्या आणखी आहेत...