आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:तुम्हावर केली मी मर्जी बहाल...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंधळ, पोवाडे, लावणी, भारूड या प्रकारांनी महाराष्ट्राचे संगीत समृद्ध केले. त्यातही लावणीचे स्थान अग्रगण्य मानले गेले. लावणीशिवाय मराठी सिनेमाचा इतिहास अपूर्ण आहे. असे असूनही हे सगळे काव्यप्रकार जात-वर्ग आणि लिंगभावात विभागले गेले.

सा धारण नव्वदच्या दशकापूर्वी ‘पिंजरा’ चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवलं. त्यातल्या ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’, ‘दिसला गं बाई दिसला’, ‘गं बाई मला इश्काची इंगळी डसली’ अशा आणि प्रत्येकच गीताचं गारूड आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आणि लता-आशा भगिनींनी गायिलेली ही गीतं अजूनही कित्येकांना मुखोद्गत आहेत. ही गाजलेली गाणी म्हणजे गण-गौळण आणि लावणी या प्रकारातली. लावणी हा महाराष्ट्रातील ग्रामीण, शृंगारिक काव्यप्रकार. लावणी ही भक्तिरसपर, शृंगारिक, गूढ, दंतकथांवर आणि धार्मिक कथा-घटनांवर आधारित असलेली आकर्षक, श्रवणीय बाज असलेली रचना आहे.

गोंधळ, पोवाडे, लावणी आणि भारूड या प्रकारांनी महाराष्ट्राचे संगीत समृद्ध करण्यास मदत केली. त्यातल्या त्यात लावणीचे स्थान अग्रगण्य मानले गेले. लावणीविना मराठी सिनेमाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा इतिहास परिपूर्ण होऊच शकत नाही. असे असूनही लावणी, गण, गौळण, पोवाडे, अभंग हे सगळे काव्यप्रकार जात-वर्ग-वर्ण आणि लिंगभावात विभागले गेलेले आहेत. अभंगांची रचना देवाचं नामस्मरण करणाऱ्या संतांनी केली. किंवा भजन-कीर्तनात नामस्मरण आहे, जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान आहे, विरक्ती आहे म्हणून ते श्रेष्ठ. पोवाडे वीररसाची निर्मिती करतात, पुरुषार्थाला आव्हान देतात म्हणून ते श्रेष्ठ आणि लावणी ही शृंगारिक, उत्तान, मनोरंजक म्हणून ती कनिष्ठ असे समजायचे का? असे नसते तर नुकत्याच लालमहालात झालेल्या लावणी नृत्याचा बाट म्हणून निषेध आणि महाल गोमूत्राने शुद्ध करण्याचा प्रकार झालाच नसता.

‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘पाडाला पिकलाय आंबा’,‘आई मला नेसव शालू नवा’ सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या अशा बहारदार एकाहून एक सरस लावण्या म्हणजे मराठी कविता आणि गीतांच्या पुस्तकातलं एकेक सोनेरी पानच आहे. सुलोचनाबाईंच्या गायनाचा बाज, आवाजातली लकब आणि मूळ आवाजातला भरजरी गोडवा, ठसकेबाजपणा हा प्रत्येक गीतातून रसिकांच्या मनावर कायमचा कोरला गेलाय. ‘हात नका लावू माझ्या साडीला’, ‘बाई माझी करंगळी मोडली’ अशा कितीतरी लावण्या आशाबाईंनीसुद्धा अजरामर केल्या. एवढेच नव्हे तर ‘अप्सरा आली’, ‘पिंगा गं पोरी’ सारख्या लावणीसदृश गाण्यांची अजूनही प्रेक्षकांना आणि नव्या गायिकांनाही भूल पडलेली दिसते. परंतु लावणी म्हणजे केवळ शृंगाररस असं समजून या काव्य आणि नृत्यप्रकाराच्या वाट्याला बदनामीच अधिक आली.

‘पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘राजसा जवळी जरा बसा’, जीव हा पिसा तुम्हावीण बाई’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल’, ‘अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा’, ‘मला हो म्हणतात लवंगी मिरची’ अशा लावणी रचनांमध्ये स्त्रियांची दिलखेचक अदा, गीतातील आर्जवं, ही पुरुषांना आपलंसं करून घेण्यासाठी, त्यांना फशी पाडण्यासाठी, त्यांच्याजवळची संपत्ती स्वतःवर उधळण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठीच आहे असं चित्र दिसत असलं तरी कनिष्ठ जातीतील स्त्रियांचे असं चित्र हे लैंगिक इच्छा अतृप्त असलेल्या व मूलतः व्यभिचारी असलेल्या अशा पुरुष रचनाकारांकडून जाणीवपूर्वक रंगवण्यात आलेलं आहे. लावणीच्या रचना पूर्णपणे पुरुषांकडून केल्या जात व त्याचे सादरीकरण पुरुष प्रेक्षकांपुढे स्त्रियांकडून केले जात असे. त्यामध्ये पुरुषी दृष्टिकोनातून प्रभावित झालेल्या स्त्रियांच्या इच्छा उघडपणे कामुकतेने प्रदर्शित केल्या जात असत. प्रेक्षकांमधील उच्चभ्रू पुरुषांची तिच्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा असे. मराठी चित्रपटाला नुकत्याच उदयाला आलेल्या कृषी क्षेत्रातल्या भांडवलदारांकडून वित्तपुरवठा व्हायला लागला. त्यानंतर लावणीमध्ये विहीर, पंपसेट, इंजिन, आंबा, नारळ, पपई अशा तऱ्हेची रूपके वापरून नाचीच्या अवयवांचे वस्तूकरण करणारी द्विअर्थी शब्दयोजना केली जाऊ लागली. आणि लावणी कलावंतिणीच्या शरीराचे वर्णन पूर्वीपेक्षा अधिकच उघडपणे केले जाऊ लागले.

पुरुषांचं मन रिझवण्यासाठी, त्याच्या रंजनासाठी शृंगारी लावणीचा उपयोग केला जाऊ लागला. बैठकीची लावणी, फडावरची लावणी कमी-जास्त दर्जाची ठरवली गेली. पुढे पुढे तर लावणी संगीतबारी आणि तमाशाला घर, कुटुंब उद्ध्वस्त करणारा असा हीन दर्जा, आणि ते करणाऱ्या कलावंतांकडे पाहण्याचा हिणकस दृष्टिकोन तयार झाला. यामुळे लावणी नृत्यांगनांची वाताहत झाली आणि गण-गौळण सादर करणाऱ्या नाच्यांचीही अवहेलना झाली.

‘सलामे इश्क मेरी जान जरा कुबुल कर लो’, ‘इन अाँखों की मस्ती के मस्ताने हजारो हैं’, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए’.. मराठी चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्येही लावणी म्हणजे नाचनेवालीच्या कोठ्यावर ‘मुजरा’ म्हणून सादर केली जाऊ लागली. दोन्हीकडे उच्च जातीतला श्रीमंत नायक आणि त्याचा संसार उद्ध्वस्त करणारी कनिष्ठ जातीतली नाचगाणं करणारी स्त्री अशाच प्रकारचं चित्र साकारण्यात आलं. आणि बहुतेक वेळा पुरुषाच्या आयुष्यात येणारी अशी स्त्री आत्महत्या करून, किंवा कुणाचे तरी प्राण वाचवत दुसऱ्याmj03.चे वार अंगावर घेऊन, जिवाचे बलिदान देऊन पहिल्या पत्नीचा संसार आबाद राखणारी असं चित्र दाखवण्यात येऊ लागलं. म्हणजे लग्नसंस्थेत, कुटुंबसंस्थेत तिला काहीही स्थान नाही हे केवळ चित्रपटच नव्हे तर नाटक, कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारांतूनही लिहिलं गेलं. म्हणूनच तर नाचगाणं करणारी पूर्वीची ‘कलावंतीण’ नट्टापट्टा करून पुरुषांना भुलवणारी देखणी, स्वैर, चवचाल, चालू, चटपटीत ‘कळवातीन’ म्हणून शिवीसारखी वापरली जाऊ लागली. म्हणूनच ‘जाब विचाराया गेला तिनं केला डाव, भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव’ या ओळी म्हणत असताना ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ लिहिलेली कागदाची पट्टी नायकाच्या पायदळी तुडवलेली दाखवण्यात येते. आणि कसा एका तमाशातल्या नाचीच्या नादी लागून एक आदर्श ब्रह्मचारी शिक्षक बरबाद होतो, याचं आदर्श उदाहरण म्हणूनच ‘पिंजरा’ हा सिनेमा लोकप्रिय ठरतो.

सारिका उबाळे संपर्क : ९४२३६४९२०२

बातम्या आणखी आहेत...