आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझे चुकत नसेल, तर कोविडचे व्यवस्थापन करण्यात चीन जगाच्या तुलनेत किमान ६ ते ९ महिने मागे आहे. आता चीनने शेवटी झीरो-कोविड धोरण शिथिल केले आहे. त्यामुळे लोक एकमेकांशी नैसर्गिक पद्धतीने संवाद साधू लागतील, हे उघड आहे. अशा परिस्थितीत कोविडचे भविष्य दोन पैलू ठरवतील. पहिला, चिनी लोकसंख्येची लसीकरण स्थिती आणि त्यांची अंतर्निहित सामूहिक प्रतिकारशक्ती. येथे लक्षात घेतले पाहिजे की, पहिला घटक अपरिहार्यपणे दुसऱ्यावर परिणाम करेल. चीनमधील लोकांमध्ये दीर्घकाळ संपर्क नसल्यामुळे ते रोग प्रतिकारशक्तीच्या विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचले नव्हते. लक्षात ठेवा की मानवांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती येणारे व्हेरिएंट आणि नवीन एपिटोप्सच्या सतत हल्ल्यांसह विकसित होत आहे. परंतु, चीनची लोकसंख्या - विशेषत: टियर १ आणि टियर २ शहरांमधील - झीरो-कोविडअंतर्गत दीर्घ काळापासून कडक पहाऱ्यात होती. चायना कोविड टास्क फोर्सचे सल्लागार फेंग झिजियान यांच्या मते, कोविडच्या वाढीमुळे ६० टक्के लोकसंख्येवर किंवा सुमारे ८४ कोटी लोकांवर परिणाम होऊ शकतो. निवडक उच्च-जोखीम गट ओळखले जाण्याची दाट शक्यता आहे. चीनमधील मोठ्या लोकसंख्येला अद्याप या विषाणूची लागण झालेली नसल्याने अपेक्षित प्रतिकारशक्ती वाढण्यास वेळ लागेल. या दरम्यान कोविडच्या लाटा येत राहतील आणि सामान्य स्थितीत येण्यासाठी ६ ते ९ महिने लागू शकतात. आता लसीकरणाबद्दल बोलू. चीनचे लसीकरण जगातील इतर देशांपेक्षा चांगले होऊ शकले असते, हे अंतर्गत आणि बाह्य डेटावरून स्पष्ट होते. चीनच्या संरक्षणवादी धोरणामुळे अंतर्गत डेटा पुनरावलोकनासाठी उपलब्ध नसला तरी अप्रत्यक्ष निर्देशक सूचित करतात की, चिनी लस इतर देशांच्या तुलनेत अप्रभावी आणि अकार्यक्षम ठरल्या आहेत. बहुतांश चिनी लसी जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत आणि आधुनिक एमआरएनए आधारित प्लॅटफॉर्मवर नाहीत. पाश्चात्त्य देशांतील एमआरएनए लसींनाही वारंवार सुधारणांची गरज पडत होती. खरे तर, कोणतीही रणनीती बनवताना जोखीम व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. बहुतांश देशांनी सर्वात असुरक्षित लोकसंख्येवर, उदा. वृद्ध किंवा गंभीर आजार असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करून जोखीम कमी केली, तर जिनपिंग यांनी काम करणाऱ्या लोकांवर अधिक लक्ष केंद्रित केले. शून्य जोखमीमध्ये किती त्रुटी आणि उणिवा आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. शून्य जोखमीमुळे लोकांना असा धोका निर्माण झाला आहे की, गरीब लोक अद्याप सार्स कोविडच्या उदयोन्मुख उत्परिवर्तनांच्या संपर्कात आलेलेच नाहीत. आता चीनमध्ये कोविडचे भविष्य काय असेल, असा प्रश्न आहे. जोपर्यंत चीनमधील प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादात स्थिरता येत नाही तोपर्यंत ते काही टप्प्यांतून जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात संसर्ग अचानक वाढेल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात वेळोवेळी त्याची शिखरे येत राहतील. तिसऱ्या टप्प्यात संसर्ग हळूहळू कमी होईल आणि स्थिती स्थिर होईल. २०२३ मध्ये चीन कोविडपासून मुक्त होईल का, हा प्रश्न आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणतेही अंदाज बांधणे कठीण आहे. पण, त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला तर कुणालाही नवल वाटायला नको. यामुळे चीनमध्ये सामाजिक असंतोष वाढू शकतो आणि त्याची उत्पादक शक्ती कमी होऊ शकते. एकूणच चीनची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा वाईट होणार आहे. मग त्याच्यासमोर पर्याय काय? सर्वप्रथम, चीनने आपल्या सामाजिक व्यवस्थेत मोकळेपणा आणणे आणि जोखीम व्यवस्थापनाच्या योग्य पद्धती वापरणे आवश्यक आहे. ज्यांनी शून्य कोविड धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला होता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांचे धोक्याच्या परिस्थितीपासून संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले तरच धोरणे प्रभावी ठरू शकतात. त्याचबरोबर प्रशासनानेही कठीण प्रसंगांना तोंड देण्याची तयारी ठेवावी, ती टाळण्याचा प्रयत्न करू नये. आपला दृष्टिकोन सौम्य ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण सरकार दडपशाही धोरणे स्वीकारते, तेव्हा परिणामी जनता चिडते आणि सामाजिक असंतोष निर्माण होतो. चीनला दीर्घकाळ बलाढ्य देश राहायचे असेल तर त्याला निसर्गाला अनुरूप व्हावे लागेल, निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करून चालणार नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
डॉ. शशांक हेडा कोविड आरएक्स एक्सचेंजचे संस्थापक Info@covidRxExchange.org
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.