आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Improvement In Hygiene Maintenance Is Very Important For Hospitals | Article By Ritika Kheda

विश्लेषण:स्वच्छता राखण्यामधील सुधारणा रुग्णालयांसाठी अत्यंत महत्त्वाची

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी एक मोठी बातमी आली होती की, पंजाबचे आरोग्य मंत्री फरीदकोट येथील एका रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि अस्वच्छ गाद्या पाहून त्यांनी बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ-सायन्सचे कुलगुरू डॉ. राज बहादूर यांना बोलावून त्या गादीवर झोपायला सांगितले. मंत्र्यांच्या वागणुकीने दुखावलेल्या डॉक्टरांनी राजीनामा दिला. या घटनेला प्रसार माध्यमांनी जोरदारपणे प्रसिद्धी दिली. पण, राजकीय मर्यादा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्याने कुणाशी असभ्यपणे वागावे का? तीच गोष्ट सभ्यपणे सांगता आली नसती का? तसेच, रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव का आहे, त्याची जबाबदारी कोणाची, रुग्णालयात खाटा असतील तर त्यांच्या चादरी स्वच्छ ठेवण्याची काय व्यवस्था आहे इ. मुद्द्यांवर फारशी चर्चा झाली नाही. रुग्णालयात किती स्वच्छता कर्मचारी असावेत, किती आहेत, किती ड्यूटीवर आहेत? नियुक्त्या आणि उपस्थिती कमी असेल तर का? गाद्या का फाटल्या? यामागे भ्रष्टाचार आहे का? की बजेट नाही, अशी विचारणा मंत्र्यांनी केली नसावी.

नुकत्याच पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य सुविधा सर्वेक्षण, २०२२ मध्ये रुग्णालय प्रणालीशी संबंधित अशा समस्याही समोर आल्या. २०१३ मध्ये आम्ही चार राज्यांमध्ये सुमारे १५० आरोग्य सुविधांचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानचा समावेश करण्यात आला होता. १० वर्षे उलटल्यानंतर आता त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. याशिवाय एका नवीन राज्याचा (छत्तीसगड) समावेश करण्यात आला, कारण तिथे राज्य सरकारांनी आरोग्यावर चांगले काम केल्याचे ऐकले होते. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश सरकारी आरोग्य सुविधांमधील सेवांची सक्रियता तपासणे हा होता. मुख्य फोकस नसला तरी आरोग्य सेवेमध्ये स्वच्छतेच्या मुद्द्याचाही समावेश होतो. सर्वेक्षणात स्वच्छतेशी संबंधित अनेक मुद्दे चर्चा करण्यासारखे आहेत. सरकारी आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अनेक पदांवर नियुक्त्या झालेल्या नाहीत. डॉक्टर, परिचारिका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे कायमस्वरूपी असतात, पण सफाई कामगारांची पदे आता बहुतांश (किंवा संपूर्णपणे) कंत्राटावर असतात. आरोग्य उपकेंद्रात सफाई कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पदासाठी बजेट नसल्यामुळे परिचारिका एक तर स्वत: साफसफाई करतात किंवा कोणाला २००-४०० रुपये देऊन साफसफाई करून घेतात.

काही आरोग्य केंद्रे अशीही आढळून आली, जिथे पाणीपुरवठाच नाही. तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पाण्याशिवाय आरोग्य सुविधा कशी चालणार? स्वच्छतेशी संबंधित आणखी एक मुद्दा म्हणजे जैव-वैद्यकीय कचरा. रुग्णालयात निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, अन्यथा त्यातून रोगराई पसरू शकते. ते एक तर जाळावे लागते किंवा त्याचे निर्जंतुकीकरण करावे लागते. उगमस्थानीच कचऱ्याचे विलगीकरण हे जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे महत्त्वाचे तत्त्व आहे. जवळपास सर्व रुग्णालयांमध्ये रंगीत डस्टबिन असतात, त्यात कचऱ्याच्या प्रकारानुसार (उदा. धारदार वस्तू, संसर्गजन्य पदार्थ इ.) कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत होता. पण, रुग्णालयातून निघाल्यानंतर त्यांचे काय होते? सर्वेक्षणातील काही रुग्णालयांमध्ये त्याची यंत्रणा सार्वजनिक खासगी भागीदारीतून चालवली जात असल्याचे आढळून आले. आरोग्यसेवेच्या बजेटमध्ये एक कल दिसतो की, इमारती आणि उपकरणांसाठी बजेट वाढते, तसेच आरोग्य विम्यावरील खर्च वाढत आहे, परंतु स्वच्छतेसारख्या मूलभूत सेवांकडे दुर्लक्ष होते.

रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. जिथे खुल्या जखमा, शस्त्रक्रिया, रुग्णांवर उपचार होतात, तिथे सर्वाधिक स्वच्छता गरजेची आहे. फरीदकोट रुग्णालयाच्या स्वच्छतेशी संबंधित वादातही हा मुद्दा मोजक्याच लोकांनी अधोरेखित केला आहे.

(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) रितिका खेडा दिल्ली आयआयटीमध्ये अध्यापन reetika@hss.iitd.ac.in

बातम्या आणखी आहेत...