आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अंतरंग:चीनमध्येही भोंगा...

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘तु मच्याकडे भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. आमच्याकडे भोंगे वाजले की गलितगात्र व्हायला होतंय.’ चीनमध्ये राहणारा एक मित्र कालपरवा सांगत होता. शांघायच्या जवळजवळ प्रत्येक गल्लीबोळात हे भोंगे रोज सकाळी वाजतात. ‘हे वाजणारे भोंगे म्हणजे मला आणि माझ्या शेजाऱ्यांना आमच्या ‘अनिवार्य कोविड’ चाचणीसाठी आमच्या घरातून बोलावणे. हॅझमॅट सूटमधील स्वयंसेवकांना दार ठोठावण्याची संधी न देता मास्क घालून, हातात फोन घेऊन आम्ही एकेक करून ताबडतोब बाहेर पडतो. वेळ चुकवली तर हे स्वयंसेवी दार उघडेस्तोवर ठोठावत राहतात. त्यातून कोणीही सुटत नाही. त्यांना तशाच ऑर्डर्स आहेत,’ तो पुढे म्हणाला. हे सगळं अगदी कालपरवापर्यंत सुरू होतं.

शांघायचा लॉकडाऊन हा जगभरात एक चर्चेचा विषय होऊन बसला आहे. लोकांना घरातून बाहेर पडायची परवानगी तर नव्हतीच, पण ही टेस्ट पण गरजेची होती. त्यातून कोणालाच सुटका नव्हती. भीती पॉझिटिव्ह यायची. कारण त्यानंतर तत्काळ रवानगी शांघायच्या कठोर क्वॉरंटाइन सेंटर्समध्ये, किती दिवस किंवा आठवडे ... माहीत नाही. ऐकीव माहितीनुसार, सुविधांच्या नावावर घाण ओकणाऱ्या कचऱ्याच्या पेट्या, अरुंद-अस्वच्छ खोल्या आणि गलिच्छ सार्वजनिक शौचालये. त्यामुळे कोरोना अधिक भयंकर आहे की ही सरकारची जबरदस्तीने आणलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ या संभ्रमात हे लोक आहेत. स्वतःपेक्षा त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजी आहे.

आपल्याला जर क्वॉरंटाइन सेंटरमध्ये जावे लागले तर कुटुंबाचाच भाग बनलेल्या या कुत्र्या-मांजरांचे काय होईल ही धास्ती. चिनी सोशल मीडियात या पाळीव प्राण्यांचे अनेक किस्से सांगितले – दाखवले जात आहेत. चार-पाच प्राण्यांना एकत्र बांधून ठेवणे किंवा सरळ त्यांची कत्तल करणे हे ते प्रकार. पण अनेक सुज्ञ नागरिक चाचणीसाठी जाताना आपल्या पाळीव प्राण्यांचे दहा दिवसांचे खाणेपिणे सोडून जात आहेत. दरम्यान, सुधारणेची काही चिन्हे दिसत असली तरी शहरातील अन्नाची स्थिती अजूनही नाजूक आहे. ट्रकचालकांनी अडकण्याच्या भीतीने शहरात प्रवेश करण्यास नकार दिला आहे. वाटप करायला कर्मचारी नाहीत. अडीच कोटी लोकसंख्येचे हे भव्य शहर चीनमधल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कोविड उद्रेकाला रोखण्याच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे. कोणालाही त्यांचे निवासी कंपाउंड सोडण्याची परवानगी नाही, अगदी अन्न खरेदी करण्यासाठीदेखील. त्यामुळे सगळेच लोक सरकारी किंवा खासगी डिलिव्हरी ड्रायव्हर्सवर अवलंबून आहेत - आणि बऱ्याच लोकांसाठी व्हायरसच्या धोक्यापेक्षा निर्बंध अधिक त्रासदायक झाले आहेत. माझा मित्र सांगत होता की त्यांच्या कॉलनीत सरकार ४-५ दिवसांत एकदा अन्न वितरित करते. त्यात भाज्या आणि अंड्यांपासून पोर्क, चिकन किंवा काही पारंपरिक चिनी औषधापर्यंत बरेच काही असते. पण ही अन्नाची पाकिटे कुटुंबासाठी सोडाच, पण एका व्यक्तीसाठीसुद्धा पुरेशी नसतात. चिनी सोशल मीडिया अॅप WeChat वर अनेकांनी शेजाऱ्यांसोबत ग्रुप चॅट सेट केले आहेत. कधी कधी ग्रुप फूड खरेदीसाठी ऑफर असतात, परंतु पर्याय मर्यादित असतात. दुकाने बंद आहेत, डिलिव्हरी ड्रायव्हर्स बंद आहेत पुरवठा साखळी विस्कळीत आहे. शांघायमधील जीवन पूर्ववत होणार नाही असे नाही, परंतु त्यासाठी किती काळ जावा लागेल हे कोणालाच सांगता येत नाही. गेल्या काही आठवड्यांतील सरकारची कृती किंवा निष्क्रियता आणि गेल्या दोन वर्षांतील सततची अनिश्चितता याने लोक हडबडून गेले आहेत. कोविडच्या नावावर परत कोणते कठोर निर्बंध येतील हे सांगताच येत नाही. कोविड प्रतिबंधामुळे अनेकांना या शहराशी आणि एकमेकांशी असलेला संपर्क अधिकाधिक कमी होत चालला आहे. अत्यावश्यक सेवा आणि कर्मचाऱ्यांशिवाय हे संपूर्ण शहर लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त आहे. शांघायमध्ये राहणारे अनेक परदेशी लोक कधीच देश सोडून निघून गेले आहेत किंवा जायच्या वाटेवर आहेत. हे जगणे मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या ‘शाश्वत’ नाही.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com