आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • In The Allure Of The Gym, Our Youngsters Should Not Forget Yoga | Marathi News

आरोग्य:जिमच्या आकर्षणात आपल्या तरुणांनी योगासने विसरू नयेत

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगासने व्यायामशाळेत जाणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, कारण योगासनांमुळे शरीराची लवचिकता आणि ऊर्जा वाढते, हृदय आणि फुप्फुसांचे कार्य सुधारते आणि दुखापतीचा धोका कमी होतो.

तंदुरुस्त राहण्यासाठी आपण दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे हे सर्वच जाणतात. यामुळेच गेल्या दशकात जिम संस्कृती फोफावत गेली. त्याचा प्रभाव केवळ महानगरांपुरताच मर्यादित नाही, तर छोटी शहरे व गावांमध्येही जिम सुरू होऊ लागल्या आहेत. तंदुरुस्त आणि सुडौल शरीरासाठी आजची तरुणाई खूप शारीरिक व हृदय-रक्तवाहिन्यांसंबंधी तणावातून जात आहे. परंतु, निरोगी राहण्यासाठी हृदयाचे ठोके वाढवणारा आणि घामाने चिंब करणारा व्यायाम हीच एकमेव शारीरिक क्रिया नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तरुण आणि तंदुरुस्त लोकसुद्धा जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टला बळी पडत असल्याच्या बातम्या आजकाल आपण अनेकदा ऐकतो.

व्यायामशाळा ही एक आधुनिक गोष्ट आहे, ती सैनिकांची तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी, स्नायू बळकट करण्यासाठी आणि त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आली होती. आज व्यायामशाळा दैनंदिन शारीरिक हालचाली राखण्यासाठी आणि काम व आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, परंतु नियमित जिम-रूटीनमध्ये योगासनांचा समावेश केला तर ते फायदेशीर ठरेल. योगासने व्यायामशाळेतील लोकांसाठी उपयुक्त आहेत, कारण त्यामुळे शरीराची लवचिकता आणि ऊर्जा वाढते, हृदय आणि फुप्फुसांचे कार्य सुधारते आणि दुखापतीचा धोका कमी होतो.

योग हे एक प्राचीन आणि अत्याधुनिक शास्त्र आहे, ते अलीकडेच आयुष मंत्रालयाच्या सक्रियतेमुळे जगभरात लोकप्रिय झाले आहे. योगाबद्दल सामान्यतः काही गैरसमज आहेत, उदा. वजन कमी करण्यात ते प्रभावी नाही, कारण त्यात कमी शारीरिक श्रम होतात. हे खरे नाही, कारण अष्टांग विनय किंवा सूर्यनमस्कार अशी वजन कमी करण्यास मदत करणारी अनेक योगासने आहेत. यामध्ये काही मानसिक क्रियाही उपयुक्त ठरतात. यामुळे शरीर तर तंदुरुस्त राहतेच, पण आपण आतून मजबूतही होतो. हे शारीरिक कार्यांसाठी अंतःस्रावी, रक्ताभिसरण, श्वसन, हार्मोनल आणि पाचक प्रणालींमध्ये सुसंवाद साधते. योगामध्ये श्वासोच्छ्वासाचे व्यायामही आहेत, ते तणाव कमी करण्यासाठी आणि रिलॅक्स करण्यास प्रभावी आहेत. योग सूक्ष्म स्तरावर शरीर आणि मन शुद्ध करणाऱ्या प्राणतत्त्वावरही कार्य करतो. अनेक आसनांमध्ये लठ्ठपणा, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि रक्तातील उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करण्याची क्षमता असते. नियमितपणे योग केल्याने आपण आपली शारीरिक प्रणाली ऊर्जावान बनवू शकते, त्यात नवा प्राण फुंकू शकतो. प्रत्येक आसनाचा एक प्रभाव असतो. काही आपल्या अंतर्गत अवयवांसाठी, तर काही तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. आज योग जगभर विनाकारण लोकप्रिय झाला नाही, कारण तो आधुनिक माणसाला अनुकूल आहे. योगाचे सौंदर्य म्हणजे लोक त्यांच्या ध्येय आणि क्षमतेनुसार आसने निवडू शकतात, तर जिममध्ये असे होत नाही. तेथे प्रत्येकाला सारख्या रीतीने जड वजन उचलावे लागते आणि सांध्यावर दबाव टाकावा लागतो. यामुळे दुखापत होण्याचा धोका आहे. तर योग सर्व वयोगटांतील आणि सर्व प्रकारच्या लोकांसाठी आहे. तो कोठेही करता येतो, कारण त्यासाठी विशेष उपकरणे लागत नाहीत. दुसरीकडे, आपले स्नायू मजबूत करायचे असतील तेव्हा जिम हा एक चांगला पर्याय आहे. दोन्हीपैकी कोणते चांगले हे सांगणे कठीण आहे, कारण लोकांची ध्येये वेगळी आहेत. दोन्हींचे वेगळे स्थान आहे. पण, निरोगी राहण्यासाठी आपण जीवनात काही नैसर्गिक शारीरिक क्रियांचा समावेश केला तर बरे होईल, उदा. बागकाम, मुलांसोबत खेळणे, सायकलिंग इ. कारण एखादी गोष्ट दैनंदिन जीवनाचा भाग झाल्याशिवाय त्याचे फायदे दिसत नाहीत.

इरा त्रिवेदी लेखिका, स्तंभलेखिका व योगशिक्षिका admin@iratrivedi.in ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.

बातम्या आणखी आहेत...