आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • In The Congress Now, Between Loyalists And Reformists, You you main main | Article By Sanjay Kumar

विश्लेषण:काँग्रेसमध्ये आता निष्ठावंत व सुधारणावाद्यांत तू-तू-मैं-मैं

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये निर्माण झालेले संकट बाहेरून दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात ते अधिक सखोल आहे. याची तीन कारणे आहेत. प्रथम, पक्षाचा जनाधार झपाट्याने कमी होत आहे आणि मतदारांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. हा अविश्वास निवडणूक निकालात दिसून येतो. दुसरे म्हणजे, तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांचे पक्षाला सोडचिठ्ठी देणे सुरूच आहे. आणि तिसरे म्हणजे, मतदारांचे राहू द्या, पक्षाच्या सध्याच्या नेत्यांचाही त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे.

पक्षाध्यक्ष निवडीसाठी जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांशी जी-२३ च्या काही सदस्यांची नुकतीच झालेली चकमक हे प्रकरण किती गंभीर झाले आहे याचा आणखी एक संकेत आहे. मतदार यादी सार्वजनिक करण्याची जी-२३ नेत्यांची मागणी आहे. सुधारणावादी म्हटला जाणारा हा गट पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांशी संघर्षात उतरला आहे. यामुळे मतदारांचा पक्षावरील विश्वास आणखी कमी होईल. त्यांच्या भारत जोडो यात्रेला विविध नागरी समाज गटांचा पाठिंबा मिळत असला, तरी त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन होऊ शकत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत १७ विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये काँग्रेसला एकही विजय मिळाला नाही. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये ती सरकारचा एक भाग होती तरी सत्ताधारी आघाडीत त्यांचा फारसा सहभाग नव्हता. पण, काँग्रेस निवडणुकीत पराभूत होत आहे, एवढ्यापुरती समस्या मर्यादित नाही, तर ती वाईटरीत्या पराभूत होत आहे. काही राज्यांमध्ये ती तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होती. १७ पैकी १२ राज्यांमध्ये तिचे मताधिक्यही घसरले. बड्या नेत्यांच्या पक्षत्यागानेही पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ही केवळ दोन-तीन नेत्यांची गोष्ट नाही, तर यादी खूप मोठी आहे. त्यातील काही अनेक दशकांपासून पक्षाशी जोडलेले होते.

गुलाम नबी आझाद, कॅप्टन अमरिंदरसिंग, कपिल सिब्बल या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला. त्याच वेळी, राहुल गांधींचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या आणि यापूर्वी मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री राहिलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनीही काँग्रेसचा निरोप घेतला. क्षुल्लक कारणावरून पक्ष सोडणार नाहीत, असे हे नेते होते. त्यांचा मोठा रोष होता, त्याकडे गांधी कुटुंब दीर्घकाळ दुर्लक्ष करत होते. किंबहुना, आज लोकसभेत जितके काँग्रेसचे खासदार आहेत, त्यापेक्षा जास्त नेत्यांनी गेल्या काही वर्षांत पक्ष सोडला आहे. हे कमी की काय, म्हणून आता पक्षातील सध्याच्या नेत्यांमध्ये तू-तू-मैं-मैं सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जी-२३ चे सदस्य मतदार यादीवर ठाम आहेत. एकीकडे काँग्रेसला आपली भारत जोडो यात्रा मोठ्या उत्साहात काढायची आहे, तर दुसरीकडे आपल्याच पक्षाला जोडून ठेवण्याची त्यांची धडपड सुरू आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर ज्या प्रकारे हल्ला चढवला आहे, त्यावरून असे दिसते की, आजही गांधी घराण्याला पाठिंबा देणारे पक्षात खूप सक्रिय आहेत, पण २०१९ पासून पक्षाची काय वाईट अवस्था झाली आहे, हे त्यांना दिसत नाही. येणारा काळ पक्षासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे, कारण त्यांना केवळ आपला नवीन अध्यक्षच निवडायचा नाही, तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला समोरासमोर टक्कर द्यायची आहे.

राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष झाल्याने पक्षाला फायदा होणार नाही, हे निश्चित. केवळ भारतीय मतदारांनीच त्यांना नाकारले, असे नाही, तर काँग्रेसजनांमध्येही त्यांची स्वीकारार्हता निर्माण होऊ शकली नाही. काँग्रेस सोडणारे सर्व नेते पक्षाच्या दुर्दशेसाठी राहुल यांना जबाबदार धरत आहेत. राहुल यांच्या नेतृत्वशैलीवर ते समाधानी नाहीत. पण, काँग्रेसने गांधी घराण्याबाहेरील कोणाला अध्यक्षपदी निवडून दिले तरी परिस्थिती सुधारणार नाही. ज्या पक्षासाठी सर्वमान्य अध्यक्षाची निवड हे एक आव्हान झाले आहे, तो पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी कसा टक्कर देऊ शकेल? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) संजय कुमार प्राध्यापक व राजकीय भाष्यकार sanjay@csds.in

बातम्या आणखी आहेत...